खाजगीकरण आणि उदारीकरणाच्या कार्यक्रमाविरुद्ध एकजूट व्हा!

कामगार आणि शेतकऱ्यांची सत्ता स्थापन करण्यासाठी संघर्ष करा!

मे दिवस 2024 साठी हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे आवाहन

कामगार साथींनो!

मे दिन अशा वेळी जवळ येत आहे जेव्हा कामगार आणि शेतकरी भांडवलदार वर्गाच्या खाजगीकरण आणि उदारीकरण कार्यक्रमाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने करत आहेत. बेरोजगारीने अभूतपूर्व पातळी गाठली आहे. बहुतांश उपलब्ध नोकऱ्या सर्वात खालच्या दर्जाच्या आहेत. अन्न आणि इंधनाच्या झपाट्याने वाढणाऱ्या किमतींपुढे कामगारांचे पगार मागे पडत आहेत. शेतकऱ्यांना घटत्या उत्पन्नाचा आणि असह्य कर्जाच्या ओझ्याचा सामना करावा लागत आहे.

१८व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या मध्यावर मे दिवस आला आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राजग आणि काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडी, या राजकीय पक्षांच्या दोन्ही युत्या, कामगार आणि शेतकऱ्यांच्या ज्वलंत समस्या सोडविण्याचे आश्वासन देत आहेत. तथापि, त्यांच्या मागील कामाच्या ट्रॅक रेकॉर्डवरून असे दिसून येते की हे पक्ष मक्तेदार भांडवलदार घरांच्या नेतृत्वाखालील भांडवलदार वर्गाचा लोभ पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहेत.
भाजपचे नेते भ्रष्टाचारापासून मुक्ती मिळवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा दावा करतात, परंतु हा पक्ष इतर भांडवलदार पक्षांइतकाच भ्रष्ट असल्याचे इलेक्टोरल बाँड योजनेवरून दिसून येते. तथ्यांवरून हेच उघड होते की भ्रष्टाचार हा सध्याच्या व्यवस्थेचा अविभाज्य भाग आहे; या व्यवस्थेत अतिश्रीमंत भांडवलदार आणि सरकारचे प्रभारी राजकारणी यांच्यात जवळचे संबंध आहेत.

काँग्रेस पक्ष युवकांना नोकऱ्या देईल असा दावा करतो पण वाढत्या बेरोजगारीचे मूळ कारण असलेली भांडवलशाही व्यवस्था कायम ठेवण्यासाठी तो कटिबद्ध आहे.

बेरोजगारी, महागाई, कामगारांचे अधिक तीव्र होणारे शोषण आणि शेतकऱ्यांची लूट या समस्यांवर भाजपच्या नेतृत्वाखालील राजग किंवा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीकडे कोणतेही खरे उपाय नाहीत. मक्तेदार घरांच्या नेतृत्वाखालील भांडवलशाही व्यवस्था टिकवण्यासाठी त्या दोन्ही आघाड्या कटिबद्ध आहेत.

भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष गरीब कुटुंबांना मोफत अन्नधान्य आणि रोख रक्कम हस्तांतरित करण्यासारख्या विविध उपायांचे आश्वासन देत आहेत. ते कामगार आणि शेतकऱ्यांकडे भिकारी म्हणून पाहतात.

हिंदुस्थानाची संपत्ती निर्माण करणारे आपण सत्तेत असलेल्यांकडे उपकाराची भीक मागत नाही. आपण हक्क म्हणून सुरक्षित उपजीविका आणि सन्माननीय जीवनाची मागणी करत आहोत.

भाजप हमीबाबत बोलत आहे. मात्र, सध्याच्या व्यवस्थेत काम करण्याचा अधिकार किंवा नोकरीच्या सुरक्षिततेची हमी मिळूच शकत नाही. काम करणाऱ्यांना किमान वेतन मिळेलच याची शाश्वती नाही. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची किमान आधारभूत किंमत मिळेलच याची शाश्वती नाही. अतिश्रीमंत भांडवलदारांना जास्तीत जास्त नफ्याची हमी दिली जाते.

काँग्रेस पक्ष न्यायाचे आश्वासन देत आहे. मात्र, सध्याची शोषणकारी व अन्यायी व्यवस्था जोपर्यंत कायम आहे तोपर्यंत कष्टकरी जनतेला न्याय मिळू शकत नाही. सांप्रदायिक हिंसाचार घडवून आणणाऱ्यांना या व्यवस्थेत शिक्षा होत नाही, उलट दडपशाहीला विरोध करणाऱ्यांना तुरुंगात टाकले जाते.

कामगार साथींनो!

विद्यमान संसदीय व्यवस्थेत निवडणूक ही अशी प्रक्रिया नाही ज्याद्वारे जनता आपली इच्छा व्यक्त करते. ही एक अशी प्रक्रिया आहे जिच्यात भाजप आणि काँग्रेस पक्ष यांसारखे निहित स्वार्थाचे पक्ष भांडवलदार वर्गाचे द्वारपाल म्हणून काम करतात आणि कष्टकरी लोकांना निर्णय घेण्याच्या शक्तीपासून दूर ठेवतात.
उमेदवार निवडण्यात आपण कामगार, शेतकरी आणि इतर कष्टकरी लोकांची भूमिका नसते. निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड प्रतिस्पर्धी भांडवलदार वर्गाच्या पक्षांच्या हायकमांडद्वारे (सर्वोच्च पदाधिकाऱ्यांद्वारे) केली जाते. अतिश्रीमंत भांडवलदार या पक्षांना त्यांच्या निवडणूक प्रचारावर खर्च करण्यासाठी अब्जावधी रुपये देतात. कष्टकरी जनतेला या पक्षांच्या रॅलीसाठी मैदाने भरण्यासाठी सर्व संभाव्य प्रलोभने वापरली जातात. त्यांचे नेते एकामागून एक खोटे बोलतात आणि लोकांनी टाळ्या वाजवाव्यात अशी अपेक्षा असते. या रॅलींद्वारे, यातील प्रत्येक पक्ष सत्ताधारी भांडवलदार वर्गाला दाखवून देतो की जनतेला मूर्ख बनवण्यात तो आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा चांगला आहे.

जो पक्ष सरकार बनवतो तो आपल्या भांडवलदार धनदात्यांना जास्त समृद्ध करण्याचे काम करतो. ज्यांना त्यांचे प्रतिनिधी मानले जाते, त्यांच्यावर कामगार आणि शेतकऱ्यांचे अजिबात नियंत्रण नसते. जेव्हा ते आपल्या हिताच्या विरोधात उघडपणे वागतात तेव्हा आपण काहीही करू शकत नाही.
या व्यवस्थेतील निवडणुका सत्ताधारी भांडवलदार वर्गाला कार्यकारी सत्ता त्या पक्षाकडे किंवा युतीकडे सोपवण्याचे काम करतात जे भांडवलशाहीच्या लालसेची पूर्तता करण्याचा कार्यक्रम राबवताना लोकांना सर्वात प्रभावीपणे मूर्ख बनवू शकतील.

जीवनानुभव दाखवतो की भांडवलदार वर्गाच्या पक्षांनी त्यांच्या निवडणूक प्रचारात दिलेल्या कोणत्याही आश्वासनांवर आपण विश्वास ठेवू शकत नाही.
भाजपच्या नेतृत्वाखालील NDA किंवा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीने पुढील सरकार बनवले तरी ते जास्तीत जास्त नफ्यासाठी भांडवलदारांची लालूच पूर्ण करण्याचे काम करेल. कामगारांचे शोषण, शेतकऱ्यांची लूट आणि आपल्या देशाच्या नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट अधिक तीव्र करून ते असे करेल.
सरकार कोणीही बनवलं तरी आपल्याला खाजगीकरण आणि उदारीकरण कार्यक्रमाविरुद्धचा संघर्ष वाढवावा लागेल. आपली उपजीविका आणि हक्क यांच्या रक्षणासाठी आपली संघर्षरत एकजूट आपल्याला आणखी मजबूत करावी लागेल. भांडवलदार वर्गाविरुद्ध आणि आपल्या समान मागण्यांभोवती कामगार आणि शेतकऱ्यांची एकजूट आपल्याला आणखी मजबूत करावी लागेल.

राजकीय सत्ता काबीज करण्याच्या आणि हिंदुस्थानाचे मालक बनण्याच्या उद्देशाने आपल्याला लढायचे आहे. तरच भांडवलशाही शोषण, जातिभेद, स्त्रियांवरील अत्याचार, धर्म, भाषा, संस्कृती इत्यादींच्या आधारे लोकांचा छळ करणाऱ्या शोषक आणि जुलमी व्यवस्थेपासून आपण मुक्त होऊ शकतो. तरच आपण सुनिश्चित करू शकू की अर्थव्यवस्था भांडवलदारांच्या लोभासाठी नव्हे तर संपूर्ण लोकांच्या सतत वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्रित असेल.

कामगार साथींनो,

आपल्या क्रांतिकारक पूर्वजांनी हिंदुस्थानाचे मालक होण्याच्या उद्देशाने वसाहतवादी राजवटीविरुद्ध लढा दिला. वसाहतवाद्यांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी राजकीय सत्ता आपल्या हातात असणे ही आवश्यक अट आहे हे त्यांना माहीत होते. म्हणूनच 1857 च्या महान क्रांतीमध्ये उठाव करणाऱ्यांनी “हम हैं इसके मलिक, हिंदुस्तान हमारा!” अशी घोषणा दिली.

हिंदुस्थानाला वसाहतवादी राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले तेव्हा आपण हिंदुस्थानी लोक मालक बनलो नाही. मोठे भांडवलदार आणि मोठे जमीनदार यांच्या नेतृत्वाखाली भांडवलदार वर्ग मालक बनला. संविधान सभेत बसलेल्या त्यांच्या प्रतिनिधींनी एक संविधान तयार केले ज्याने लोकांवर त्यांचे राज्य कायदेशीर केले. ब्रिटन आणि इतर पुढारलेल्या भांडवलशाही देशांच्या अनुभवातून शिकून, त्यांनी त्यांच्या हुकूमशाहीचा वापर करण्यासाठी सर्वात जो उपयुक्त प्रकार आहे अशा बहु-पक्षीय प्रातिनिधिक लोकशाहीचा स्वीकार केला. ही एक अशी व्यवस्था आहे जी लोकांच्या मनात असा भ्रम निर्माण करते की राजकीय सत्तेत त्यांची भागीदारी आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र लोकांना निर्णय घेण्याच्या शक्तीपासून दूर ठेवले जाईल हे सुनिश्चित करण्यात येते.

जोपर्यंत आपण कामगार आणि शेतकरी राजकीय सत्ता आपल्या हातात घेत नाही तोपर्यंत सर्व प्रकारच्या शोषण आणि अत्याचाराचा अंत करण्याची आपल्या लोकांची जुनी आकांक्षा अपूर्णच राहील.

आपल्या हातात राजकीय सत्ता आल्यावर आपण भांडवलदार वर्गाच्या हातून उत्पादनाची प्रमुख साधने काढून घेतली पाहिजेत आणि त्यांना सामाजिक नियंत्रणाखाली ठेवले पाहिजे. संपूर्ण समाजाच्या सतत वाढणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला अर्थव्यवस्थेला नव्या दिशेने चालवावे लागेल.
आपण नवीन संविधानावर आधारित आधुनिक लोकशाही प्रस्थापित केली पाहिजे जी लोकांच्या मानवी आणि लोकशाही अधिकारांची हमी देईल. निर्णय घेण्याची शक्ती लोकांच्या हातात आहे याची खात्री केली जाईल. निवडणुकीला उभे राहण्यास पात्र उमेदवारांची यादी मतदारांनी निवडली पाहिजे. ज्यांचे काम असमाधानकारक आहे अशा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याचा अधिकार, तसेच नवीन कायदे प्रस्तावित करण्याचा अधिकार आपल्याला असायला हवा.

नवीन प्रणालीमध्ये, कार्यकारी अधिकार असलेले मंत्री निवडून आलेल्या विधान मंडळाला जबाबदार असतील आणि सर्व निवडून आलेले प्रतिनिधी मतदारांना जबाबदार असतील. कोणत्याही उमेदवाराच्या निवडणूक प्रचारासाठी खासगी निधी मिळणार नाही. उमेदवार निवडण्याच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी आणि निवडलेल्या उमेदवारांच्या निवडणूक प्रचारासाठी राज्ययंत्रणा वित्तपुरवठा करेल.

कामगार साथींनो!

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी मे दिनानिमित्त सर्व देशांतील संघर्षरत कामगारांना सलाम करते!

जगातील सर्व भांडवलशाही देशात कष्टकरी लोक त्यांच्या उपजीविकेसाठी आणि हक्कांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरत आहेत. अमेरिकन साम्राज्यवादाच्या पाठिंब्याने इस्रायलने पॅलेस्टिनी लोकांविरुद्ध सुरू केलेल्या नरसंहारासह साम्राज्यवादी प्रायोजित युद्धांना ते विरोध करत आहेत.
सर्वच भांडवलशाही देशांत बहुपक्षीय लोकशाहीची व्यवस्था दिवसेंदिवस बदनाम होत आहे. सर्वात मोठ्या मक्तेदारी भांडवलदारांच्या नेतृत्वाखाली भांडवलदार वर्गाची ती हुकूमशाही आहे हे उघड होत आहे. परिस्थिती कामगार वर्गाला एक नवीन व्यवस्था स्थापन करण्यासाठी संघर्षाचे नेतृत्व करण्यासाठी आवाहन करत आहे जिच्यात निर्णय घेण्याची शक्ती लोकांच्या हातात असेल.

कामगार साथींनो!

आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी अथक संघर्ष करण्याचा आपण संकल्प करूया!

उदारीकरण आणि खाजगीकरण कार्यक्रमाविरुद्धचा आपला एकत्रित लढा पुढे करूया!

हिंदुस्थानचे मालक बनण्यासाठी संघटित होऊ या!

हम हैं इसके मलिक, हम हैं हिंदुस्तान,
मजदूर, किसान, औरत और जवान!

Share and Enjoy !

Shares

One comment

  1. अफूची गोळी घेऊन धर्मांध झालेला समाज कष्ट संघर्ष करून देशाला उन्नतीचा मार्गावर नेण्याच सोडून धर्मा समोर मानवता शूद्र समजून सामाजिक संवेदनशीलता शून्य करून ठेवली आहे. त्यामुळे न्यायव्यवस्था पोलीस प्रशासन राजकीय सत्ताधारी हे मोजक्या भांडवलदारांच्या हातातील बाहुले बनले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *