हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, २६ एप्रिल २०२५
२२ एप्रिल २०२५ रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भयंकर दहशतवादी हल्ल्यात किमान २६ जणांचा मृत्यू झाला. अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत.
निष्पाप लोकांवरील या क्रूर हल्ल्याचा हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी संपूर्ण देशातील लोकांबरोबर निषेध करते. पीडितांच्या प्रियजनांकडे पार्टी मनापासून शोक व्यक्त करते.
काश्मीर आणि देशभरातील लोकांनी आणि राजकीय शक्तींनी या हल्ल्याचा आपल्या संपूर्ण समाजावर हल्ला म्हणून निषेध केला आहे. काश्मीरमधील एका पर्यटक मार्गदर्शकाने पर्यटकांच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी आपल्या जीवाचे कसे बलिदान दिले आणि काश्मीरमधील लोक पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी कसे पुढे आले याच्या हृदयस्पर्शी कथा समोर आल्या आहेत.
केंद्र सरकार आणि त्याच्या गुप्तचर संस्थांनी या भयंकर हल्ल्याची चौकशी करून त्या हल्याचे आयोजन करणाऱ्यांना हुडकून काढणे आवश्यक आहे.
देशातील जनतेने आणि सर्व राजकीय शक्तींनी शांत राहणे आणि चिथावणीला बळी न पडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या दहशतवादी हल्ल्यामागील एक उद्दिष्ट म्हणजे आपल्या देशातील लोकांमध्ये धर्माच्या आधारावर फूट पाडणे आणि सांप्रदायिक संघर्ष भडकवणे. त्यांच्या धार्मिक श्रद्धा काहीही असल्या तरी आपल्या देशातील लोकांनी, दहशतवादी हल्ल्याच्या आयोजकांचा हा घृणास्पद हेतू हाणून पाडला पाहिजे.
आपल्या देशाचे शत्रू हिंदुस्थानाला पाकिस्तानशी युद्ध करण्यास उद्युक्त करू इच्छितात. यामध्ये अमेरिकेच्या उच्च सरकारी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. अशा वेळी जेव्हा तपास नुकताच सुरू झाला आहे, तेव्हा आपल्या देशातील मक्तेदार भांडवलदारांच्यानियंत्रित वृत्तवाहिन्या आधीच पाकिस्तानवर “बदला” घेण्याची मागणी करत आहेत. दहशतवादी हल्ला कोणी घडवला हे अद्याप निर्विवादपणे उघड झालेदेखील नाही.
आपल्या देशाच्या स्वातंत्र्य आणि फाळणीनंतरच्या गेल्या ७८ वर्षांच्या अनुभवावरून असे दिसून येते, की अँग्लो अमेरिकन साम्राज्यवाद्यांनी नेहमीच हिंदुस्थान आणि पाकिस्तानला एकमेकांविरुद्ध उभे करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून दोन्ही देशांवर वर्चस्व गाजवण्याचे त्यांचे ध्येय साध्य होईल. आपल्या देशातील जनता आणि राजकीय शक्तींनी या सापळ्यात अडकता कामा नये.
