हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, ५ ऑगस्ट २०२३
हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी हरियाणाच्या मेवात भागात झालेल्या सांप्रदायिक हिंसाचाराचा तीव्र धिक्कार करते आणि पीडितांच्या कुटुंबीयांप्रती मनापासून शोक व्यक्त करते.
३१ जुलै रोजी नूह जिल्ह्यातून सुरू झालेला हा हिंसाचार पुढील दोन दिवसांत गुरुग्राम आणि पलवलपर्यंत पसरला. यात किमान ६ जणांना आपला जीव गमवावा लागला असून अनेक जण जखमी झाले आहेत. शेकडो लोकांची वाहने आणि दुकाने जाळण्यात आली आहेत. या जिल्ह्यांतून हजारो कष्टकरी लोकांना जबरदस्तीने स्थलांतरित व्हावे लागले आहे.
हरियाणा सरकारने विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने काढलेल्या मिरवणुकीला म्हणजेच ‘शोभा यात्रेला’ नूह जिल्ह्यातून जाण्याची परवानगी दिली. समाज माध्यमांवर अत्यंत प्रक्षोभक द्वेष मोहीम सुरू असताना कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. फेब्रुवारीमध्ये नासिर आणि जुनैद या दोन निरपराध व्यक्तींचा झुंडबळी दिल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीने आपल्या समर्थकांना यात्रेत सामील होण्याचे खुले आवाहन केले. तथाकथितपणे अनेक महिने पोलीस या आरोपीचा माग काढू शकले नसतानाही हा प्रकार घडला.
अनेकांनी राज्य सरकारला प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन केले. मात्र, राज्य सरकारने या आवाहनांकडे दुर्लक्ष करून यात्रेला पुढे जाण्यास परवानगी दिली.
हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी नूह येथील जातीय हिंसाचार हा एक पूर्वनियोजित कट असल्याचे जाहीर केले आहे. काही गूढ कारस्थानी व्यक्ती यासाठी दोषी असल्याचे सुचवून हरियाणा सरकार यातील स्वतःची भूमिका लपवण्याचा प्रयत्न करत आहे. मोठ्या प्रमाणात निरपराध तरुण आणि कष्टकरी लोकांना अटक करण्यात आली आहे.
हरियाणातील जातीय हिंसाचाराच्या या घटनेत, जातीय द्वेष पसरवण्यासाठी आणि जीवित व मालमत्तेच्या दुःखद हानीसाठी सत्तेत असलेल्यांना जबाबदार धरले पाहिजे. समाजातील या किंवा त्या एखाद्या विशिष्ट जनसमूहाचा यात दोष नसून, राज्य आणि सत्तेवर असलेलेच त्यासाठी दोषी आहेत.