महावितरण (MSEDCL)च्या कामगारांच्या न्याय्य संघर्षाचे समर्थन करा!

समाजविरोधी खाजगीकरणाच्या प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी एकजूट होऊया!

हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या प्रादेशिक समितीचे निवेदन, डिसेंबर 2018

कामगार बंधू-भगिनींनो!

कळवा-मुंब्रामध्ये वीज वितरणाचे खाजगीकरण रोखण्यासाठी व अधिकारी मनमानीने आपल्यावर लागू करू इच्छिणाऱ्या महावितरणच्या पुनर्रचनेच्या विरोधातील आपल्या न्याय्य संघर्षाचे कम्युनिस्ट गदर पार्टी समर्थन करते.

आम्ही जाणतो की पुनर्रचनेच्या ह्या योजनेमुळे इंजिनीयरपासून लाइन्समॅन व आफिस स्टाफपर्यंत सगाळयांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत. हे अतिशय स्वागतार्ह आहे की यूनियन व पार्टीच्या सभासदत्वाच्या भिंती ओलांडून विविध श्रेणीतील कामगार ह्या संघर्षात एकजूट झालेले आहेत. ही एकता अतिशय मौल्यवान आहे. डोळ्यात तेल घालून तिला जपले पाहिजे कारण अधिकारी आपल्यात फूटपाडण्यासाठी वाट्टेल ते करतील.

बंधू-भगिनींनो!

वीज निर्मिती, प्रेषण व वितरण, अशा तीन भागात MSEB चे विभाजन करण्यापासून महाराष्ट्र सराकारला रोखण्यासाठी आपण जोरदार लढा दिला. आपल्या लक्षात आले होते की ह्यासाठी सरकारची दोन उद्देश्य हेती. एक म्हाणजे MSEB ला तीन कंपन्यांत विभागून त्यातील कामगारांची एकजूट फोडणे व दुसरे म्हणजे वीज क्षेत्र भांडवलदारांसाठी आकर्षक बनविणे. वीज निर्मितीत राज्य वीज बोर्ड अकार्यक्षम आहेत, असा दावा करून हे क्षेत्र भांडवलदारांसाठी उघडले गेले. त्यांत गुंतवणूक करणाऱ्या अनेक भांडवलदारांच्या लक्षात आले की त्यातून त्यांना अपेक्षेप्रमाणे नफे मिळत नाहीयत. तेव्हा जाणून बुजून त्यांनी ह्या कंपन्या आजारी बनविल्या व काहींनी तर सरकारला त्या परत ताब्यात घेण्यास सांगितले. आता सार्वजनिक क्षेत्रातून घेतले कर्ज फेडण्यास अनेक भांडवलदार तयार नाहीयत. ह्याचा अर्थ जनता हजारो करोडो रुपये गमावेल. आपण मिळून इतर क्षेत्रांतील कामगारांना व सर्वसामान्य जनतेला ह्या कटू परिस्थितीची जाणीव करून दिली पाहिजे.

जास्तीत जास्त नफे जिथे बनविणे शक्य आहे, अशा वीज वितरण क्षेत्राकडे भांडवलदारांनी आपली हावरट नजर वळविली आहे. राज्याच्या मालकीच्या वीज क्षेत्रातील कामगार व्यवस्थितपणे काम करत नाहीत व त्यामुळे आपल्याला भोगावे लागते, अशा प्रकारच्या सरकारी प्रचारामार्फत नागरिकांना तुमच्याविरुद्ध भडकविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. ह्या प्रचारात हाही दावा केला जातो की वीज वितरणीच्या खाजगीकरणाने कार्यक्षमता वाढेल व त्यांमुळे नागरिकांना फायदा होईल. हा प्रचार म्हणजे केवळ भली मोठी थाप आहे, हे नागरिकांच्या समोर सिद्ध करण्या करिता तुमच्याकडे सर्व आवश्यक माहिती आहे! औरंगाबाद, जळगाव, नागपूर व भिवंडीतील नागरिकांना वीज वितरणाच्या खाजगीकरणाविषयी किती कटू अनुभव आहे, ह्याबद्दल आपण जनतेला सांगितले पाहिजे.

भिवंडीत वीज वितरणास टोरेंट कंपनीच्या हवाले करण्यात आले. परिणामतः वीज इतकी महागडी झाली की अनेकांना आता ती परवडतच नाही. वीज मीटर बदलण्याकरिता नागरिकांना मनमानीने किंमती आकारून लुटण्यात आले. हे मीटर प्रत्यक्ष खपतीपेक्षा वेगाने धावतात. त्यामुळे अनेक लोकांना इतकी मोठी बिले आली की ती चुकती करणे त्यांना शक्यच नाही. आणि तसे झाल्यास काय बरे होते? सरळ तार कापण्यात येते. तक्रारी जरी केल्या तरी त्यांची दाद घेतली जाईलच असे नाही. वृत्तानुसार सरकारने टोरेंट कंपनीला शेकडो करोडो रुपयांची मदत केलीय (अर्थात लोकांच्या पैशातून हे उघडच आहे). आणि तरीसुद्धा ह्या कंपनीने भिवंडी महानगर निगमाचे देणे चुकते केले नाहीय. असे समजते की कुशल कामासाठीही टोरेंट कंपनी अप्रशिक्षित कामगारांना ठेक्यावर ठेवते. तयामुळे काम करता करता वीजेचच्या धक्क्यामुळे 150पेक्षा अधिक कामगार मृत्यूमुखी पडले. ह्या शोकांकतिकेवर पांघरूण घालण्यात आले आहे. आपण नागरिकांना, विशेषतः कळवा-मुंबगातील रहिवाश्यांना ह्याबद्दल जाणीव करून दिली पाहिजे!

बंधू-भगिनींनो!

वीज क्षेत्राचा सरकारने जाणून बुजून कसा विनाश केला आहे, ह्याचा आपण नागरिकांसमोर पर्दाफाश केला पाहिजे. पहिल्या प्रथम असलेल्या साधनसामुग्रीची जोपासना करण्यासाइी आवश्यक भांडवलाची गुंतवणूक करणे बंद केले गेले. म्हणूनच जनरेटर्स, ट्रान्स्फॉर्मर्स, कपॅसिटर बँक्स, इ. महत्त्वाची उपकरणे सडतायत. त्यामुळे प्रचंड प्रमाणात वीज वाया जाते. त्याच प्रमाणे कामगार भरती बंद केली गेली आहे. अधिकृतरित्या जिथे 97,000 कामगारांची गरज आहे, तिथे केवळ 66,000च आहेत! अप्रशिक्षित कामगारांना ठेक्यावर घेणे पण् सुरू केले गेले, ज्यामुळे कार्यक्षमता जास्त ढासळते व अजून वीज वाया जाते. त्याच बरोबर, मोठ्या औद्योगिक घराण्यांच्या व बरेचदा मोठमोठ्या राजकारण्यांच्या मालकीच्या धंद्यांच्या करोडो रुपयांच्या चुकत्या न केलेल्या वीज बिलांकडै काणाडोळा केला जातो.  आणि आता तयांची काहीही चूक नसताना स्थायी कामगारांच्या नावांनी शंख केला जातोय! जाणून बुजून वीज क्षेत्राचा विनाश केल्यानंतर सरकार दावा करतंय की खाजगीकरण हा एकमेव इलाज आहे.

स्वीकृत अनुमोदित संख्येपेक्षा बरेच कमी कामगार असतानादेखिल तुम्ही मासिक बिल कमाईत प्रचंड वाढ केली – 2009 मधील सुमारे 2.5 करोड पासून 2018 मध्ये 20 करोडपेक्षा अधिक रक्कम जमा केली. मोठमोठ्या धेंडापासून व गुंडांपासून आपल्या जीवांस मोठा धोका असताना आपण हे करू शकलात. ह्या यशाबद्दल आपण नागरिकांना अवगत केले पाहिजे.

मुंब्रा, कळवा व ठाण्यातील इतर उद्योग, संघटना व नागरिकांचे गट वीज वितरणाच्या खाजगीकरणाच्या विरोधात योजना बनवित आहेत. चला, आपण सर्वजणांनी एकजुटीने ह्याबाबतीत एक मोठी मोहीम उभी करूयात!

