काश्मिरी लोकांवरील आणि मुस्लिमांवरील हल्ल्यांचा निषेध करा!
राज्याच्या दहशतवादाला कोणत्याही आधारावर उचित ठरवता येणार नाही!

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, ३ मे २०२५

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या बर्बर दहशतवादी हल्ल्यापासून, विशेषतः काश्मिरी आणि सर्वसाधारणपणे मुस्लिम हे देशाच्या अनेक भागात क्रूर हल्ल्यांचे लक्ष्य बनले आहेत.

भांडवलशाही मक्तेदार घराण्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या माध्यमांनी सर्व काश्मिरी आणि सर्व मुस्लिम हे पाकिस्तानी एजंट,  हिंदुस्थानाचे शत्रू आणि दहशतवादी आहेत अशी कहाणी पसरवली आहे. जातीय विष पसरवण्यासाठी आणि देशातील इतर राज्यांमध्ये राहणाऱ्या, शिक्षण घेणाऱ्या किंवा काम करणाऱ्या काश्मिरींवर हल्ल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जात आहे. काश्मीरमधील लोक आणि संपूर्ण हिंदुस्थानातील मुस्लिम धर्माच्या लोकांनी पहलगाम येथील भयानक दहशतवादी हत्याकांडाचा निषेध केला आहे, हे सत्य लपवले जात आहे.

शेकडो काश्मिरी विद्यार्थ्यांना त्यांची वसतिगृहे रिकामी करून काश्मीरला परत जाण्यास भाग पाडण्यात आले आहे. अशा बातम्या उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा आणि इतर राज्यांमधून आल्या आहेत. उत्तराखंडमध्ये काश्मिरी शाल विक्रेत्यांवर हल्ले झाले आहेत. अनेक राज्यांमध्ये मुस्लिम तरुणांना हल्ल्याचे लक्ष्य बनवण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात एका तरुणाची गोळी घालून हत्या करण्यात आली. देशाच्या विविध भागांमध्ये मशिदींबाहेर मुस्लिमांवर हल्ला करणाऱ्या चिथावणीखोर घोषणा देण्यात आल्या आहेत.

पहलगाममधील दहशतवादी हत्याकांडाचा काश्मीरमधील लोकांनी निसंदिग्धपणे निषेध व्यक्त केला आहे. हत्याकांड सुरू असतानाही, एका तरुण घोडा मालकाने पर्यटकांचे रक्षण करताना आपल्या प्राणाचे बलिदान दिले. मृत किंवा जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांनी सांगितलेल्या हृदयस्पर्शी कथांवरून असे दिसून येते, की हत्याकांडानंतर, सुरक्षा दले त्या परिसरात पोहोचण्यापूर्वीच, जवळच्या गावांतील महिला, पुरुष आणि अगदी मुलांनीही त्यांना कशी मदत केली. लोकांनी पीडितांच्या कुटुंबियांसाठी त्यांच्या घरांचे दरवाजे उघडले. टॅक्सी चालकांनी त्यांना मोफत रुग्णालयात नेले. संपूर्ण काश्मीरमध्ये हॉटेल मालक, टूर ऑपरेटर आणि रेस्टॉरंट मालकांनी पर्यटकांकडून कोणतेही पैसे घेण्यास नकार दिला.

पहलगाममधील लोकांनी दहशतवादी हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी आणि मृत आणि जखमींच्या कुटुंबियांना त्यांच्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करण्यासाठी अभूतपूर्व मशाल मार्च काढला. डोळ्यांतून अश्रू वाहत असताना, पुरुष आणि महिला, मुली आणि मुले, वृद्ध आणि तरुण सर्वांनी घोषणा केली – हे जे झाले ते आमच्या नावाने नाही. त्यांनी घोषित केले की दहशतवादी हत्याकांड काश्मिरीयतच्या विरोधात आहे. श्रीनगर आणि काश्मीरच्या इतर भागांमध्येही अशीच हृदयस्पर्शी दृश्ये पाहायला मिळाली.

दहशतवादी हत्याकांडात वडिलांना गमावलेल्या केरळमधील एका पर्यटकाने घरी परतल्यानंतर सांगितले की – आता मला काश्मीरमध्ये दोन भाऊ मिळाले आहेत. ज्यांनी तिला या अत्यंत क्लेषयुक्त परिस्थितीतून बाहेर येण्यास मदत केली, त्या दोन टॅक्सी चालकांचा ती उल्लेख करत होती.

