हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या 9व्या परिपूर्ण सभेचे संदेशपत्र

हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या 9व्या परिपूर्ण सभेची बैठक जून 1-2 ला झाली. परिपूर्ण सभेने 17व्या लोक सभेच्या निवडणुकींच्या निकालांचे विश्लेषण केले आणि निवडणुकींमध्ये आपल्या सहभागासहित अलिकडच्या महिन्यांतील पार्टीच्या कामाचे मूल्यांकन केले.

या निवडणुकींवर जो प्रचंड पैसा खर्च केला गेला होता, त्याची परिपूर्ण सभेने नोंद घेतली. असे म्हणतात की या निवडणुका कोणत्याही देशांत कधीही घेतलेल्या निवडणुकांपेक्षा जास्त महाग होत्या. त्यातील सिंहाचा वाटा भाजपाच्या मोहिमेवर खर्च करण्यात आला होता. लोकांमध्ये थापांचा प्रसार करण्यासाठी टीव्ही व सोशल मीडियासकट आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने न भूतो अशी पातळी गाठली होती. पूर्ण निवडणूक मोहिमेत राजनैतिक चर्चेचा स्तर सगळ्यात खालचा होता. घृणेने ओतप्रोत भाषणांचे, पाकिस्तानाविरुद्ध पिसाट युद्धोद्रेकाचे, खुल्या खुल्या सांप्रदायिक व फुटीर प्रचाराचे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांचे व प्रत्यारोपांचे राजनैतिक चर्चांवर वर्चस्व होते. हिंदुस्थानाच्या शत्रुंना चिरडून टाकायची ज्याच्यात क्षमता आहे असा पहलवान म्हणून नरेंद्र मोदीला बढावा देण्यासाठी काश्मीरवर राज्याच्या अतुलनीय दहशतीचा व पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर बाँबहल्ल्याचा वापर करण्यात आला.

या निवडणुकांमध्ये आंग्ल-अमेरिकन संस्थांच्या प्रमुख भूमिकेची परिपूर्ण सभेने विशेष नोंद घेतली. व्हॉट्सअप जिच्या मालकीचे आहे, त्या फेसबुक नावाच्या बहुराष्ट्रीय कंपनीने मोदी मोहिमेत जवळून काम केले. तिने डेटा प्रदान केला व कधी नव्हे इतक्या लोकांपर्यंत पोहोचण्याची सोय केली. रोजच्या रोज कोट्यावधी लोकांच्या मोबाईल फोन्समध्ये मेसेजेस पाठविण्यात आले. त्यांच्या धर्माच्या, जातीच्या, पूर्वीच्या त्यांच्या व्हॉट्सअप मेसेजेसच्या व इंटरनेटच्या वापराच्या रेकॉर्ड इत्यादींच्या आधारावर खास बनविलेली मेसेजेस धाडण्यासाठी विशिष्ट समूहांना निशाणा बनविण्यात आले.

परिपूर्ण सभेने या बाबतीची दखल घेतली की सोव्हिएत संघाच्या विनाशानंतर जगात व हिंदुस्थानात दूरगामी बदल झाले आहेत.

जागतिकीकरण, उदारीकरण व खाजगीकरणाचा कार्यक्रम लागू केल्याने भांडवलाचे मोठे निर्यातक म्हणून हिंदुस्थानी मक्तेदार घराण्यांचा उदय झाला आहे. जगातील सर्व खंडांत आपल्या आर्थिक हितसंबंधांना त्यांनी विकसित केले आहे व सक्रियतेने ही घराणी आपल्या साम्राज्यवादी आकांक्षांचा पाठपुरावा करत आहेत. यामुळे हिंदुस्थानी भांडवलदार वर्गाचे आपापसातील व विदेशातील प्रतिस्पर्ध्यांबरोबरचे अंतर्विरोधदेखील जास्त तीव्र झाले आहेत.

1947मध्ये हिंदुस्थान स्वतंत्र जरी झाले, तरी ते साम्राज्यवादी प्रणालीशी जोडून राहिले. हिंदुस्थानी भांडवलदार वर्गाने आंग्ल-अमेरिकन साम्राज्यवाद्यांबरोबर जवळचे संबंध राखून ठेवले. या साम्राज्यवाद्यांचा हिंदुस्थानी राज्यावर प्रचंड प्रभाव होता. परंतु शीतयुद्धाच्या काळात हिंदुस्थानी भांडवलदार वर्गाने दोन्ही महाशक्तींच्या मध्ये यशस्वीरित्या शक्कल लढवली. स्वतःसाठी सर्वोत्तम सौदा पटकविण्यासाठी त्याने एकाला दुसऱ्याविरुद्ध भिडविले. आत्ताच्या शीतयुद्ध पश्चात काळात अमेरिकन साम्राज्यवादी दबावाला तोंड देणे हे हिंदुस्थानाच्या शासकांना खूपच जास्त कठीण बनले आहे. अमेरिकेची हिंदुस्थानातील लुडबुड व तिचा हिंदुस्थानी राज्यावरील प्रभाव निरंतर वाढतच चाललाय.

आपल्या वर्चस्वाखाली एकधृवीय दुनियेकडील वाटचालीत अमेरिकेच्या दृष्टीने चीन व रूस हे प्रमुख संभाव्य अडथळे आहेत. चीनला आडविण्यासठी, रूसला कमजोर बनविण्यासाठी व इराणला एकाकी पाडण्यासाठी अमेरिकेची इच्छा आहे की हिंद-प्रशांत महासागराच्या  प्रदेशात हिंदुस्थानने तिचा विश्वासू मित्रदेश बनावे. अमेरिकन प्राधान्यतेच्या लक्ष्यास अनुरूप मार्गाने हिंदुस्थानाला पुढे नेण्यासाठी अमेरिका दुसऱ्यांदा निवडून आलेल्या मोदीच्या नेतृत्वाखालील भाजपच्या बहुसंख्येच्या सरकारवर अवलंबून आहे.

वरील विश्लेषणाच्या आधारावर परिपूर्ण सभेने निष्कर्ष काढला की 2019च्या लोकसभा निवडणुकांत भाजपच्या भल्यामोठ्या विजयाच्या मागे नक्कीच वॉशिंग्टनचा हात आहे. आंग्ल-अमेरिकन साम्राज्यवाद्यांनी व त्यांच्या संस्थांनी जी प्रमुख भूमिका बजावली, तिने सुनिश्चित केले आहे की सध्या तरी हिंदुस्थानी भांडवलदार वर्गाचे अंतर्विरोध अमेरिकन हितसंबंधांस अनुरूप अशा पद्धतीने सोडविण्यात आले आहेत.

परिपूर्ण सभेचा स्पष्ट निष्कर्ष होता की भाजपचा विजय लोकांमुळे नव्हे तर सर्वात प्रभावी हिंदुस्थानी मक्तेदार भांडवलदारांच्या व आंग्ल-अमेरिकन साम्राज्यवाद्यांच्या सहयोगामुळे घडून आलेला आहे.

परिपूर्ण सभेने या सत्यास दुजोरा दिला की प्रचलित प्रणालीतील निवडणुका म्हणजे हिंदुस्थानी व विदेशी भांडवलदारांच्या हातातील एक साधन आहेत. लोकांना फसवून मक्तेदार भांडवलदारांच्या विश्वासातील एखाद्या पार्टीसाठी तथाकथित जनादेश बनविण्याच्या त्या एक शस्त्र आहेत. विविध भांडवलदारांमधील अंतर्गत अंतर्विरोध सोडविण्याच्याही निवडणुका या साधन आहेत.

लोकांपैकी मोठ्या बहुसंख्येकडून वसूली करून घेऊन मक्तेदार भांडवलदारांच्या स्वार्थी उद्देश्यांना साधण्यासाठी हिंदुस्थानाला एका अतिशय धोकादायक मार्गावर खेचण्यात येत आहे. अमेरिकन साम्राज्यवादाच्या जास्त जवळ जाण्याचा मार्ग हा अन्याय्य साम्राज्यवादी युद्धांमध्ये हिंदुस्थानाला अडकविण्याचा धोका वाढवेल. हिंदुस्थानी संघाची फाटाफूट होण्याचाही धोका वाढवेल.

आपल्या लोकांच्या कल्याणापेक्षा, आपल्या देशाच्या स्वातंत्र्यापेक्षा किंवा या भूभागातील शांतीपेक्षा आपल्या देशाच्या सत्ताधारी वर्गाला स्वतःच्या जागतिक आकांक्षांच्या बद्दल जास्त काळजी आहे. हिंदुस्थानाच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याकरिता किंवा आशियात शांतीसाठी तो काम करेल असा विश्वास आपण ठेऊ शकत नाही. आपल्या देशाला ज्या मार्गावरून खेचण्यात येत आहे त्यास जनसमुदायाच्या विस्तृत गटांनी एकजूट होऊन विरोध करण्याची काळाची गरज आहे.

परिपूर्ण सभेने निवडणुकांमध्ये आपल्या पार्टीच्या कामाचे सकारात्मक मूल्यांकन केले. भाजपा किंवा काँग्रेस पार्टीच्या नेतृत्वाखाली विरोधी युती, हे केवळ दोनच पर्याय लोकांपुढे आहेत, अशा प्रचाराचा मारा जेव्हा लोकांवर होत होता, तेव्हा आपल्या पार्टीने क्रांतीकारी पर्यायासाठी एक लढाऊ मोहिम चालविली. हिंदुस्थानाच्या नवनिर्माणाचा कार्यक्रम आपण सादर केला व लोकप्रिय बनविला. भांडवलदार वर्गाच्या राज्यात कम्युनिस्टांनी निवडणुकांत कसा सहभाग घेतला पाहिजे, याचा आपण एक आदर्श सादर केला.

याच्या अगोदरच्या केंद्रीय समितीच्या परिपूर्ण सभेनंतरच्या काळातील पार्टीच्या सर्व संघटनांच्या उत्कृष्ट कामाची परिपूर्ण सभेने प्रशंसा केली. आपली यशस्वी वाटचाल शाश्वत ठेवण्याकरिता पार्टीच्या सर्व संघटनांच्या लोकशाही केंद्रवादी कार्यप्रणालीला अधिक मजबूत बनविण्याच्या गरजेवर तिने जोर दिला.

जगातील सर्वात हल्लेखोर व युद्धखोर शक्ती म्हणजे अमेरिकन साम्राज्यवाद. हिंदुस्थान जर त्याचा विश्वासू मित्र बनला तर किती धोक्याचे आहे याचा पर्दाफाश करण्याचे प्रयत्न वाढविले पाहिजेत, यावर परिपूर्ण सभेने जोर दिला. संसदीय लोकशाहीच्या प्रचलित प्रणालीचा पर्दाफाश, आणि उदारीकरण व खाजगीकरणाच्या कार्यक्रमाचा विरोध आपण करतच राहिलो पाहिजे व मानवाधिकारांच्या व लोकशाही अधिकारांच्या रक्षणार्थ राज्याच्या दहशतवादाचा आणि राज्याने संघटित केलेल्या सांप्रदायिक हिंसेचा विरोध आपण करत राहिलो पाहिजे.

सरतेशेवटी परिपूर्ण सभेने या गोष्टीला दुजोरा दिला की कामगार व शेतकऱ्यांनाआपल्या हातात राजनैतिक सत्ता घेऊन हिंदुस्थानाचे नवनिर्माण करण्यासाठी तयार करण्याच्या उद्देश्याने लोकांच्या सर्व दैनंदिनांच्या संघर्षांत आपण सहभागी झालो पाहिजे. नवनिर्माणाचा अर्थ म्हणजे लोकांना सार्वभौम बनविणे, भांडवलदारांचे स्वार्थ भागविण्यासाठी नव्हे तर लोकांच्या गरजा पुरविण्याकरिता अर्थव्यवस्थेला वेगळी दिशा देणे व आपल्या शेजारी देशांमध्ये साम्राज्यवादविरोधी एकता मजबूत बनविण्यासाठी विदेशनीतीची पुनर्व्याख्या करणे.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published.