बंधू-भगिनींनो!

इतर सार्वजनिक सेवांच्या खाजगीकरणाच्या विरोधात तेथील कामगार लढत आहेत. आपला संघर्ष त्यांच्यासोबत जोडणे महत्त्वाचे आहे. जनतेच्या पैशाच्या व लाखो कामगारांच्रू मेहनतीच्या आधारावर सार्वजनिक क्षेत्र उभारलेले आहे. त्याला सार्वजनिक सेवा क्षेत्र महणून चालवले पाहिजे! नफ्यासाठी खाजगी हातात बहाल करण्याचा अधिकार कोणतयाही सरकारपाशी असूच शकत नाही. ह्या तत्वाच्या आधारे आपण खाजगीकरणाविरुद्ध लढा लढला पाहिजे. आपल्या देश-दुनियेतील अनुभवावरून हेच स्पष्ट होते की कामगार व ग्राहक जर एकजुटीने लढले तर खाजगीकरणाला रोखणे शक्य आहे. इतकेच नव्हे तर त्याला उलटविणेदेखिल शक्य आहे. आपल्या युनियनांनी त्यांचा न्याय्य लढा जारी ठेवलाच पाहिजे.  पण त्याच बरोबर ह्यासंबंधी अजाण असलेल्या इतर कामगारांना व लोकांना हा मुद्दा समजावून, चला आपण आपली शक्ती अनेक पटीने वाढवूयात. हे करण्यासाठी चला आपण विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करूयात. आम्हांला पूर्ण खात्री आहे की असे केल्यास आपण ही लढाई जिंकू शकू!

मात्र एवढे करून आपण थांबता कामा नये. हिंदुस्थानी व विदेशी भांडवलदारांच्या खाजगीकरणाच्या व उदारीकरणाच्यामार्फत जागतिकीकरणाच्या धोरणाविरुद्ध मोठ्या संघर्षातही आपण सहभागी होऊया. विद्यमान व्यावस्था मोठ्या भांडवलदारांच्या हितांसाठी आहे. म्हणूनच दशकरोडो कामगारांना, शेतकऱ्यांना व इतर श्रमिकांना जेव्हा जिवंत रहाणे मुश्किल झाले असताना ते जास्त जास्त श्रीमंतीत लोळत आहेत. सरकारे आपल्या हिंतांच्या विरोधातच काम करतात कारण ती खरे तर सत्ताधारी भांडवलदार वर्गाचे व्यवस्थापक किंवा मॅनेजर्स असतात. लोकांना शेंड्या लावणे, लोकांच्या एका गटाला दुसऱ्याविरुद्ध भडकावणे हेच त्यांचे काम असते. असे केल्यानेच तर मोठे भांडवलदार सत्तेवर टिकून राहतात. विद्यमान व्यवस्था कामगार-शेतकऱ्यांच्या भल्यासाठी नाच आहे व तिच्या जागी दुसरी व्यवस्था उभारण्याची गरज आहे. असे केल्यानेच घाम गाळून समाजातील सर्व ऐश्वर्याच्या निर्मात्यांना सुखाची व सुरक्षेची हमी मिळू शकेल.

बंधू-भगिनींनो!

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी आपल्याला संघर्षात खांद्याला खांदा देत आहे व आपल्या एकतेची प्रशंसा करते. सरकारच्या खाजगीकरणाच्या योजना हाणून पाडण्यासाठी आपण सर्व कामगारांची व ग्राहकांची एकजूट बनवूयात. जनतेच्या पैशाने उभारलेल्या कोणत्याही क्षेत्राचे खाजगीकरण होऊच शकत नाही, ह्यासाठी आपण ठामपणे उभे राहूया. चला आपण अर्थव्यवस्थेस वेगळी दिशा देऊया, जेणेकरून खाजगी संपत्ती वाढविण्यास नव्हे, तर सगळ्यांना ’’सुख’’’’सुरक्षा’’ बहाल करण्यासाठी ती असेल.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published.