ज्यांनी भांडवलदारी समाजाच्या विकासाच्या आर्थिक नियमांचा शोध लावला त्या महान कॉम्रेड कार्ल मार्क्स यांचा जन्म 5 मे 1918 साली झाला होता. त्यांचे साथी कॉम्रेड फ्रेडरिक एंगेल्स यांच्याबरोबरीने त्यांनी 1948 मध्ये कम्युनिस्ट पार्टीचे घोषणापत्र प्रकाशित केले होते. त्या घोषणापत्रात त्यांनी कम्युनिस्टांचे काम काय आहे याची व्याख्या करताना म्हटले होते, की समाजाचा सत्ताधारी वर्ग बनून उत्पादन साधनांची मालकी आमुलाग्र बदलून खाजगी संपत्तीचे रुपांतर सामाजिक संपत्तीत करण्याची चेतना कामगार वर्गामध्ये निर्माण करणे हे कम्युनिस्टांचे काम आहे.
18व्या आणि 19व्या शतकाच्या प्रारंभी जगातील सगळ्यात महान बुद्धिमंतांनी तत्वज्ञान, राजकीय अर्थव्यवस्था आणि समाजवाद या क्षेत्रात भरपूर वैज्ञानिक काम केले होते. जर्मन तत्वज्ञानापासून, आणि विशेषतः हेगेल यांच्या द्वंद्ववादापासून शिकून कार्ल मार्क्स यांनी भौतिकवादी तत्वज्ञान आणखीन उच्च स्तरावर विकसित केले. कार्ल मार्क्स यांच्या समाधीसमोर श्रध्दांजली अर्पित करताना एंगेल्सनी आपल्या भाषणात भौतिकवादी तत्वज्ञानाचे सार अशा प्रकारे मांडले : “ज्याप्रकारे डार्विननी जीवित निसर्गाच्या विकासाच्या नियमांचा शोध लावला, त्याचप्रकारे मार्क्सनी मानवी इतिहासाच्या नियमांचा शोध लावला. एक साधी सरळ वस्तुस्थिती जी अनेक विचारधारांच्या फोफावण्याखाली लपवून ठेवली होती की मानवाला सगळ्यात आधी खायला, प्यायला, राहायला व घालायला कपडे यांची आवश्यकता आहे, त्यानंतरच तो राजनीती, विज्ञान, कला, धर्म इत्यादीमध्ये रुची घेऊ शकतो आणि म्हणूनच जीवनासाठी अत्यावश्यक भौतिक वस्तूंचे उत्पादन व एखाद्या काळात मानवी समाजाने केलेला आर्थिक विकास हाच पाया असतो ज्याच्यावर त्या समाजातील लोकांची राज्यव्यवस्था, कायद्यांबद्दलची त्यांची संकल्पना, कला व धर्माची संकल्पना यांचा विकास होतो. आणि म्हणूनच आत्तापर्यंत जसे केले गेले त्याच्या उलट या सगळ्यांची व्याख्या करायला हवी.”
मार्क्सनी ज्या ज्या विषयात संशोधनकार्य केले त्या त्या विषयात त्यांनी स्वतंत्रपणे शोध लावले, आणि त्यांनी अनेक विषयांमध्ये गहन संशोधन केले होते. ते एक महान वैज्ञानिक होते. सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट ही आहे कि मार्क्स यांच्यासाठी विज्ञान म्हणजे एक क्रांतिकारी शक्ती होती. कुठल्याही सैद्धांतिक विज्ञानाच्या क्षेत्रातील नवीन शोधांचे ते नेहेमीच अत्यंत खुशीने स्वागत करीत, जरी कित्येकदा त्या शोधांच्या व्यावहारिक उपयोगाबद्दल काहीच कल्पना करणेही असंभव असले तरीही. पण त्यांना विशेषतः अशा शोधांबद्दल अत्यानंद होत असे ज्याचा उपयोग केल्याने उद्योग जगतात ताबडतोब क्रांतिकारी परिवर्तन शक्य असेल आणि ऐतिहासिक विकासात ज्या शोधांचे खूपच योगदान असेल.
मार्क्सवादाचे तत्वज्ञान द्वंद्वात्मक भौतिकवाद आहे. द्वंद्वात्मक पध्दत असे मानते कि एकामागोमाग एक सरळ रेषेत घटना घडणे अशी विकासाची प्रक्रिया नसते, उलट त्या वस्तुत अंतर्भूत अंतर्विरोध आणि त्या वस्तुत अंतर्भूत असलेल्या परस्परविरोधी प्रवृत्तींमधील संघर्षामधूनच विकास होतो आणि जो त्या अंतर्विरोधांवरच अवलंबून असतो. विकास एका सरळ रेषेत एकसारखा होत नाही, उलट समजणारही नाही येवढ्या अगदी छोट्या प्रमाणात उत्क्रांतीवादी परिवर्तन होत होत एका अशा क्रांतिकारी बिंदूपर्यंत होते जिथे अचानक गुणात्मक क्रांतिकारी परिवर्तन होते.
मार्क्स आणि एंगेल्सनी ऐतिहासिक भौतिकवाद विस्तृतपणे समजाविला. मानवी समाज आणि त्याच्या विकासाचा अभ्यास करण्यासाठी द्वंद्वात्मक भौतिकवादाच्या सिद्धांतांचा वापर करणे यालाच ऐतिहासिक भौतिकवाद म्हणतात. आदिम सामुदायिक स्तरापासून आजपर्यंत मानवी समाजाच्या विकासाचा अभ्यास करून त्यांनी दाखवून दिले की भांडवलशाहीतील अंतर्भूत अंतर्विरोध अपरिहार्यपणे समाजाला एका गुणात्मक परिवर्तनाच्या दिशेने, भांडवलशाहीकडून समाजवादाच्या दिशेने ढकलतील.
समाजाला वर्ग-विभाजन आणि शोषणाच्या स्तरापासून पुढे नेण्यासाठी एक व्यापक सिध्दांत व कार्यनिती मार्क्सनी विकसित केली. ते एक क्रांतिकारी होते आणि म्हणूनच सामाजिक परिवर्तनाच्या आवश्यकतेने त्यांची ज्ञानपिपासा प्रेरित होती. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर “तत्वज्ञानींनी जगाला वेगवेगळ्या स्वरुपात फक्त समजून घेतले आहे. पण खरा मुद्दा तर हे जग बदलण्याचा आहे.”
आज जगाच्या पातळीवर जे अंतर्विरोध उफाळून येत आहेत त्याने हेच स्पष्ट होते कि भांडवलशाही व्यवस्था ही पूर्णपणे कालबाह्य आणि मरणासन्न व्यवस्था आहे. नेहेमी नफ्याचा दर जास्तीतजास्त असावा, ही मक्तेदार वित्त भांडवलाची लालसा भागविण्यासाठी, संपूर्ण सामाजिक उत्पादन प्रक्रिया एका संकटातून दुसऱ्या संकटाकडे ढकलली जातेय. शोषण आणि गरिबी अधिक वाढविल्याशिवाय, एका संकटातून दुसऱ्या अधिक गंभीर संकटात पडल्याशिवाय, लोकांच्यावर मोठ्या प्रमाणात हिंसा, दहशत, आणि बर्बादी लादल्याशिवाय भांडवलशाही एक दिवसही जिवंत राहू शकत नाही.
आजच्या समस्येवर एकच उपाय आहे जो कॉम्रेड मार्क्सनी सुचविला होता – भांडवलशाहीची कबर खोदणारी श्रमजीवी क्रांती संगठित करणे जी समाजवाद व एक वर्ग-विहीन कम्युनिस्ट समाजाच्या स्थापनेचा मार्ग सुकर करेल.