‍
महान ऑक्टोबर क्रांती — सर्व देशांतील कामगार आणि शोषितांसाठी एक उदाहरण आणि प्रेरणा

७ नोव्हेंबर रोजी महान ऑक्टोबर क्रांतीचा १०९ वा वर्धापनदिन साजरा झाला.

७ नोव्हेंबर १९१७ रोजी, रशियातील कामगार आणि शेतकऱ्यांनी भांडवलदार आणि जमीनदारांचे राज्य उलथवून टाकण्यासाठी क्रांती केली. क्रांतिकारक कामगार, सैनिक आणि खलाशांनी तत्कालीन राजधानी पेट्रोग्राडमधील भांडवलदार सरकारचे केंद्र असलेल्या विंटर पॅलेसवर हल्ला चढवला. त्यांनी मंत्र्यांना अटक केली आणि भांडवलदार वर्गाचे सरकार बरखास्त केले. त्याच्या जागी, कामगार आणि शेतकऱ्यांच्या सोव्हिएतने स्वतःच्या हातात सत्ता घेतली. बोल्शेविक पक्षाच्या नेतृत्वाखाली, रशियाच्या कामगार वर्गाने कष्टकरी शेतकऱ्यांशी युती करून आपले राज्य स्थापन केले.

जे त्यावेळेपर्यंत मानवजातीला ज्ञात असलेले सर्वात रक्तरंजित युद्ध होते, त्या  पहिल्या महायुद्धाच्या काळात ऑक्टोबर क्रांती झाली. ते युध्द  साम्राज्यवाद्यांच्या दोन प्रतिस्पर्धी गटांमध्ये जगाच्या पुनर्विभाजनासाठी लढले गेलेले युध्द होते. सर्वात मोठ्या भांडवलशाही मक्तेदारी आणि वित्तीय अल्पसत्ताकांचा नफा सुनिश्चित करण्यासाठी लढल्या गेलेल्या त्या युध्दात, सर्व सहभागी देशांतील आणि त्यांच्या वसाहतींमधील करोडो कामगार आणि शेतकऱ्यांची कत्तल केली गेली.

नवीन सोव्हिएत सरकारचे सर्वात पहिले कार्य म्हणजे शांततेचे फर्मान जारी करणे हे होते. सोव्हिएत रशिया साम्राज्यवादी युद्धातून बाहेर पडले. त्यांनी झारशाही रशिया आणि ब्रिटिश व फ्रेंच साम्राज्यवादी यांच्यात युध्दाचा अंत झाल्यावर जगाची विभागणी करण्यासंदर्भात झालेले गुप्त करार सर्व लोकांसमोर उघड केले. त्यामुळे सर्व देशांतील कामगारांना त्यांच्याच देशांतील भांडवलदारांनी युध्दाच्या  खऱ्या उद्देशाबद्दल पसरवलेल्या खोट्या गोष्टी दिसू लागल्या.

सोव्हिएत सरकारने जमिनीसंबंधी एक फर्मान जारी केले, ज्याद्वारे त्यांनी मोठ्या जमीनदारांच्या आणि चर्चच्या मालकीच्या जमिनी जप्त करून त्या शेतकऱ्यांच्या ताब्यात दिल्या. रशियाच्या सर्व वसाहती, वसाहतवादी राजवटीतून मुक्त झाल्या.

ऑक्टोबर क्रांतीने आणि कामगार व शेतकऱ्यांच्या सोव्हिएत सरकारच्या निर्णयांनी संपूर्ण जगाला हादरवून सोडले. या घटनेने जगभरातील कामगार वर्गाला आणि सर्व शोषित व पीडितांना प्रेरणा दिली. या घटनेने सर्व देशांतील भांडवलदारांच्या मनात दहशत निर्माण केली.

यामुळे संतप्त झालेल्या जगातील १४ साम्राज्यवादी शक्तींनी रशियामध्ये भांडवलदार आणि जमीनदारांचे राज्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आपआपले सैन्य पाठवले. सोव्हिएत रशियातील कामगार आणि शेतकऱ्यांनी त्यांचा शौर्याने प्रतिकार केला. या संघर्षादरम्यान, त्यांनी लाल सेना (रेड आर्मी) प्रस्थापित केली — हे ते सैन्य होते ज्याने कामगार आणि शेतकऱ्यांच्या नवीन सोव्हिएत राज्याचे रक्षण केले. साम्राज्यवादी शक्तींना रशियातून आपले सैन्य मागे घेण्यास भाग पडले.

१९२२ मध्ये, सोव्हिएत युनियनची (USSRची) स्थापना सोव्हिएत समाजवादी प्रजासत्ताकांचा एक ऐच्छिक संघ म्हणून झाली, ज्यात प्रत्येक प्रजासत्ताकाला संघापासून अलग होण्यापर्यंत  आत्मनिर्णयाचा अधिकार होता.

देशांतर्गत भांडवलदार आणि जमीनदार तसेच परकीय साम्राज्यवादी शक्तींविरुद्ध लढत असतानाच, नवीन सोव्हिएत सरकारने मानवांकडून मानवाचे होणाऱ्या सर्व प्रकारच्या शोषणापासून मुक्त समाजवादी समाज उभारण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले.

त्याने भांडवलदारांच्या हातून उत्पादनाची प्रमुख साधने ताब्यात घेतली आणि त्यांना सामाजिक नियंत्रणाखाली ठेवले. भांडवलदारांचा जास्तीत जास्त नफा कमावण्याचा लोभ पूर्ण करण्याऐवजी, अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करून ती लोकांच्या गरजा पूर्ण करण्याकडे वळवण्यात आली. शेतीचे सामूहिकीकरण सुरू करण्यात आले आणि १९३० च्या दशकाच्या मध्यापर्यंत बहुसंख्य शेतकरी सहकारी शेती आणि सामूहिक शेतीचे सदस्य होते.

त्या वेळेपर्यंत, सोव्हिएत समाजात कोणतेही शोषक वर्ग शिल्लक राहिले नव्हते. तिथे फक्त दोन मित्रवर्ग होते — कामगार वर्ग आणि शेतकरी, आणि एक कार्यरत बुद्धिजीवी वर्ग.

सर्व भांडवलशाही देशांचे वैशिष्ट्य असलेल्या अतिरिक्त उत्पादनाचे  नित्यनेमाने येणारे संकट न येता,  सोव्हिएत अर्थव्यवस्था वेगाने वाढली.

ऑक्टोबर क्रांती आणि सोव्हिएत युनियनमधील समाजवादाची  उभारणी, हे सर्व देशांतील कामगारांसाठी भांडवलशाहीविरुद्धच्या त्यांच्या स्वतःच्या संघर्षासाठी एक उदाहरण आणि प्रेरणास्रोत ठरले. साम्राज्यवाद आणि वसाहतवादाचे बळी ठरलेले जगातील शोषित लोक आणि राष्ट्रे, त्यांच्या संघर्षासाठी प्रेरणा म्हणून सोव्हिएत युनियनकडे पाहत होते.

निर्णायक घटक — बोल्शेविक पक्ष

ऑक्टोबर क्रांतीचा विजय, कामगार आणि शेतकऱ्यांच्या नवीन सोव्हिएत राज्याची स्थापना, परकीय साम्राज्यवादी हस्तक्षेपवादी शक्तींचा पराभव आणि सोव्हिएत संघात समाजवादाची उभारणी, हे बोल्शेविक पक्षाच्या नेतृत्वाशिवाय शक्य झाले नसते.

लेनिनच्या नेतृत्वाखालील बोल्शेविक पक्षाने स्वतःला मार्क्सवादाच्या भक्कम पायावर दृढपणे स्थापित केले. लेनिनने बोल्शेविक पक्षाची उभारणी कामगार वर्गाचा पक्ष, कामगार वर्गाचा एक भाग आणि त्याच वेळी त्याची एक प्रगत तुकडी म्हणून केली.

कामगार वर्गातील सर्वात प्रगत, सर्वात वर्ग-जागरूक सदस्य बोल्शेविक पक्षात संघटित झाले होते. या पक्षाने कामगार आणि कष्टकरी जनतेला वर्गसंघर्षाच्या सर्व गुंतागुंतीच्या चढ-उतारांमधून मार्गदर्शन केले.

फेब्रुवारी १९१७ मध्ये जेव्हा झारशाही उलथवून टाकण्यात आली, तेव्हा रशियामध्ये मेन्शेविकांसारख्या विविध संघटनांनी घोषित केले की कामगार वर्गाने मागे हटून भांडवलदार वर्गाला स्वतःच्या हातात सत्ता घेऊ दिली पाहिजे. त्यांनी घोषित केले की एक मोठा काळ लोटला पाहिजे, ज्या दरम्यान भांडवलशाहीला विकसित होऊ दिले पाहिजे आणि मग भांडवलशाही स्वतःहून शांततेने समाजवादात रूपांतरित होईल. लेनिनच्या नेतृत्वाखालील बोल्शेविक पक्षाने निदर्शनास आणून दिले की अशा सर्व कल्पना मार्क्सवादविरोधी आहेत.

बोल्शेविक पक्षाने निदर्शनास आणून दिले की सर्व शोषित आणि पीडितांचे  अशा क्रांतीमध्ये नेतृत्व करणे हे श्रमजीवी वर्गाचे कार्य आहे; अशी क्रांति जी भांडवलदार वर्गाचे राज्य उलथवून टाकेल आणि श्रमजीवी  वर्गाची हुकूमशाही प्रस्थापित करेल. श्रमजीवी वर्गाच्या हुकूमशाहीखाली, कामगार वर्ग क्रांतीची लोकशाही कार्ये पूर्ण करेल आणि समाजवादी समाजाची उभारणी करेल. या परिवर्तनाचा वेग केवळ कामगार वर्गाच्या तयारीच्या पातळीवर अवलंबून असेल.

बोल्शेविक पक्षाने मार्क्स आणि एंगल्स यांच्या शिकवणीचे समर्थन केले. त्यांच्या मते, भांडवलशाही उलथवून टाकण्यासाठी आणि नवीन समाजवादी समाज उभारण्यासाठी, भांडवलदार वर्गाच्या हुकूमशाहीचे राज्य मोडून त्याजागी श्रमजीवी वर्गाच्या हुकूमशाहीचे राज्य प्रस्थापित करणे, ही एक आवश्यक अट होती. या पक्षाने कामगार वर्गात अशी क्रांतिकारी जाणीव निर्माण केली की, भांडवलदार वर्गावर राज्य करण्यासाठी त्यांनी स्वतःची यंत्रणा, स्वतःचे राज्य, म्हणजेच सोव्हिएत युनियन, स्थापन केले पाहिजे.

नवीन समाजवादी समाजाचा आर्थिक पाया उभारण्याच्या प्रक्रियेसोबतच, बोल्शेविक पक्षाने टप्प्याटप्प्याने कामगार आणि शेतकऱ्यांना नवीन सोव्हिएत राज्य उभारण्यात आणि ते मजबूत करण्यात मार्गदर्शन केले. सोव्हिएत युनियनची १९३६ ची राज्यघटना हे दर्शवते की, श्रमजीवी वर्गाची लोकशाही — म्हणजेच बहुसंख्य लोकांसाठी असलेली लोकशाही — ही भांडवलदारी लोकशाहीपेक्षा अतुलनीयरीत्या श्रेष्ठ आहे.

दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी फॅसिस्ट आक्रमकांविरुद्ध सोव्हिएत जनतेने लढलेल्या महान देशभक्तीपर युद्धाच्या काळात, समाजवादी व्यवस्था आणि श्रमजीवी वर्गाच्या लोकशाहीची श्रेष्ठता पुन्हा एकदा सिद्ध झाली. कॉम्रेड स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील बोल्शेविक पक्षाच्या नेतृत्वाखाली, रेड आर्मी (लाल सेना) आणि सोव्हिएत युनियनच्या जनतेने आक्रमकांचा दारुण पराभव केला. नाझी जर्मनीच्या पराभवात आणि अनेक व्याप्त देशांच्या मुक्तीमध्ये सोव्हिएत युनियनने निर्णायक भूमिका बजावली.

साम्राज्यवाद्यांनी आणि कामगार चळवळीतील त्यांच्या हस्तकांनी भांडवलदार वर्गाची हुकूमशाही उलथवून टाकून तिच्या जागी श्रमजीवी वर्गाची हुकूमशाही प्रस्थापित करण्याच्या आवश्यकतेच्या मार्क्सवादी सिद्धांतावर अविरतपणे हल्ले केले आहेत. याउलट, बोल्शेविक पक्षाने श्रमजीवी वर्गाची हुकूमशाही प्रस्थापित करण्याची आणि तिला सतत मजबूत करण्याची आवश्यकता ठामपणे उचलून धरली.

कॉम्रेड स्टॅलिन यांच्या मृत्यूनंतर, बोल्शेविक पक्षाच्या नवीन नेत्यांनी श्रमजीवी वर्गाची लोकशाही आणि श्रमजीवी वर्गाच्या हुकूमशाहीविरुद्ध, तसेच समाजवाद उभारणीतील कम्युनिस्ट पक्षाच्या अग्रगण्य भूमिकेविरुद्ध साम्राज्यवाद्यांनी केलेले आरोप पुन्हा करण्यास सुरुवात केली. टप्प्याटप्प्याने, त्यांनी सोव्हिएत युनियनमध्ये समाजवाद नष्ट केला आणि भांडवलशाही पुन्हा प्रस्थापित केली.

महान ऑक्टोबर क्रांतीच्या १०९ व्या वर्धापन दिनानिमित्त, आपल्या देशात श्रमजीवी वर्गाच्या क्रांतीच्या विजयासाठी परिस्थिती निर्माण करण्याचे कार्य आपण अधिक मजबूत करूया.

सत्ताधारी भांडवलदार वर्ग आणि त्यांच्या समाजविरोधी आक्रमणाविरुद्ध कामगार, शेतकरी आणि इतर सर्व पुरोगामी व लोकशाहीवादी शक्तींची शक्य तितकी व्यापक एकता आपण निर्माण करूया. जो श्रमजीवी वर्गाला त्याच्या संघर्षात नेतृत्व करण्यास सक्षम असेल अशा एकाच अग्रगामी कम्युनिस्ट पक्षात सर्व कम्युनिस्टांना एकत्र आणण्याचा आपण प्रयत्न करूया. भांडवलदार वर्गाच्या राजवटीच्या जागी कामगार आणि शेतकऱ्यांची राजवट प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून आणि ध्येयाने हा संघर्ष लढला गेला पाहिजे.

हे सुद्धा वाचा:

https://cgpi.org/6207/the-october-revolution-100-years-victory-of-october-revolution-ushered-in-state-of-workers-and-peasants-in-russia/

https://cgpi.org/25691/long-live-the-lessons-of-the-great-october-revolution-let-us-create-the-conditions-for-the-victory-of-the-indian-revolution-2/

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *