अमेरिका-इस्रायलने  इराणवर केलेला हल्ला हे दहशतवादी कृत्य आहे

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, २ मार्च २०२६

शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी पहाटेपासून अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध युद्ध पुकारले आहे. इराणमध्ये “शासन बदल” हे त्यांचे ध्येय असल्याचे त्यांनी उघडपणे जाहीर केले आहे. इस्रायल आणि अमेरिका, राजधानी तेहरानसह इराणच्या अनेक शहरांमध्ये घरे, शाळा आणि नागरी पायाभूत सुविधांवर बॉम्बहल्ला करत आहेत. शाळकरी मुलांसह शेकडो नागरिक मारले गेले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेइ आणि इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड्स कॉर्प (IRGC) चे कमांडर इन चीफ यांच्यासह इराणी राज्याच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य करून त्यांची हत्या करण्यात आली आहे.

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी इराणविरुद्धच्या अमेरिका-इस्रायल युद्धाचा निषेध करते. इराणच्या सार्वभौमत्वाचे आणि सार्वभौम राज्यांमधील संबंधांचे नियमन करणाऱ्या सर्व नियमांचे उघड उल्लंघन करण्याचे कोणतेही समर्थन असू शकत नाही.

इराणने इस्रायल आणि त्या प्रदेशातील अनेक अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे डागून प्रत्युत्तर दिले आहे. इराणने यापूर्वी इशारा दिला होता की जर त्यांच्यावर हल्ला झाला तर ते भोवतालच्या संपूर्ण प्रदेशातील अमेरिकन लष्करी सुविधांना लक्ष्य करून प्रत्युत्तर देतील. इराणी क्षेपणास्त्रांनी पश्चिम आशियातील विविध देशांमध्ये अमेरिकेच्या २६ लष्करी तळांना लक्ष्य केले आहे, ज्यात कतारमधील अल-उदेद हवाई तळ, कुवेतमधील अल-सलेम हवाई तळ, युएईमधील (UAE) अल-धफ्रा हवाई तळ आणि बहरीनमधील अमेरिकेच्या पाचव्या आरमाराचा  तळ यांचा समावेश आहे.

या संघर्षातील सर्व देशांना  संयम बाळगण्याचे आवाहन हिंदुस्थानचे सरकार करत आहे. पण खरेतर अमेरिका आणि इस्रायल आक्रमक आहेत आणि इराण त्यांच्या आक्रमणाचा बळी आहे या वस्तुस्थितीकडे हे आवाहन दुर्लक्ष करते. इराणला स्वतःचे रक्षण करण्याचा आणि हल्ला झाल्यास त्याचे प्रतिकूल परिणाम इतरांवर होतील हे दाखवण्याचा संपूर्ण अधिकार आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटल्याप्रमाणे, “हे आक्रमण म्हणजे  आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेचे  स्पष्ट उल्लंघन आहे असे इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण मानते आणि त्या आक्रमणाला निर्णायक प्रत्युत्तर देण्याचा त्यांचा कायदेशीर अधिकार आहे.”

हिंदुस्थानच्या सरकारने अमेरिका-इस्रायली हल्ल्याचा स्पष्टपणे निषेध करावा आणि या दोन्ही राष्ट्रांना इराणवरील आक्रमण त्वरित थांबवण्याचा इशारा द्यावा, अशी मागणी हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी आपल्या देशातील इतर सर्व पुरोगामी शक्तींच्या बरोबरीने करते.

इराण म्हणजे  दहशतवादाला पुरस्कृत करणारा देश, असे चित्रण अमेरिकन साम्राज्यवादी प्रचार करतो. तथापि, दहशतवादी कृत्ये करण्याचा सर्वात जुना आणि लांबलचक इतिहास अमेरिकेचा आहे, हेच खरे सत्य आहे. इराक, लिबिया आणि इराणसारख्या सार्वभौम राष्ट्रांच्या प्रमुख सदस्यांना जाणूनबुजून लक्ष्य करणे आणि त्यांची हत्या करणे यांचा तशा कृत्यांत समावेश आहे. या वर्षाच्या सुरुवातीला, अमेरिकन सशस्त्र दलांनी व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांचे अपहरण केले. इस्रायली राज्याचाही दहशतवादी कृत्ये करण्याचा दीर्घ इतिहास आहे. गाझामधील पॅलेस्टिनी लोकांचा नरसंहार आणि वेस्ट बँकमधील स्थायिकांच्या दररोज इस्रायली राज्य पुरस्कृत दहशतवादी कारवायां हे त्याचीच उदाहरणें आहेत.

आम्ही जे काही करत आहोत त्याचा उद्द्येश इराणच्या लोकांना सध्याच्या दडपशाही राजवटीपासून मुक्त करणे असाच आहे, असे समर्थन देण्याचा प्रयत्न अमेरिका आणि इस्रायलचे नेते करत आहेत. असे समर्थन पूर्णपणे अस्वीकार्य आहे कारण त्यांच्या देशातील जनता आणि त्यांच्या सरकारमधील संबंध हा इराणचा अंतर्गत प्रश्न आहे. अमेरिका किंवा इस्रायल दोघांनाही इराणच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.

अमेरिकन साम्राज्यवादी असा दावा करत आहेत की इराण अण्वस्त्रे तयार करण्याच्या मार्गावर आहे, ज्यामुळे अमेरिका आणि त्या प्रदेशातील त्याच्या मित्र राष्ट्रांना धोका निर्माण झाला आहे. हे एक धडधडीत असत्य आहे, अगदी तसेच जसे २००३ मध्ये त्यांनी इराकवरील त्यांच्या सशस्त्र आक्रमणाचे आणि कब्जाचे समर्थन करण्यासाठी पसरवलेले असत्य होते. इराणने वारंवार जाहीर केले आहे की त्यांचा अण्वस्त्रे तयार करण्याचा कोणताही हेतू नाही आणि त्यांचा युरेनियम समृद्धीकरण कार्यक्रम शांततापूर्ण हेतूंसाठी आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेला त्यांच्या अणुसंवर्धन सुविधांची तपासणी करण्याची परवानगी दिली आहे. हे सत्य कोणीही विसरू अथवा नाकारू शकत नाही की १९ जून २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे महासंचालक राफेल ग्रोसी यांनी स्पष्टपणे सांगितले होते की इराण अणुशस्त्रे तयार करण्याचा प्रयत्न करत असल्याचा कोणताही पुरावा नाही.

१९७९ मध्ये साम्राज्यवादविरोधी क्रांती करून इराणी जनतेने अमेरिकेच्या साम्राज्यवाद समर्थक कठपुतळी शाह रजा पेहलवी यांची राजवट उलथवून टाकल्यापासून, अमेरिकन साम्राज्यवाद्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी इराणमध्ये त्यांचा गमावलेला  स्वर्ग परत मिळवण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. त्याचवेळी, साम्राज्यवाद्यांच्या वर्चस्वापासून आणि त्यांच्या जमिनी आणि संसाधनांच्या लूटमारीपासून मुक्ततेच्या संघर्षात इराण पश्चिम आशियातील सर्व लोकांसाठी एक उदाहरण आणि प्रेरणास्थान आहे. अमेरिकन साम्राज्यवाद्यांनी आणि त्यांच्या इस्रायली मित्रांनी इराणवर केलेल्या हल्याच्या खऱ्या उद्दिष्टाचा, इराणमधील लोकांच्या मुक्ततेशी किंवा त्यांच्या संरक्षणाशी किंवा दहशतवादाच्या उच्चाटनाशी काहीही संबंध नाही. त्यांचे खरे उद्दिष्ट संपूर्ण पश्चिम आशियावर स्वतःचे पूर्ण वर्चस्व प्रस्थापित करणे हेच आहे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इराण हा एक मोठा अडथळा आहे, म्हणूनच त्याला लक्ष्य केले जात आहे.

हिंदुस्थानसह जगभरात, लोक इराणवरील अमेरिका-इस्रायली आक्रमणाचा निषेध करत रस्त्यावर उतरत आहेत. हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी, इराणच्या धाडसी लोकांना त्यांच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठीच्या त्यांच्या न्याय्य संघर्षात पूर्ण पाठिंबा देते.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *