कार्ल मार्क्स यांचा जन्म २०८ वर्षांपूर्वी, ५ मे रोजी झाला होता. तरीही त्यांचे विचार आधुनिक आणि समकालीन आहेत. जागतिक आर्थिक संकट, मानवी जीवनाचा आणि पर्यावरणाचा प्रचंड विनाश, यांवरून हेच स्पष्ट होते की भांडवलशाहीकडून समाजवाद आणि कम्युनिझमकडे जाणाऱ्या क्रांतिकारी परिवर्तनाची आवश्यकता आहे.
संकटग्रस्त भांडवलशाही
जगभरात, भांडवलशाहीचे अंतर्निहित अंतर्विरोध स्पष्टपणे उघड होत आहेत, जे सध्या अत्यंत तीव्र आहेत. अभूतपूर्व तांत्रिक प्रगती झाली असूनही, कोट्यवधी लोक शोषण, गरिबी आणि कुपोषणाने ग्रस्त आहेत. मार्क्सचा सिद्धांत वारंवार खरा ठरत आहे. वेतनावर काम करणाऱ्या मजुरांचे शोषण हा भांडवलशाही नफ्याचा स्रोत आहे. एका टोकाला संपत्तीचे उत्पादन आणि दुसऱ्या टोकाला गरिबी व दुःखाची वाढ हा भांडवलशाही संचयनाचा एक सामान्य नियम आहे.
बेरोजगारी आणि अर्ध-बेरोजगारी अभूतपूर्व पातळीवर पोहोचली आहे. तरुण कामगार असुरक्षित तात्पुरत्या कामांमध्ये, तथाकथित गिग कामांमध्ये आणि अनिश्चित कामगार करारांमध्ये अडकले आहेत, ज्यामुळे त्यांची नोकरीची सुरक्षितता, हक्क आणि प्रतिष्ठा पूर्णपणे हिरावली गेली आहे. या घटना मार्क्सच्या या मूल्यांकनाची सत्यता सिद्ध करतात की भांडवलशाहीला बेरोजगारांच्या राखीव सैन्याची गरज असते आणि ती असे राखीव सैन्य तयार करते, ज्याचा दुरुपयोग भांडवलदार कामगारांचे वेतन कमी करण्यासाठी करतात .
समाज पूर्वीपेक्षा अधिक संपत्ती निर्माण करतो, तरीही समाजातील मोठा हिस्सा त्याच्या लाभांपासून वंचित राहतो, हा विरोधाभास अगदी उघड दिसतो. विषमतेने विकृत स्वरूप धारण केले आहे. एक छोटा जागतिक उच्चभ्रू वर्ग प्रचंड संपत्ती जमा करत आहे, तर दुसरीकडे कोट्यवधी कष्टकरी जनता कसेबसे जगण्यासाठी संघर्ष करत आहे.
वाढत्या आर्थिक संकटामुळे भांडवल आणि कामगार यांच्यात, तसेच प्रतिस्पर्धी साम्राज्यवादी राज्यांमध्ये संघर्ष अधिक तीव्र होत आहे. सत्ताधारी भांडवलदार वर्ग आपली शोषक व्यवस्था टिकवण्यासाठी आणि स्वतःला अधिक श्रीमंत करत राहण्यासाठी प्राणघातक युद्धे, क्रूर दमन आणि विविध राक्षसी पद्धतींचा अवलंब करत आहे.
आजची युद्धे अधिकाधिक संसाधनांवरील नियंत्रणासाठी केली जातात. पश्चिम आशियापासून आफ्रिकेपर्यंत आणि त्यापलीकडेही साम्राज्यवादी शत्रुत्व व चढाओढ तीव्र होत आहे. तेल, दुर्मिळ खनिजे, पाणी या सर्वांच्या स्रोतांवर आणि मोक्याच्या व्यापारी मार्गांवर वर्चस्व आणि नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी, जगातील प्रमुख शक्ती संघर्ष करत आहेत. हे एकमेकांपासून वेगळे संघर्ष नाहीत; तर हे साम्राज्यवादाच्या सर्वोच्च टप्प्यातील भांडवलशाहीचे प्रकटीकरण आहे, जिथे अधिकाधिक संचयासाठी वर्चस्वाची गरज असते.
पर्यावरणाचा ऱ्हास हा या संकटाचा आणखी एक पदर आहे. नफ्याच्या अथक हव्यासाने नैसर्गिक पर्यावरणाला धोक्याच्या उंबरठ्यावर ढकलले आहे, ज्यामुळे मानवी अस्तित्वाच्या मूलभूत परिस्थितीलाच धोका निर्माण झाला आहे.
मूलभूत विरोधाभास आणि त्याचे निराकरण
मार्क्सने ओळखले की, उत्पादनाचे सामाजिक स्वरूप आणि उत्पादन साधनांची खाजगी मालकी, हा भांडवलशाहीतील मूलभूत विरोधाभास आहे. श्रमिकांच्या शोषणाद्वारे भांडवलशाही नफा वाढवण्याचा प्रमुख हेतू हा उत्पादक शक्तींच्या अखंड विकासासाठी एक अडथळा आहे आणि यामुळे वारंवार अति-उत्पादनाची संकटे येतात. अशा संकटांच्या काळात भांडवलदार उत्पादन कमी करतात आणि उत्पादक शक्ती नष्ट होतात, कारण भांडवलदारांना जे विकायचे असते ते विकत घेण्यासाठी कष्टकरी लोकांच्या हातात क्रयशक्ती नसते.
कोणत्या पद्धतीने भांडवलशाहीचा मूलभूत विरोधाभास सोडवला जाऊ शकतो आणि सोडवलाच पाहिजे, हे मार्क्सने दाखवून दिले. उत्पादनाच्या साधनांची खाजगी मालकी संपुष्टात आणून तिला सामाजिक मालमत्तेत रूपांतरित केली पाहिजेत, ज्यामुळे भांडवलशाही नफा वाढवण्याऐवजी सामाजिक गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने उत्पादन केंद्रित करणे शक्य होईल. मार्क्सने श्रमजीवी वर्गाला असा क्रांतिकारक वर्ग म्हणून ओळखले, कारण समाजाचे भांडवलशाहीतून समाजवादाकडे रूपांतरित करण्यात त्याचे हित आहे आणि त्यासाठी नेतृत्व करण्याची क्षमताही आहे.
“कम्युनिस्ट क्रांतीपुढे सत्ताधारी वर्ग थरथर कापुदे. श्रमजीवी वर्गाकडे त्याच्या साखळ्यांशिवाय गमावण्यासारखे काहीही नाही. त्यांना जिंकण्यासाठी एक जग आहे. सर्व देशांतील कामगारांनो, एक व्हा!” कार्ल मार्क्स आणि त्यांचे सहकारी फ्रेडरिक एंगल्स यांनी लिहिलेल्या या अजरामर शब्दांनी ‘कम्युनिस्ट जाहीरनामा’ चा समारोप केलाय . हे शब्द आजही हिंदुस्थान आणि इतर भांडवलशाही देशांतील श्रमजीवी वर्गाच्या मनाला भिडत आहेत. सत्ताधारी भांडवलदार वर्गाविरुद्धचा त्यांचा संताप शिगेला पोहोचत आहे.
जगभरात कामगार शोषणाविरुद्ध लढत आहेत. भांडवलशाही मक्तेदारीच्या वाढत्या वर्चस्वाला शेतकरी प्रतिकार करत आहेत. लोक असमानता आणि अन्यायकारक युद्धांविरुद्ध उभे राहत आहेत. ते नैसर्गिक आणि सामाजिक पर्यावरणाचा विनाश थांबवण्याची मागणी करत आहेत.
वर्गसंघर्ष ही सामाजिक विकासाची प्रेरक शक्ती आहे हे आपल्या आधीच्या विचारवंतांनी ओळखले होते हे मान्य करून, मार्क्सने अद्वितीय असा निष्कर्ष काढला; तो म्हणजे आधुनिक समाजातील वर्गसंघर्ष हा समाजातील सर्व वर्गभेदांच्या निर्मूलनाची नांदी म्हणून, अपरिहार्यपणे भांडवलदार वर्गाच्या हुकूमशाहीचा पाडाव करून श्रमजीवी वर्गाच्या हुकूमशाहीची स्थापना करेल.
भांडवलदार वर्ग सतत ही खोटी गोष्ट पसरवतो की मार्क्सचे सैद्धांतिक निष्कर्ष आणि शिकवण कालबाह्य झाले आहेत आणि आता ते वैध राहिलेले नाहीत. नरभक्षक आणि संकटग्रस्त भांडवलशाही व्यवस्थेचे आयुष्य वाढवणे हा त्यांचा त्यामागील उद्देश आहे. भांडवलशाही उलथवून टाकण्याच्या आणि नवीन समाजवादी समाज उभारण्याच्या संघर्षात मार्गदर्शन करण्यासाठी श्रमजीवी वर्गाला क्रांतिकारी सिद्धांताने सुसज्ज होण्यापासून रोखण्याची त्यांची इच्छा आहे.
निष्कर्ष
मार्क्स यांच्या २०८ व्या जयंतीनिमित्त, जागतिक स्तरावरील सद्यस्थिती या गोष्टीवर शिक्कामोर्तब करते की, मानवजातीला विनाशापासून वाचवण्यासाठी त्यांच्या सिद्धांताची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे किती निकडीचे झाले आहे. संकटांनी वेढलेल्या या जगात, त्यांचे विश्लेषण स्पष्टता प्रदान करते. नैराश्याच्या गर्तेत असताना, ते परिवर्तन आणि प्रगतीच्या शक्यतांकडे निर्देश करते.
मानवजातीसमोर असलेला पर्याय आता अधिकाधिक स्पष्ट आणि ठळक झाला आहे: एकतर वाढते शोषण, खोलवर रुजलेली विषमता, अंतहीन युद्धे आणि नैसर्गिक व सामाजिक पर्यावरणाचा विनाश यांनी घडवलेले भविष्य; किंवा मग सहकार्य, उत्पादनाच्या साधनांची सामूहिक मालकी आणि कष्टकरी जनतेचे राजकीय सत्तेवर व निर्णयप्रक्रियेवर असलेले नियंत्रण यांवर आधारलेले भविष्य. मार्क्स यांचा वारसा हा पर्याय आपल्यासमोर अत्यंत स्पष्टपणे मांडतो – तो म्हणजे भांडवलशाही उलथवून टाकण्यासाठी आणि एका नव्या समाजवादी समाजाची उभारणी करण्यासाठीच्या संघर्षात स्वतःला झोकून देणे, आणि त्याद्वारे मानवजातीसाठी एका नव्या भविष्याच्या निर्मितीमध्ये सक्रिय सहभाग घेणे.
