इराणवरील इस्रायली हल्ल्याचा धिक्कार करा

हिंदुस्थानची  कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, १७ जून, २०२५

१२ जूनच्या पहाटेपासून, इस्रायलने इराणवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे आणि बॉम्ब हल्ले सुरू केले आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचे बेमुर्वतखोरपणे  उल्लंघन करून, आण्विक प्रकल्प  आणि गॅस रिफायनरीजना लक्ष्य केले आहेत, ज्याचे गंभीर परिणाम झाले आहेत. त्यांनी लष्करी आणि नागरी पायाभूत सुविधांवर हल्ले केले आहेत. राजधानी तेहरानवर वारंवार बॉम्बहल्ला करण्यात आला आहे. ज्यामध्ये एक हजाराहून अधिक लोक काम करत होते त्या इराणी स्टेट टेलिव्हिजन मुख्यालयावर, थेट प्रक्षेपण चालू असतानाही बॉम्बहल्ला करण्यात आला. या हल्ल्यांमध्ये शेकडो पुरुष, महिला आणि मुले मारली गेली आहेत. या हल्ल्यांमध्ये इराणी सशस्त्र दलांचे किमान सात वरिष्ठ कमांडर आणि इराणचे नऊ प्रमुख अणुशास्त्रज्ञ मारले गेलेत.

हिंदुस्थानची  कम्युनिस्ट गदर पार्टी इस्रायलने इराणविरुद्ध सुरू केलेल्या गुन्हेगारी आक्रमणाचा धिक्कार  करते.

इस्रायलने निर्लज्जपणे घोषित केले आहे की त्यांचे ध्येय इराणला गुडघे टेकायला लावणे आणि त्या देशात सत्ता बदल घडवून आणणे आहे.

हे युद्ध अँग्लो-अमेरिकन साम्राज्यवाद्यांच्या पूर्ण पाठिंब्याने सुरू करण्यात आले आहे. अमेरिकेने इस्रायलला हा हल्ला करण्यासाठी गुप्त माहिती   आणि सर्वात अत्याधुनिक आणि घातक शस्त्रे पुरवली आहेत. इराणवर पुढील हल्ले करण्याच्या तयारीत अमेरिका आणि ब्रिटनने त्यांच्या युद्धनौका पर्शियन आखाती प्रदेशात हलवल्या आहेत.

इराण स्वतःच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यात आणि पॅलेस्टिनी लोकांच्या त्यांच्या राष्ट्रीय हक्कांसाठीच्या वीर संघर्षाला पाठिंबा देण्याबद्दल दृढ आहे. इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिका आणि त्याचे मित्र राष्ट्र इस्रायलला उकसवत  आहेत त्याचे हेच खरे कारण आहे. ते तेल समृद्ध पश्चिम आशियावर त्यांचे पूर्ण वर्चस्व प्रस्थापित करण्यात इराणला मुख्य अडथळा मानतात.

इराणने एक शक्तिशाली प्रत्युत्तरात्मक हल्ला सुरू केला आहे, ज्याने इस्रायलच्या पंतप्रधान नेतन्याहूसह सर्वोच्च नेतृत्वाला भूमिगत बंकरमध्ये जाण्यास भाग पाडले आहे. इराणी राज्याने जाहीर केले आहे की आपल्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी ते कोणतेही बलिदान देण्यास तयार आहेत. त्यांनी जाहीर केले आहे की इस्रायलचा हल्ला अमेरिकेच्या पूर्ण माहिती आणि पाठिंब्याने करण्यात आला आहे.

इराणचे लोक इस्रायल-अमेरिकेने राष्ट्र म्हणून त्यांच्या अस्तित्वावर केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत आणि शेवटपर्यंत त्यांचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी संघर्ष सुरू ठेवण्यास ते प्रतिबद्ध आहेत.

हे  युद्ध संपूर्ण पश्चिम आशियात पसरण्याची शक्यता आहे. जगभरात शांतता आणि न्यायप्रेमी लोक अशा युद्धासाठी इस्रायल आणि त्याच्या अमेरिकन समर्थकांचा निषेध करत आहेत. १५ सदस्यीय संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये, निवडून आलेल्या सर्व दहा सदस्यांनी, तसेच रशिया आणि चीनने इस्रायली आक्रमणाचा निषेध केला. हिंदुस्थान  वगळता शांघाय सहकार्य संघटनेच्या सर्व सदस्यांनी इराणच्या सार्वभौमत्वावर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला.

अमेरिकेच्या समर्थनाने इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यास हिंदुस्थानच्या सरकारने नकार दिला आहे हे अत्यंत लज्जास्पद आहे.

इराणवरील अमेरिकेने समर्थित इस्रायली युद्धाचा निषेध करण्यासाठी हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी जगातील शांतताप्रेमी लोकांसोबत सामील झाली आहे.

 

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *