मे दिन 2025:
कामगार-शेतकरी ऐक्य बळकट करूया आणि येणाऱ्या क्रांतिकारी वादळांसाठी सज्ज होऊया!

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे आवाहन, 29 एप्रिल 2025

कामगार साथींनो,     

या वर्षी मे दिन अशा वेळी येत आहे जेव्हा जगभरातील कामगार त्यांच्या उपजीविकेवर आणि हक्कांवर होणाऱ्या हल्ल्यांविरुद्ध दृढ संघर्ष करत आहेत. भांडवलशाही व्यवस्था खूप खोल संकटात आहे. भांडवलदार शासक वर्ग आणि त्याच्या सेवेतील सरकारे त्यांच्या शोषणकारी व्यवस्थेचे रक्षण करण्यासाठी राक्षसी पद्धतींचा अवलंब करत आहेत.

संकटग्रस्त जागतिक भांडवलशाही व्यवस्थेत, हिंदुस्थानी भांडवलदार त्यांच्या स्वतःच्या साम्राज्यवादी ध्येयांकडे पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. जे स्वतःसाठी सर्वोत्तम आहे ते संपूर्ण देशासाठी सर्वोत्तम आहे या कल्पनेवर आधारित, ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या क्लबमध्ये सामील होण्याचे त्यांचे स्वप्न “विकसित भारत”च्या नावाने सादर करत आहेत. भांडवलदार आपल्या देशातील कामगार आणि शेतकऱ्यांचे शोषण आणि लूट आणखी तीव्र करून त्यांचे स्वार्थी ध्येय साध्य करू इच्छितात.

जागतिक घडामोडींमध्ये आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी, आघाडीच्या साम्राज्यवादी शक्तीचे, अमेरिकेचे सरकार, देशातील कामगारांविरुद्ध आणि परदेशातील प्रतिस्पर्धी शक्तींविरुद्ध भयंकर धोकादायक पाऊले उचलत आहे. रशियाला चिथावणी देऊन युक्रेनमधील प्रदीर्घ युद्धाला चालना दिल्यानंतर आणि इस्रायलने पॅलेस्टिनी लोकांविरुद्ध सुरू केलेल्या नरसंहारी  युद्धाला पाठिंबा दिल्यानंतर, अमेरिकन साम्राज्यवादी आता इतर अनेक देशांविरुद्ध व्यापार युद्ध वाढवत आहेत.

या वर्षी जानेवारीमध्ये अध्यक्ष ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यापासून, लोकशाही हक्कांवरील हल्ले, स्थलांतरितांना लक्ष्य करणे, सरकारी नोकऱ्या नष्ट करणे, सामाजिक कार्यक्रमांवरील खर्चात कपात आणि ग्राहकांच्या किमतींमध्ये आणखी वाढ होण्यास कारणीभूत असलेली वाढवलेली व्यापार शुल्के – या सगळ्यांच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात जननिदर्शने अमेरिकेला हादरवून टाकत आहेत.

गेल्या 30 वर्षांत कधीही न झालेल्या अशा मोठ्या प्रमाणात संप आणि भव्य निदर्शने ब्रिटनला हादरवून टाकत आहेत. सरकारने सुरू केलेल्या पेन्शन सुधारणांच्या निषेधार्थ अलिकडच्या काळात फ्रान्समधील लाखो कामगारांनी वारंवार काम बंद केले आहे. गाझामधील इस्रायलच्या नरसंहारी युद्धाचा अंत करण्याची मागणी करत लाखो लोकांनी लंडन, बर्लिन, पॅरिस, न्यू यॉर्क आणि जगातील इतर शहरांमध्ये निदर्शने केली आहेत.

आपल्या देशात, रेल्वे, बँकिंग, विमा, दूरसंचार, कोळसा खाणी, वीज निर्मिती, पारेषण आणि वितरण या क्षेत्रातील कामगार खाजगीकरणाला विरोध करत राहिले आहेत. ऑटो, टेक्सटाइल, फार्मा, रसायने आणि इतर क्षेत्रांतील कामगारांमध्ये कामगारविरोधी कामगार संहितांना मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. आरोग्य कर्मचारी, आयटी कामगार, गिग कामगार आणि इतर त्यांच्या भयानक कामाच्या परिस्थितीविरुद्ध लढा देत आहेत. आशा आणि अंगणवाडी कर्मचारी त्यांना कामगार म्हणून मान्यता मिळावी अशी मागणी करत आहेत. कोट्यवधी सरकारी कर्मचारी आणि सशस्त्र दलातील सदस्य सुरक्षित आणि पुरेशा पेन्शनच्या त्यांच्या अधिकारावर होणाऱ्या हल्ल्यांविरुद्ध निदर्शने करत आहेत.

वाढत्या जनविरोधाला तोंड देत, भारत आणि इतर भांडवलशाही देशांमधील सत्ताधारी वर्ग कामगार वर्ग आणि इतर शोषित लोकांची एकता तोडण्यासाठी जातीयवाद आणि वंशवादाचा अवलंब करत आहेत. सर्व प्रकारच्या विरोधांना चिरडण्यासाठी ते पोलिस अधिकारांचा वाढता वापर करत आहेत.

जीवन अनुभवावरून असे दिसून येते की भांडवलशाही सर्वांना सुरक्षित उपजीविका प्रदान करण्यास सक्षम नाही. भांडवलदार वर्ग राज्य करण्यास अयोग्य आहे. जोपर्यंत हा वर्ग सत्तेत राहील तोपर्यंत तो समाजाला एकामागून एक संकटात ओढत राहील, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू आणि विनाश घडेल.

भांडवलदार ज्या धोकादायक मार्गावर मानवतेला ओढत आहेत त्यापासून केवळ कामगार वर्गच मानवतेला वाचवू शकतो. 1917 मध्ये रशियन कामगार वर्गाने केले त्याप्रमाणे राजकीय सत्ता आपल्या हातात घेण्यासाठी आणि भांडवलशाहीपासून समाजवादाकडे संक्रमण करण्यासाठी तयारी करून आणि संघटित होऊन आपण हे करू शकतो.

कामगार साथींनो,

सोव्हिएत रशियामध्ये बांधलेल्या समाजवादी व्यवस्थेची अनेक दशकांपर्यंत भरपूर प्रगती झाली होती. तिने संपूर्ण जगाला दाखवून दिले की सर्व प्रकारचे शोषण नष्ट करणे आणि समाजातील सर्व सदस्यांसाठी समृद्धी आणि संरक्षण सुनिश्चित करणे शक्य आहे. असे करण्यासाठी आवश्यक असलेली अट म्हणजे सामाजिक उत्पादनाची साधने भांडवलदारांच्या खाजगी मालमत्तेपासून लोकांच्या सामाजिक आणि सामूहिक मालमत्तेत रूपांतरित करणे. भांडवलदार वर्गाच्या राजवटीची जागा, इतर सर्व श्रमिकांशी युती करून कामगार वर्गाच्या राजवटीने जर घेतली तरच हे शक्य आहे.

सोव्हिएत युनियनमध्ये उदयास आलेल्या आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेने सर्व देशांतील कामगारांना प्रेरणा दिली आणि आकर्षित केले. सर्व प्रौढ पुरुष आणि महिलांना काम करण्याचा अधिकार होता. सर्वांसाठी एकसमान दर्जाचे मोफत शालेय शिक्षण आणि आरोग्य सेवा होती. सर्व कामगार, शेतकरी आणि सैनिकांना सोव्हिएत नावाच्या निर्णय घेणाऱ्या संस्थांमध्ये निवडणुकांमध्ये भाग घेण्याचा आणि निवडून येण्याचा अधिकार होता. निवडून आलेल्या त्यांच्या प्रतिनिधींना कधीही परत बोलावण्याचादेखील त्यांना अधिकार होता.

दुसरे महायुद्ध संपल्यानंतर, वसाहतवादी राजवट आणि परदेशी लष्करी कब्ज्यातून मुक्त झालेली अनेक राष्ट्रे आणि लोक समाजवादाच्या उभारणीच्या मार्गावर चालू लागले. कामगार वर्गाच्या अजेंड्याने (कार्यक्रमाने) जागतिक राजकारणात केंद्रस्थान मिळवले होते. अगदी भांडवलदार वर्गाच्या सरकारांनाही ते कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या समाजवादाचे समर्थक आहेत असे भासवण्यावाचून गत्यंतर नव्हते. अशाप्रकारे, नव्याने स्वतंत्र झालेल्या हिंदुस्थानातील काँग्रेस पक्षाच्या सरकारने समाजवादी पद्धतीच्या उभारणीच्या नावाखाली राज्य पुरस्कृत भांडवलशाही विकासासाठी टाटा-बिर्ला योजना सादर केली.

अमेरिकन साम्राज्यवाद्यांच्या नेतृत्वाखालील जगातील भांडवलदारांनी समाजवादी व्यवस्था नष्ट करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. जेव्हा लष्करी पाऊले अयशस्वी झाली, तेव्हा त्यांनी कम्युनिस्ट पक्षांमध्ये त्यांच्या एजंटांचे पालन-पोषण करून, अंतर्गत विध्वंसाचा अवलंब केला. सोव्हिएत युनियनमध्ये समाजवादाच्या अधोगती आणि अंतिम विनाशासाठी सर्वात महत्त्वाच्या कारणांपैकी एक म्हणजे राज्याच्या मार्क्सवादी-लेनिनवादी सिद्धांतापासून सोव्हिएत युनियनच्या कम्युनिस्ट पक्षाचे दूर होणे.

1956 पासून, सोव्हिएत पक्षाच्या नेत्यांनी असा दावा करण्यास सुरुवात केली की सोव्हिएत राज्य आता सर्वहारा वर्गाच्या हुकूमशाहीचे राज्य राहिलेले नाही, तर “संपूर्ण लोकांचे राज्य” आहे. त्यांनी असा प्रबंध प्रसारित केला की सोव्हिएत युनियनमध्ये वर्ग संघर्षाची आता गरज नाही. भांडवलशाही देशांमधील कामगार वर्गासाठी त्यांनी समाजवादाच्या शांततापूर्ण आणि संसदीय मार्गाचा पुरस्कार करण्यास सुरुवात केली.

सर्वहारा वर्ग संघर्षाच्या मार्गापासून विचलित झाल्यामुळे सोव्हिएत युनियनमध्ये समाजवादाचा ऱ्हास झाला आणि भांडवलशाहीची पुनर्स्थापना झाली, ज्यामुळे 1991 मध्ये शेवटी त्याचे विघटन झाले. यामुळे समाजवाद मृत झाला आहे असे घोषित करणे आणि जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या श्रमिक वर्गाच्या अजेंड्याला बाहेर ढकलणे,  साम्राज्यवादी भांडवलशाहीला शक्य झाले.

सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यापासून, भांडवलशाही आणि भांडवलशाही लोकशाहीला पर्याय नाही असा दावा  जगातील भांडवलदार करत आहेत. तथापि, सर्व देशांतील कामगार वर्ग, शोषणमुक्त जगाची आणि साम्राज्यवादी युद्धांपासून मुक्त जगाची आकांक्षा बाळगत आहेत.

गेल्या 34 वर्षांत वारंवार पुष्टी झाली आहे की मानवजातीवर भांडवलशाही केवळ आपत्ती आणू शकते. युद्धमुक्त जगाचे भांडवलशाहीचे आश्वासन खोटे ठरले आहे. तथाकथित लोकहितकारी धोरणांद्वारे भांडवलशाही व्यवस्थेत कामगारांच्या कल्याणाची काळजी घेण्याच्या शक्यतेबद्दलचे सर्व भ्रम नष्ट झाले आहेत.

जागतिक स्तरावर साम्राज्यवादी व्यवस्थेचे सर्व विरोध अधिक तीव्र होत आहेत. शासक भांडवलदार वर्ग अराजकता आणि हिंसाचार पसरवल्याशिवाय राज्य करू शकत नाहीत. तथापि, कष्टकरी जनतेचा मोठा समुदाय त्यांच्या भयानक परिस्थितीला सोसण्यास तयार नाही. जग क्रांतिकारी वादळाकडे जात आहे याची ही चिन्हे आहेत.

कामगार वर्गाला येणाऱ्या क्रांतिकारी वादळांसाठी तयारी करण्याचे आवाहन आज काळ करत आहे. श्रमिक वर्गाचा क्रांतिकारी अजेंडा पुन्हा एकदा जागतिक राजकारणाच्या केंद्रस्थानी आणला पाहिजे. भांडवलदार वर्गाच्या समाजविरोधी आक्रमणाविरुद्धच्या संघर्षाला त्याच्या तार्किक निष्कर्षापर्यंत नेले पाहिजे – क्रांतीद्वारे भांडवलशाहीचा पाडाव आणि  समाजवादाची उभारणी.

2025 च्या मे दिनानिमित्त, आपण आपल्या सामान्य मागण्यांच्या सनदेभोवती आपल्या देशातील कामगार आणि शेतकऱ्यांची एकता आणखी मजबूत करण्याचा संकल्प करूया. राजकीय सत्ता हस्तगत करण्याच्या आणि भांडवलशाही आणि सर्व प्रकारच्या शोषण आणि दडपशाहीचा अंत करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या उपजीविकेच्या आणि हक्कांच्या रक्षणासाठी संघर्ष वाढवूया.

इंकलाब जिंदाबाद!

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *