नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करा! एन.आर.सी. चालणार नाही!

धर्माच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडणे थांबवा!

कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, 24 डिसेंबर, 2019

गेल्या अकरा दिवसांत संपूर्ण देशातून करोडो लोक रस्त्यावर उतरून शांततापूर्ण निषेध करत आहेत. सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA)  रद्द करावा आणि देशभरात NRC ( राष्ट्रीय नागरिक नोंदवही) लागू करण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी आम्ही मागणी करत आहोत.

आपल्या लोकांच्या एकतेचं रक्षण करण्यासाठी जीवनाच्या सर्व स्तरांतील माणसे रस्त्यावर उतरली आहेत. आपल्या विशाल देशातील प्रत्येक राज्यातील शहरे आणि गावांतून होत असणाऱ्या हजारो निदर्शनांतून, धर्माच्या आधारे आपल्या समाजाचे विभाजन करण्याच्या मोदी सरकारच्या प्रयत्नांना आपण आपला ठाम विरोध दर्शवला आहे.

आपल्या देशातील लोकांचे म्हणणे ऐकून घेण्याऐवजी, केंद्र सरकारने निषेध करणाऱ्या लोकांविरोधात क्रूर दडपशाही सुरु केली आहे.

राज्याच्या दडपशाहीचा परिणाम म्हणून 25 हून अधिक लोकांनी जीव गमावला आहे. अनेक लोक गंभीररीत्या जखमी झाले आहेत. हजारो लोकांवर खोटे आरोप दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

सरकारने लोकांवर हिंसाचाराचा आरोप ठेवून, एक चुकीची माहिती पसरवणारा प्रचार सुरु केला आहे. जामिया मिलिया इस्लामिया आणि अलीगढ मुस्लीम विद्यापीठातील विद्यार्थी व विद्यार्थिनीवर अत्यंत निर्दयपणे केलेल्या हिंसक हल्ल्यातून या प्रचाराचे खोटेपण उघडकीस येते. उत्तरप्रदेश, कर्नाटक, आसाम आणि दिल्ली अशा विविध राज्यांतील लोकांनी केलेले शांततापूर्ण निषेध “बेकायदेशीर” ठरवण्यात आले आहेत आणि त्यांच्यावर प्रचंड प्रमाणावर दडपशाही केली जात आहे.

कम्युनिस्ट गदर पार्टी हा सांप्रदायिक, लोकविरोधी नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) ताबडतोब रद्द करण्याची मागणी करते. आम्ही मागणी करतो, की सरकारने ताबडतोब संपूर्ण भारतात NRC लागू करण्याचा निर्णय मागे घ्यावा व असे सार्वजनिकपणे जाहीर करावे. आम्ही मागणी करतो, की सरकारने तात्काळ सर्व अटक केलेल्या लोकांना मुक्त करावे आणि भारताच्या जनतेविरुद्ध सुरु केलेली दडपशाहीची मोहीम थांबवावी.

एकावर हल्ला म्हणजेच सगळ्यांवर हल्ला!

लोकांवर दहशतीचे राज्य करणे थांबवा!

हम है इसके मालिक, हिन्दोस्तान  हमारा

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published.