कॉम्रेड लाल सिंह यांच्याकडून नववर्षाचा संदेश

प्रिय साथीदारांनो,

सर्वांना क्रांतिकारी अभिवादन

आज नवीन वर्षात पदार्पण करताना आपण वर्तमान परिस्थितीचा आणि आपल्या प्रिय देशातील लोकांच्या उज्वल भविष्याच्या खात्रीसाठी काय करणे आवश्यक आहे याचा विचार करायला हवा.

गेल्या दशकात आणि विशेषतः गेल्या वर्षात भांडवलदारी साम्राज्यवादी व्यवस्थेवर सर्वबाजूंनी मोठे संकट ओढवले आहे. आपल्या देशातील सत्ताधारी वर्ग लोकांवर हल्ले करण्याच्या बाबतीत कधी नव्हे इतका क्रूर होत चालला आहे. तो त्याची सत्ता टिकवून धरण्याचा आणि कामगार, शेतकरी व इतर कष्टकरी लोकांचे अधिकाधिक शोषण करण्याचा जोराने प्रयत्न करत आहे.

ही परिस्थिती आपल्या लोकांसाठी अत्यंत धोकादायक आहे. जसजसा कामगार वर्ग आणि लोकांचा संघर्ष वाढत जात आहे तसतसा सत्ताधारी वर्ग व त्याचे राज्य आपली एकता मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) पारित करणे आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) लागू करण्याचा निर्णय घेणे, यामागे आपल्या लोकांना धर्माच्या आधारावर विभागणे हा हेतू आहे. पण दिवसेंदिवस देशाच्या कानाकोपऱ्यातून या भ्याड पावलाला विरोध करण्यासाठी आपले करोडो लोक रस्त्यावर उतरले आहेत. राज्याने सुरु केलेल्या क्रूर दडपशाहीला न जुमानता लोक बहादुरीने त्याचा सामना करत आहेत. भारत हा आपल्या लोकांचा आहे, हे धाडसी कृतीतून आपण ठामपणे सांगितले आहे.

साथीदारांनो,

आपल्या लोकांना पूर्वीपासूनच असा समाज हवा होता, जिथे आपल्या कामगारांना, शेतकऱ्यांना आणि कष्टकरी लोकांना खरे स्वातंत्र्य असेल. जिथे लोकांना अन्न, घरे, शिक्षण, आरोग्यसेवा, रोजगार आणि ताठ मानेने आयुष्य जगण्यासाठी जे काही लागते ते सर्व मिळण्याची खात्री असेल, जिथे समाजाच्या सामूहिक हितासाठी लोकांना योगदान देता येईल, अशा समाजासाठी ते इच्छुक आहेत. मात्र ही इच्छा अजूनही पूर्ण झालेली नाही.

आपल्या देशात लोकशाही आहे, असा दावा आपले सत्ताधारी करतात. भारतात सध्या जी लोकशाही आहे, त्यात निर्णय घेण्याची ताकद मूठभर  मोठ्या मक्तेदार भांडवलदारांच्या हातात आहे. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत कामगार व शेतकऱ्यांचा काहीच सहभाग नसतो. या लोकशाहीत मतदानाद्वारे कोणताही पक्ष निवडून आला, तरी भांडवलदार वर्ग हाच खरा सत्ताधारी वर्ग असतो. हा वर्ग कामगारवर्ग व लोकांवर आपली हुकूमशाही गाजवत राहतो.

आपल्याला एक अशी लोकशाही हवी आहे, जिथे निर्णय घेण्याची ताकद लोकांकडे  असेल आणि या ताकदीचा वापर सर्वांना समृद्धी व सुरक्षितता मिळवून देण्यासाठी होईल. आम्हाला श्रमजीवी लोकशाही हवी आहे. हे साध्य करण्यासाठी कामगार आणि शेतकऱ्यांनी, भांडवलदार वर्गाच्या हातातून राजकीय सत्ता काढून घेऊन आपल्या हातात घ्यायला हवी. उत्पादनाची साधने कामगार आणि शेतकऱ्यांच्या हातात असायला हवीत. फक्त आणि फक्त तेव्हाच आपण सगळ्यांच्या समृद्धीची व सुरक्षिततेची खात्री देऊ शकतो.

साम्राज्यवादी आणि भारतीय सत्ताधारी वर्गाला कम्युनिझमच्या भुताने पछाडले आहे. ते सर्व ताकदीनिशी त्यांची मृत्युशय्येवर असलेली भांडवलदारी व्यवस्था टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. लोकांना क्रांती व समाजवादाचा रस्ता धरण्यापासून रोखण्याकरता ते काहीही करतील. अँग्लोअमेरिकन साम्राज्यवादी आणि भारतीय सत्ताधारी वर्ग या भागातील युद्धाची तयारी करत आहेत.

साथीदारांनो,

आपण नुकतेच आपल्या पार्टीच्या ४०व्या वर्षात पदार्पण केले आहे. इतकी वर्षे आपण ही भांडवलदारवर्गाची सत्ता असलेली पूर्ण व्यवस्था बदलून, त्याजागी कामगारवर्ग व त्याबरोबरीने कष्टकरी शेतकरीवर्गाचे राज्य असेल, अशी व्यवस्था आणण्याच्या उद्दिष्टावर ठाम आहोत. आपण समाजाला या संकटातून बाहेर काढण्याच्या कार्यक्रमासाठी, म्हणजेच नवनिर्माणाच्या कार्यक्रमासाठी,  कामगारवर्ग आणि मोठया संख्येने लोकांची राजकीय एकजूट घडवून आणण्याच्या दिशेने काम करत आहोत. क्रांतीतून एक समाजवादी समाज घडवणे हे आपले नियोजित उद्दिष्ट आहे.

आपल्यासमोर असलेली महत्वाची कामगिरी म्हणजे कम्युनिस्ट चळवळीतील त्या विचारधारेला हरवणे, जी भांडवलदार व त्यांच्या लोकशाहीच्या सद्यस्थितीविषयी भ्रम निर्माण करते आणि कामगार व शेतकऱ्यांना क्रांतीच्या मार्गापासून विचलित करते. हे जोपर्यंत केले जात नाही, तोपर्यंत क्रांती आपल्यापासून दूरच राहील आणि भारतीय समाज एका संकटातून दुसऱ्या संकटात लोटला जाईल.

आपल्या पार्टीला मजबूत बनवण्यासाठी आपण आपली सर्व शक्ती लावायला हवी. म्हणजेच पार्टीच्या मूलभूत संघटनांना बळकट करणे, शब्दांतून व कृतीमधून एकमेकांप्रती आदर व्यक्त करणे, दुबळेपणावर मात करण्यासाठी एकमेकांना मदत करणे, एकमेकांची ताकद वाढवणे आणि आपल्या सामूहिक विजयाचा आनंद साजरा करणे. आपण पार्टीतील प्रत्येक सदस्याची सजगता वाढवत राहिले पाहिजे. आपण आपल्या आरोग्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यायला हवे, जेणेकरून शारीरिक व मानसिक दोन्ही पातळींवर आपण पार्टीसमोर असणारी कामे पूर्ण करू शकू.

क्रांती हे एक अपूर्ण राहिलेले कार्य आहे. म्हणून, प्रिय साथीदारांनो, हे अपूर्ण कार्य पूर्ण करणे ही आपली जबाबदारी आहे.

साथीदारांनो, मी तुम्हा सर्वांना मनापासून क्रांतिकारी अभिवादन करतो आणि नवीन वर्षात तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला चांगले आरोग्य व भरूभरून यश मिळावे अशा शुभेच्छा देतो.

आपली पार्टी दीर्घायुषी होवो!

येणाऱ्या क्रांतिकारी तुफानांसाठी अजून जोमाने तयारी करूया!

मार्क्सवाद-लेनिनवाद जिंदाबाद!

लाल सिंह

महासचिव,  हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published.