काश्मीर खोऱ्यातील दोन मुख्य राजकीय पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी यांचे नेते, दहशतवादी हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले. हुर्रियत कॉन्फरन्सचे नेते मीरवाईज उमर फारूख यांनी २९ एप्रिल रोजी माध्यमांना सांगितले की, “काश्मिरी लोकांचे पहलगाम रक्तपातातील बळींसाठी निषेध, सहानुभूती आणि दुःख थेट हृदयातून आहे, तरीही त्यांना बदनाम केले जात आहे आणि लक्ष्य केले जात आहे”. त्यांनी देशातील इतर लोकांना आवाहन केले की, “काश्मिरी लोकांबद्दल अविश्वास निर्माण करणाऱ्या द्वेषाला आणि माध्यमांच्या प्रचाराला बळी पडू नका आणि संकटाच्या वेळी सर्व पर्यटक आणि पर्यटकांप्रती जसे ते नेहमीच करत आले आहेत, तसेच त्यांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करा.”

लोकांच्या भावना आणि प्रतिसादाच्या अगदी उलट, हिंदुस्थानी  राज्याचा काश्मीरमधील लोकांबद्दलचा दृष्टिकोन अत्यंत शत्रुत्वाचा आहे. सरकारच्या सुरक्षा दलांनी २००० हून अधिक लोकांना अटक केली आहे व त्यांना पोलिस स्टेशन आणि लष्करी छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. श्रीनगर, गंदरबल, बांदीपोरा, कुपवाडा, बारामुल्ला, बडगाम, इस्लामाबाद, पुलवामा, शोपियान आणि कुलगामसह अनेक जिल्ह्यांमध्ये या अटका करण्यात आल्या आहेत.

सशस्त्र दलांनी अनेक लोकांची घरे उध्वस्त केली आहेत, असा आरोप करत की ती दहशतवाद्यांची घरे आहेत. ज्या महिलेचे घर अशा प्रकारे उद्ध्वस्त करण्यात आले होते, तिने माध्यमांना सांगितले की, “मी पहलगाममधील दहशतवादी हत्येचा निषेध करते. पण माझे घर उध्वस्त झाले आहे कारण माझा भाऊ, ज्याला मी तीन वर्षांहून अधिक काळ पाहिले नाही, त्याच्यावर दहशतवादी असल्याचा आरोप केला जात आहे. हा देखील दहशतवाद नाही का?”

म्हणून काश्मिरी आणि मुस्लिमांवरील हल्ला म्हणजे हिंदुस्थानी जनतेच्या एकता आणि एकात्मतेवर हल्ला असा त्या हल्ल्यांचा निषेध विवेकी पुरुष आणि महिलांनी योग्यरित्या केला आहे. सशस्त्र दलातील निवृत्त अधिकाऱ्यांनी काश्मिरी आणि मुस्लिमांवरील हल्ल्यांचा निषेध केला आहे.

श्रीनगरचे लोकसभा सदस्य रुहुल्लाह मेहदी यांनी सोशल मीडियावर लिहिले आहे की पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीर आणि काश्मिरींना “सामूहिक शिक्षा” भोगावी लागत आहे.

हिंदुस्थानी सरकारने देशातील सर्व पाकिस्तानी पासपोर्ट धारकांचे व्हिसा रद्द केले आहेत आणि त्यांना २९ एप्रिलपर्यंत पाकिस्तानला परतण्यास सांगितले आहे. यामुळे एक मोठी मानवी शोकांतिका निर्माण झाली आहे.

कुटुंबे क्रूरपणे तुटल्याच्या हृदयद्रावक कथा समोर आल्या आहेत. एका तरुण आईला तिच्या १० महिन्यांच्या मुलाला दिल्लीत तिच्या पतीसोबत सोडून पाकिस्तानला परत जावे लागले आहे – कारण ती पाकिस्तानी आहे तर तिचा पती आणि त्यांचा मुलगा हिंदुस्थानी नागरिक आहेत. ओडिशातील एक विधवा महिला २५ वर्षांहून अधिक काळ हिंदुस्थानात राहात होती; तिच्या हिंदुस्थानी मुलांना मागे सोडून तिला पाकिस्तानात परत जावे लागले आहे, जिथे तिचे कोणीही नाही. काश्मीरमध्ये, शेकडो पाकिस्तानी नागरिक महिलांनी हिंदुस्थानी नागरिकांशी लग्न केल्याची प्रकरणे आहेत. गेल्या अनेक दशकांपासून हिंदुस्थानी नागरिकत्व मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करूनही त्यांना यश आले नाही. आता या महिलांना त्यांची कुटुंबे हिंदुस्थानात सोडून पाकिस्तानला परत जावे लागले आहे. जम्मूच्या रुग्णालयात आपत्कालीन उपचार घेत असलेल्या ८० वर्षीय वृद्धाला पाकिस्तानला परत जाण्यास भाग पाडल्याचे प्रकरण सरकारची निर्दयता उघड करते. अटारी सीमेवर बसमध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला.

क्षणाचीही सूचना न देता हजारो कुटुंबे ज्या क्रूरतेने उध्वस्त केली जात आहेत ते अक्षम्य आहे. पहलगाममधील दहशतवादी हत्याकांडासाठी या कुटुंबांना कसे जबाबदार धरता येईल?

१ मे रोजी, पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मारलेल्या हरियाणातील एका नौदल अधिकाऱ्याच्या तरुण पत्नीने जाहीर केले की “लोकांनी मुस्लिम, काश्मिरी लोकांविरुद्ध जावे, अशी तिची इच्छा नाही. आम्हाला शांती आणि फक्त शांती हवी आहे. अर्थात आम्हाला न्याय हवा आहे.” बहुसंख्य हिंदुस्थानी लोकांची हीच भावना आहे.

केंद्र सरकार आणि विविध राज्य सरकारांनी मुस्लिम आणि काश्मिरी लोकांविरुद्ध विविध गटांकडून होणारे हल्ले थांबवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. त्याऐवजी, केंद्र आणि राज्य सरकारांनी लोकांना अटक करण्यात किंवा सरकारच्या कथनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या लोकांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात मात्र खूपच  तत्परता दाखवली आहे. “राष्ट्रविरोधी टिप्पण्या किंवा पोस्ट” साठी आसाम, त्रिपुरा आणि मेघालयात किमान २४ लोकांना अटक करण्यात आली आहे. यापैकी १९ जणांना आसाममध्ये अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक आमदार, एक पत्रकार, एक वकील व काही  निवृत्त शिक्षक आणि विद्यार्थी यांचा समावेश आहे.

या संदर्भात, हे उल्लेखनीय आहे की नेटवर्क ऑफ वुमेन इन मीडिया, इंडिया (NWMI) ने लोकप्रिय व्यंगचित्रकार आणि राजकीय टीकाकार, नेहा सिंग राठोड आणि माद्री काकोटी यांच्यावर फुटीरता किंवा फुटीरतावादाचे आरोप लावल्याचा निषेध केला आहे. शमिता यादव यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या तक्रारीचाही त्यांनी निषेध केला आहे. १ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात, NWMI ने असे निदर्शनास आणून दिले आहे की त्या  व्यक्तींचा छळ केला जात आहे कारण त्यांनी पहलगाम हल्ल्यातील प्रशासन आणि गुप्तचर विभागाच्या अपयशांवर सरकारला प्रश्न विचारले होते. NWMI ने सरकारला हे आरोप मागे घेण्यास आणि प्रश्न विचारणाऱ्या माध्यमांचा छळ थांबवण्यास सांगितले आहे.

संपूर्ण जगासमोर जे उघडपणे सुरू आहे तो म्हणजे निर्लज्जपणे केलेला राज्याचा दहशतवाद आहे. समाजातील सर्व सदस्यांना संरक्षण देण्याऐवजी, हिंदुस्थानी राज्याने काश्मिरी लोकांविरुद्ध, सर्व मुस्लिमांविरुद्ध आणि सरकारच्या कथनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या प्रत्येकाविरुद्ध दहशत पसरवली आहे.

सर्व महिला आणि विवेकी पुरुषांनी, राज्याच्या या दहशतवादाचा एकजुटीने विरोध करण्याचे आणि हिंदुस्थानी लोकांच्या एकता आणि एकात्मतेच्या रक्षणासाठी उभे राहण्याचे काळाचे आवाहन आहे.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *