हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, २३ मे २०२५
२१ मे रोजी, हिंदुस्थानी सुरक्षा दलांनी छत्तीसगड आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या करिगट्टा टेकड्यांवरील जंगलात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) चे सरचिटणीस कॉम्रेड केशव राव आणि इतर २६ पार्टी सदस्यांना घेरून ठार मारले. हे “ऑपेरेशन कगार” अंतर्गत करण्यात आले. हिंदुस्थानातील माओवादाचे उच्चाटन करणे असे हिंदुस्थानी राज्याचे त्यामागील उद्दिष्ट आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून, छत्तीसगडमध्ये या ऑपरेशन अंतर्गत सुरक्षा दलांनी माओवादी म्हणून घोषित केलेल्या किमान २०१ पुरुष आणि महिलांची हत्या केली आहे.
छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील हा प्रदेश, जंगलाखाली असलेल्या खनिज संपत्तीच्या बाबतीत हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत प्रदेशांपैकी एक आहे. कोळसा, लोहखनिज आणि इतर खनिजांच्या उत्खननात गुंतलेले मक्तेदार भांडवलदार राज्य सुरक्षा दलांच्या मदतीने आदिवासींना त्यांच्या जमिनींवरून हाकलून लावू इच्छितात. ऑपरेशन कगारमागील हेच उद्दिष्ट आहे.
छत्तीसगडमधील समस्या ही एक राजकीय समस्या आहे, ज्यावर राजकीय तोडगा काढण्याची आवश्यकता आहे. हे ज्ञात आहे की सीपीआय (माओवादी) ने वारंवार युद्धबंदीची मागणी केली होती आणि ते केंद्र सरकारशी चर्चेसाठी तयार होते. आदिवासींच्या जमिनींवरील हक्कांच्या प्रश्नावर राजकीय तोडगा काढण्याऐवजी, केंद्र सरकार या समस्येला कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून राज्याच्या दडपशाहीने हाताळत आहे. सीपीआय (माओवादी) तसेच जमीन हडपण्यास विरोध करणाऱ्या आदिवासींना संपविण्यासाठी क्रूर बळाचा वापर सरकारने सुरू केला आहे. वेगवेगळ्या बातम्यांनुसार, ऑपरेशन कगारचा भाग म्हणून या भागात ४०,००० हून अधिक सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहेत.
सीपीआय (माओवादी) च्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या तसेच आदिवासींच्या हिंदुस्थानी राज्याने केलेल्या निर्घृण हत्येचा हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीची केंद्रीय समिती निषेध करते. राज्याच्या दहशतवादाचे कुठल्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही. सर्व लोकशाही शक्तींना एकत्र येऊन, ऑपरेशन कगार आणि छत्तीसगडमध्ये सुरू असलेल्या राज्य दहशतवादाचा अंत करण्याची मागणी करण्याचे आवाहन, हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीची केंद्रीय समिती करते.
