जिथे कोणत्याही प्रकारचे शोषण किंवा दमन नसेल अशा हिंदुस्थानासाठी एकजुटीने लढूया!

हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, 1 मे, 2020

कामगार साथींनो!

मे दिन, 2020च्या निमित्ताने हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी जगातील सर्व कामगारांना सलाम करते, खास करून त्यांना जे या जागतिक संकटाच्या काळी स्वतःच्या जीवाला धोका पत्करून आरोग्य सेवा व इतर अत्यावश्यक सेवा प्रदान करत आहेत. लॉकडाउनच्या काळात लोकांच्या सर्व गरजा पुरविण्यासाठी जे काबाडकष्ट करत आहेत अशा आपल्या देशातील डॉक्टर, नर्स, रुग्णालयातील इतर कामगार, सहाय्यक नर्स सुईणी, आंगणवाडी कामगार, आशा व आरोग्य क्षेत्रातील इतर कामगार, भारतीय रेलचे कामगार, बँक कामगार, म्युनिसिपल व इतर अत्यावश्यक सेवांतील सर्व कामगार, या सर्वांना आम्ही सलाम करतो.

कोट्यावधी मानवांच्या जीवांवर उदार होऊन अतिश्रीमंत अल्पसंख्यकांना अधिकाधिक गब्बर बनविण्यासाठी काम करणारी अमानुष प्रणाली, म्हणून आज जागतिक स्तरावर भांडवलशाहीचा पूर्ण पर्दाफाश झालेला आहे. कोव्हिडसारख्या महामारीसमक्ष समाजातील सर्व लोकांच्या आरोग्याचे व कल्याणाचे जतन करण्यास ते अजिबात सक्षम नाहीत, असा बहुतेक सर्व भांडवलदारी सरकारांचा पर्दाफाश झालेला आहे.

आपल्या देशात, कोरोनाविरुद्ध संघर्ष सुरु होऊन जवळ जवळ दीड महिना लोटलेला आहे. पण रुग्णालये आपल्या स्वतःच्या कामगारांचे रक्षण करण्यास सक्षम नाहीत. दररोज ह्या रोगाचे बळी बनलेल्या नर्सेस आणि डॉक्टरांच्या संख्येत अजून वाढ झाल्याच्या बातम्या येत आहेत. आरोग्य सेवा क्षेत्रातील सर्व कोमगारांसाठी च्च्म् अर्थात स्वतःच्या संरक्षणासाठीची उपकरणे अजून पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाहीत. शिवाय आपल्या कामाच्या ठिकाणच्या भयानक परिस्थितीविषयी आवाज उठवणाऱ्या या क्षेत्रातील कामगारांना शिक्षेची धमकी दिली जाते.

या वर्षीच्या 25 मार्चपासून अचानक घोषित केलेल्या लॉकडाउनने करोडो कामगारांना हताश बनवलेले आहे. त्यांच्याकडे ना काम आहे, ना पैसा, व अनेकांकडे सुरक्षित घरदेखील नाही. कोणत्याही प्रकारचे कायदेशीर अधिकार नाहीत, व कोणत्याही प्रकारची कामाची किंवा सामाजिक सुरक्षा नाही, अशा भयंकर परिस्थितीत आपल्या देशातील कोट्यावधी कामगार कसे उत्पादक काम करतात, याचा लॉकडाउनने पर्दाफाश केला आहे. आपल्या गावी पायी चालत जाऊ पाहणाऱ्या कामगारांना राज्यांच्या सीमांवर रोखण्यात आलेले आहे. शेकडो किलोमीटर चालत जाऊन पोहोचण्याच्या प्रयासात त्यांच्यापैकी काहीजण अति थकव्याने किंवा भुकेमुळे मरण पावले आहेत. अनेक जणांना अस्थायी छावण्यांत कैद्यांप्रमाणे डांबून ठेवण्यात आलेले आहे. आणि आता अलिकडेच आलेल्या सूचनेवरून त्यांना आता बंधपात्रित कामगारांप्रमाणे किंवा गुलामांप्रमाणे राबवण्यात येणार आहे.

बहुसंख्य कामगार झोपडपट्ट्यांमध्ये व दाटीवाटींच्या वस्त्यांमध्ये राहतात, जिथे ना पुरेसा पाणी पुरवठा असतो व ना योग्य सांडपाण्याची व्यवस्था. व्यक्तीव्यक्तीमध्ये अंतर ठेवा, परत परत हात धुवा, अशा प्रकारच्या सूचनांचे पालन करणे त्यांना प्रत्यक्षात अशक्य असते. त्यामुळे ज्यांना रोग जडतो त्यांना राज्याचे अधिकारी गुन्हेगारांप्रमाणे वागवतात. हजारो गरीब कष्टकऱ्यांना त्यांच्या घरांपासून दूर केलेले आहे व अतिशय अस्वच्छ परिस्थितीत व प्रतिकूल वातावरणात राहण्यास भाग पाडलेले आहे.

कामगारांना आपले पगार मिळावेत याची हमी देण्यासाठी सरकारने पैशाची कोणतीही तरतूद केलेली नाही. कामगारांना काढून टाकू नका व लॉकडाउनच्या काळातील पगारांपासून त्यांना वंचित ठेवू नका, अशी पंतप्रधानांनी भांडवलदारांना केवळ विनंती केली आहे. त्यांच्या शब्दांचा परिणाम शून्य आहे. त्यांना जर तसे करण्यास भाग पाडले नाही तर भांडवलदार आपल्या नफ्यांचा त्याग करून कामगारांच्या गरजा अजिबात पुरविणार नाहीत. खरे तर भांडवलदारांच्या काही संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात या विनंतीला आव्हान दिलेले आहे.

शेतकऱ्यांच्या उपजीविकांवर लॉकडाउनचा भयानक परिणाम पडलेला आहे. कृषी बाजार बंद झाल्याने देशभरातील लाखो शेतकऱ्यांना टाकाऊ दरांत आपली पिके विकावी लागली आहेत. मिठाई दुकाने बंद झाल्याने दुधोत्पादकांना टनांनी दूध रस्त्यावर ओतून टाकावे लागले आहे.

भारतीय खाद्य निगमाची गोदामे गहू-तांदळाच्या रेकॉर्ड उत्पादनामुळे तुडुंब भरून फुटण्याच्या बेतावर आहेत. तरीही कोट्यावधी राबणारी लोकं उपाशी आहेत. हे काही नव्याने घडलेले नाही. ही जुनी समस्या आहे, जिचा आता जबरदस्त पर्दाफाश झालेला आहे. यावरून दिसते की पंतप्रधान “सब का साथ, सब का विकास” हे जरी पुन्हा पुन्हा घोकत असले तरी आर्थिक प्रणाली व सरकारी धोरणेही सर्वांच्या गरजा पुरवण्याच्या अनुषंगाने नाहीत. कष्टकऱ्यांकडून किंमत वसूल करून भांडवलदारांचे खाजगी फायदे जास्तीत जास्त वाढवण्यासाठीच ते आहेत.

सुमारे शंभर वर्षांपूर्वीपासून, जेव्हा आपल्या देशात प्रथम मे दिन साजरा करण्यात आला होता तेव्हापासून, वसाहतवादी राज्याचा व भांडवलदारी प्रणालीचा अंत करून सर्व प्रकारच्या शोषण-दमनापासून मुक्त अशा हिंदुस्थानाची रचना करणे, हे कामगार वर्गाचे रणनैतिक ध्येय आहे. या उदात्त ध्येयासाठी संधर्ष तीव्र करा, ही विद्यमान परिस्थितीची आपल्याला ललकार आहे.

कामगार साथींनो!

जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेली आपण लोकशाही आहोत, असा त्याचा दावा जरी असला, तरी हिंदुस्थानी राज्य प्रत्यक्षात मात्र टाटा, अंबानी, बिर्ला व इतर मक्तेदार भांडवलदार घराण्यांच्या नेतृत्वाखालील भांडवलदार वर्गाची हुकूमशाही आहे. राज्य त्यांच्या हिंतांना जोपासते. सरकार त्यांच्या मागण्या पुरवते. सरकार काम करण्याऱ्या लोकांच्या मूलभूत अधिकारांना रोज पायदळी तुडवते.

ज्या प्रकारे सर्वहिंद लॉकडाउन अवघ्या चार तासांची सूचना देऊन घोषित करण्यात आला, अचानक ज्यांची उपजीविका हिसकावून घेण्यात आली त्या लोकांना सांभाळण्यासाठी अजिबात तयारी करण्यात आली नाही, त्यावरून स्पष्ट होते की राज्याला त्यांची अजिबात पर्वा नाही. त्याला केवळ सत्ताधारी वर्ग व त्याची हिते जोपासायची आहेत. 2016 साली ज्या प्रकारे नोटाबंदी करण्यात आली, त्याच प्रकारे लोकांशी विचारविमर्ष केल्याविना व त्यांना अजिबात पूर्वसूचना दिल्याविना सर्वांवर गंभीर परिणाम ज्याचे होतील असा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.

जे कोणी तक्रार करतं किंवा जो कोणी सरकारच्या कोणत्याही कृतीची टीका करतं, त्याला “राष्ट्रद्रोही” घोषित करण्यात येतं. ट्रेड यूनियन नेत्यांना, विद्यार्थी नेत्यांना, मानवाधिकार कार्यकर्त्यांना व लोकांच्या अधिकारांसाठी लढणाऱ्या इतरांना अटक करण्यासाठी काळ्या कायद्यांचा वापर करण्यात येतो. ज्यांनी कोणताही गुन्हा केला नाही व केवळ सरकारला विरोध व्यक्त केला, अशा लोकांची अटक व अनिश्चित काळासाठी प्रतिबंधात्मक नजरकैद होते, यावरून हिंदुस्थानी राज्याचा पूर्णतः लोकविरोधी स्वभाव स्पष्ट होतो.

त्यांच्या धार्मिक आस्थांपायी लोकांना छळण्यात येते. राज्य खोटा प्रचार करून मुसलमानांच्या बाबतीत इतर लोकांमध्ये घृणा व द्वेष पसरवते. राज्याने संघटित केलेले सांप्रदायिक जनसंहारासारखे राक्षसी गुन्हे करूनही भांडवलदार ज्यांना धनबळ देतात अशा पाट्र्या सहीसलामत सुटतात.

या असह्य परिस्थितीचा जी अंत करेल, अशा क्रांतीची आज नितांत गरज आहे. भांडवलदार वर्गाचे राज्य उलथवून, कामगार-शेतकऱ्यांचे राज्य प्रस्थापित करून, आपण भांडवलशाहीचे समाजवादात परिवर्तन केले पाहिजे. आपल्या श्रमाच्या व भूमीच्या शोषणाचा व लुटीचा अंत करण्यासाठी अशी क्रांती हा एकमेव पर्याय आहे. कष्ट करणऱ्या लोकांनी निर्माण केलेली संपत्ती आपल्या राहण्याची व काम करण्याची परिस्थिती सुधारण्यासाठी वापरली जाईल याच्या हमीसाठी हाच एकमेव पर्याय आहे.

कामगार-शेतकऱ्यांच्या शासनाच्या राज्याने सर्वांच्या मानवाधिकारांच्या व लोकशाही अधिकारांच्या सुरक्षेची हमी दिली पाहिजे, व धर्म, जात किंवा लिंगावर आधारित सर्व प्रकारच्या भेदभावाचा व दमनाचा अंत केला पाहिजे. त्याने हिंदुस्थानाला साम्राज्यवादी प्रणालीतून बाहेर काढले पाहिजे व आत्मनिर्भर समाजवादी अर्थव्यवस्थेच्या निर्मितीसाठी संघटन केले पाहिजे. जागतिक स्तरावर इतर सर्व साम्राज्यवादविरोधी शक्तींच्या सहयोगाने त्याने सातत्याने सर्व प्रकारच्या साम्राज्यवादी लुटीचा व वर्चस्वाचा आणि युद्धाचा विरोध केला पाहिजे.

कामगार साथींनो!

कोरोना संकटाचा व सध्याच्या करोडो कामगारांच्या नाजुक परिस्थितीचा फायदा घेऊन भांडवलदार वर्ग आपल्या अधिकारांवर जोरदार आक्रमण योजत आहे. फॅक्टऱ्यांमधील पाळ्या 8 तासांवरून 12 तास करा, हे भांडवलदारांच्या संघटनांनी केलेल्या प्रस्तावांपैकी एक आहे. किंबहुना पंजाब, राजस्थान, गुजरात व उत्तराखंडसकट कैक राज्य सरकारांनी अशा सूचना जाहीर केल्या आहेत. केंद्र सरकार औद्योगिक विवाद कायद्यात दुरुस्तीदेखील करायचा विचार करत आहे, जेणेकरून कामगारांना भरपाई न देता त्यांना फॅक्टऱ्या व कंपन्या बंद करता येतील. येत्या दोन वर्षांपर्यंत कामगारांना यूनियन बनवण्यावर प्रतिबंध असावा, अशी मागणीदेखील भांडवलदार करत आहेत.

आपले एकजुट संघर्ष जास्त प्रबळ बनवणे, ही काळाची गरज आहे. आपल्यामध्ये फूट पाडण्याच्या व आपली दिशाभूल करण्याच्या सर्व प्रयासांना बळी न पडता कामगार वर्गाच्या एकतेचे रक्षण करण्याची गरज आहे. मुसलमानांवर दोषारोप करणारा खोटा प्रचार व आपल्या समस्यांसाठी पाकिस्तान किंवा चीनवर आरोप करणे, हा ह्याच प्रयासांचा एक भाग आहे. आपण हे तथ्य कधीही विसरता कामा नये की या काळात आपल्या सर्व समस्यांचे मूळ म्हणजे हिंदुस्थानी भांडवलदार वर्ग व त्याचा धोकादायक साम्राज्यवादी रेटा होय. आपले रणनैतिक राजकीय ध्येय आहे भांडवलदार वर्गाला सत्तेपासून दूर करून त्याच्या जागी कामगार-शेतकऱ्यांचे राज्य बसवणे.

मे दिन 2020च्या निमित्ताने हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी कामगार वर्गाच्या सर्व विभागांना ललकारते की कामगार-शेतकऱ्यांचे राज्य प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने आपल्या अधिकारांच्या रक्षणासाठी संघर्ष वाढवूया! भांडवलशाहीला उलथून कोणत्याही प्रकारचे जिथे दमन-शोषण नसेल अशा समाजवादी हिंदुस्थानाच्या निर्माणाच्या कार्यक्रमाभोवती सर्व कष्टकरी व दडपलेल्या लोकांना जोडताना सर्व कम्युनिस्टांना एकजूट होण्यास आम्ही ललकारतो!

कामगार एकतेचा विजय असो!

इंकलाब झिंदाबाद!

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published.