“जीन्स जिहाद” च्या नावाखाली पश्चिम दिल्लीतील कामगारांना  लक्ष्य केले जात आहे

मजदूर एकता कमिटीच्या  वार्ताहराचा अहवाल

पश्चिम दिल्लीतील ख्याला येथील एक विकसित, रेडीमेड  जीन्स शिलाईसाठी  प्रसिद्ध असलेले कापडाचे केंद्र बंद पडण्याच्या धोक्यात आहे. दिल्ली सरकार आणि स्थानिक आमदार असलेले उद्योग मंत्री मनजिंदर सिंग सिरसा, यांनी चालवलेल्या लक्ष्यित सांप्रदायिक मोहिमेमुळे या कापड केंद्रातील कामगारांना त्यांची उपजीविका गमवावी लागण्याचा धोका आहे.

गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून, उत्तर प्रदेशातील शेकडो मुसलमान शिंपी आणि कारागीर, ख्याला गावातील जीन्स शिवणकाम केंद्रामध्ये काम करण्यासाठी येत आहेत. जसजसे जीन्स शिवणकाम व्यवसाय वाढत गेला तसतसे अनेक घामगाळू  कारखाने (स्वेटशॉप्स) सुरू झाले. ख्याला आणि त्याच्या आसपास दिल्लीतील सर्वात मोठ्या घाऊक जीन्स बाजाराची स्थापना झाली. २०२१ मध्ये, अधिकाऱ्यांनी ख्यालाला औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित केले. सुरुवातीला बहुतेक कामगार मुसलमान होते, परंतु हळूहळू हिंदू आणि शीख कामगार देखील सामील झाले. गेल्या अनेक  वर्षांपासून जीन्स कारखान्यांमधील कामगार पूर्ण एकोप्याने काम करत आहेत.

काही महिन्यांपूर्वी, या भागातील मुसलमान कामगारांना लक्ष्य करून त्यांच्यावर “जीन्स जिहाद” चालवल्याचा आरोप करून एक प्रचार मोहीम सुरू करण्यात आली. दिल्ली सरकार या जातीय द्वेष पसरविणाऱ्या मोहिमेचे नेतृत्व करत आहे. योग्य नागरी सेवा सुनिश्चित करण्याच्या स्वतःच्या जबाबदारीपासून लोकांचे लक्ष वळविण्यासाठी, सरकार या भागातील नागरी सेवांच्या अत्यंत वाईट स्थितीसाठी जीन्स उत्पादन केंद्राला जबाबदार धरत आहे. सरकारी प्रचारात जीन्स कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या उत्तर प्रदेशातील मुसलमान कामगारांना “स्थानिक हिंदू आणि शीख लोकांचे नोकऱ्या चोरणारे” म्हणून चित्रित केले जात आहे. त्यांच्यावर “बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर” म्हणून हल्ला केला जात आहे. तथापि, दिल्ली सरकारने या दाव्यांना सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत.

जाणूनबुजून भीती आणि जातीय द्वेषाचे वातावरण पसरवले जात आहे. परिसरातील मुसलमानांची दुकाने आणि रेस्टॉरंट्सवर हल्ले केले जात आहेत आणि “हा परिसर राहण्यायोग्य नसल्याचा” आणि “महिलांसाठी असुरक्षितता निर्माण करण्याचा” आरोप त्यांच्यावर केला जात आहे. स्थानिक रहिवासी म्हणतात की शीख आणि हिंदूंनी त्यांच्या मुसलमान शेजाऱ्यांबद्दल कधीही कोणतीही तक्रार केलेली नाही, पण तरीही हे आरोप करण्यात येत आहेत.

अगदी इशाऱ्याची वाट बघितल्यासारखी ह्याच वेळेवर, भांडवलदार प्रसारमाध्यमांच्या विविध विभागांनी ख्यालामध्ये “जीन्स जिहाद” ची कहाणी पसरवण्यास सुरुवात केली आहे. हे प्रकरण पुढे रेटत , मंत्र्यांनी जीन्स कारखाने बंद करण्याचे आणि कामगारांना परिसरातून हाकलून लावण्याचे आदेश दिले आहेत. जूनमध्ये सीलबंद मोहीम सुरू झाली, सरकारी अधिकारी आणि पोलिसांनी अचानक बेकायदेशीर घोषित केलेल्या कारखान्यांना टाळे ठोकले आहे.

याचा परिसरातील हजारो कामगारांच्या उपजीविकेवर विनाशकारी परिणाम झाला आहे. सीलबंद मोहीम सुरू होण्यापूर्वी, तेथील जीन्स कारखान्यांमध्ये १५,००० हून अधिक कामगार काम करत असल्याचे वृत्त होते. आता फक्त काही शेकडो  कामगार उरले आहेत आणि हे कामगार देखील घाबरले आहेत आणि उत्तर प्रदेशात परत जाण्याचा किंवा इतरत्र उपजीविकेचा शोध घेण्याचा विचार करत आहेत.

जातीय विष पसरवणे, एका किंवा दुसऱ्या समुदायाविरुद्ध द्वेषाचा प्रचार करणे, जातीय हिंसाचार आणि दहशत घडवणे – हे सर्व भांडवलदार वर्गाच्या राजवटीच्या पद्धतीचा एक भाग आहे. त्यांचे उद्दिष्ट कष्टकरी जनतेच्या हक्कांच्या रक्षणासाठी, त्यांच्या शोषणाविरुद्धच्या संघर्षात त्यांची एकता तोडणे हे आहे. कष्टकरी जनतेच्या सर्व घटकांनी एकत्र येऊन शोषकांच्या या राक्षसी योजनांना पराभूत केले पाहिजे.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *