हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, 26 फेब्रुवारी 2020
24 फेब्रुवारीपासून दिल्लीमध्ये पेट्रोल बॉम्ब, पिस्तुले, लाठ्या, दगडधोंडे आणि तलवारी यांसारख्या हत्यारांनी सज्ज असलेल्या टोळ्या मोकाट फिरत आहेत आणि भयंकर हिंसा व अराजकता पसरवित आहेत.
त्यांनी मशिदी व कब्रस्थानांवर हल्ले करून त्यांची तोडफोड केली आहे. त्यांनी घरे, दुकाने आणि कारखान्यांना निशाणा बनवून मोठ्या प्रमाणावर जाळपोळ आणि लूटमार केली आहे.
हे जे काही चाललंय ते दुसरे तिसरे काही नसून राज्याद्वारे लोकांविरूद्ध चालविण्यात आलेली दहशतीची मोहिम आहे. वर्षानुवर्षे स्वतःच्या हक्कांसाठी एकजुटीने संघर्ष करण्याच्या दरम्यान वेगवेगळ्या धर्मांच्या लोकांची एकता बनली आहे, त्या एकतेला तोडणे हाच राज्याचा हेतू आहे. सी.ए.ए., एन.आर.सी. आणि एन.पी.आर. च्या विरूद्ध सर्व समुदायांच्या महिला व पुरूषांचा एकजूट संघर्ष मोडून काढणे हेच राज्याचे उद्दिष्ट आहे.
जाफराबाद मेट्रो स्टेशनच्या लगत लोक सी.ए.ए., एन.आर.सी. आणि एन.पी.आर. च्या विरूद्ध शांततापूर्ण धरण्याच्या स्वरूपात संघर्ष करीत होते, त्यांच्यावर 23 फेब्रुवारीला हल्ला आयोजित करण्यात आला. धरण्यामध्ये मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या, त्यांच्यावर गुंडांनी दगडफेक केली व अनेकजण यांत जखमी झाले. हा हल्ला सुरू असताना तिथे उपस्थित पोलिसांनी निव्वळ बघ्याची भूमिका घेतली. त्याच दिवशी भाजपाच्या एका प्रसिद्ध नेत्याने आणखी हिंसा पसरवण्याची धमकी देत एक भडकाऊ भाषण केले. ते भाषण सामाजिक माध्यमांमध्ये वेगाने पसरले. उपरोक्त भाषणामध्ये त्यांनी दिल्ली पोलिसांना सी.ए.ए. विरूद्ध धरणे देणाऱ्या लोकांना त्वरित हटविण्याचे आदेश दिले.
दुसऱ्या दिवसापासून, मुस्लिम समुदायाच्या लोकांना लक्ष्य करून, मोठ्या प्रमाणावर सांप्रदायिक हिंसा सुरू करण्यात आली. प्रभावित वस्त्यांतील लोकांनी सांगितल्याप्रमाणे खुनशी गुंडे बाहेरून आलेले लोक होते, ते सांप्रदायिक घोषणाबाजी करत खुलेआमपणे लूटमार आणि जाळपोळ करत होते. हिंसेचे वृत्त मिळवण्यासाठी गेलेल्या पत्रकारांवर निर्दयी हल्ले करण्यात आले. पोलिसांना वरून आदेश मिळाले होते की कोणतीही कारवाई करू नये आणि पीडितांचा बचाव करू नये. जेव्हा लोकांच्या कुटुंबियांना, त्यांच्या घरांना आणि व्यवसायांना निशाणा बनवले जात होते तेव्हा अशा भयंकर परिस्थितीमध्ये लोक स्वत:च स्वसंरक्षणासाठी संगठित होऊ लागले. लोक एकमेकांच्या धर्माचा विचार न करता, एक दुसऱ्याचे रक्षण करण्यासाठी बहादुरीने उभे ठाकले. अश्या अनेक घटना समोर आल्या. काही जागी लोकांनी अपराधी आणि सांप्रदायिक खूनशी गुंडांना रोखण्यासाठी एक साथ लढाई केली आहे. अनेक गुरूद्वारांनी हिंसेच्या फटका बसलेल्यांसाठी आपले दरवाजे उघडले. डॉक्टरांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्राण मुठीत घेऊन पीडितांची मदत आणि सेवा केली होती आणि अजूनही करत आहेत.
सूत्रांनुसार, ह्या हिंसेत आत्तापर्यंत कमीत कमी 27 लोक मारले गेले आहेत तर शेकडों लोक गंभीर जखमी झाले आहेत. काही ठिकाणी गंभीर जखमी झालेले स्वतःच्या घरात किंवा शेजारच्या छोट्या इस्पितळांमध्ये अडकून पडले. कारण खूनशी गुंड त्यांच्यावर जखमी स्थितीत देखील हल्ला करतील या भितीने त्यांना त्यांचे नातेवाईक सरकारी इस्पितळांत उपचारांसाठी पोचवू शकले नाहीत.
दिल्लीमध्ये जे घडतेय ते दुसरे तिसरे काही नसून क्रूर राजकीय दहशतवाद आहे. त्याचा निशाणा सामान्य लोक आणि विशेषतः मुस्लिम समुदायाचे लोक आहेत.
मक्तेदार भांडवलदार मिडियाचा वापर करून, ही दोन समुदायांतील “सांप्रदायिक दंगल” आहे असा खोटा प्रचार राज्य करतेय. हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी ह्या खोट्या प्रचाराचे खंडन करते.
ही दोन समुदायांतील सांप्रदायिक दंगल नाहीय. हिंदू आणि मुसलमान आपांपसांत लढत नाहियेत. याउलट सर्वच धर्मांचे लोक एकजूटीने हीच मागणी करत आहेत की राज्याने लोकांमध्ये धर्मांच्या आधारावर भेदभाव करणे बंद करावे. ह्या भयानक परिस्थितीत सर्व धर्माचे लोक एक साथ हिंमतीने उभे आहेत.
हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी सर्व दिल्लीवासियांना आवाहन करते की आपल्यात फूट पाडण्याच्या व आपल्या अधिकारांच्या संघर्षांना चिरडून टाकण्याच्या राज्यांच्या अशा प्रयत्नांना हाणून पाडूया!