अमृतसरमधील दहशतवादी हल्ल्याचा धिक्कार करा!

हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, नोव्हेंबर 19, 2018

नोव्हेंबर 19, 2018ला, जेव्हा निरंकारी समाजाचे शेकडो लोक अमृतसर जिल्ह्यातील अदलीवाल गावात प्रार्थना करत होते, तेव्हा दोन दहशतवाद्यांनी जबरदस्तीने प्रार्थना मंडपात प्रवेश करून त्यांच्यावर ग्रेनेड हल्ला के ला. परिणामतः तीन लोकं ठार मारली गेली तर वीसहून अधिक स्त्री-पुरुष व मुले जखमी झाली.

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी ह्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करते. आपल्या धार्मिक रिवाजांचे शांतीपूर्ण पालन करणाऱ्यांवर झालेल्या ह्या हल्ल्याचे कोणतेच समर्थन असू शकत नाही. लोकांच्या दमनापासून मुक्तीसाठी संघर्ष करणारी कोणतीही राजनितीक शक्ती असे हल्ले करवून आणू शकत नाही किंवा त्याचे समर्थनही करू शकत नाही.

पंजाबमधील विविध विश्वासधारा मानणाऱ्या लोकांमध्ये आपांपसात वैमनस्य पसरविणे हा ज्या कोणी हा दहशतवादी हल्ला आयोजित केला त्यांचा उद्देश होता. पंजाब आणि देशातील दुसऱ्या भागांत अराजकता आणि हिंसा पसरविणे हाच हेतू ह्या हल्ल्यांमागे असू शकतो.

पंजाबमधील लोक त्यांचे ऐंशी आणि नव्वदच्या दशकांतील भयानक अनुभव विसरू शकत नाहीत. अराजकता व हिंसा, दहशतवाद आणि राज्याचा दहशतवाद ह्या सगळ्याचा वापर करून लोकांची एकता तोडण्यात आली होती तसेच त्यांच्या हक्कांच्या संघर्षाला चिरडून टाकण्यात आले होते. खूप निरपराधी लोकांना दहशतवादी हल्ल्यांत ठार मारण्यात आले होते. हजारो लोकांचा क्रूरपणे छळ करण्यात आला होता, खोट्या चकमकींत त्यांना ठार मारून त्यांची प्रेते नाल्यांत फेकण्यात आली होती. पंजाब मधील लोकांच्या संघर्षाला रक्ताच्या नदीत बुडवून त्याचा अंत करण्यात आला.

त्या वेळेपासूनच अराजकता आणि हिंसा खूप वेगाने संपूर्ण हिंदुस्थानात पसरविण्यात आली आहे. लोकांतील धर्मावर आधारित विभागणी अजून तीव्र करण्यात आली आहे. लोकांवर त्यांच्या धार्मिक मान्यतांच्या आधारावर हल्ले करण्यात आले आहेत. त्यांच्या प्रार्थनास्थळांवर हल्ले करून मुद्दामहून त्यांना आतंकित आणि अपमानित करण्यात आले आहे. लोकांतील एकतेला आणि बंधुत्वाला ह्याचा जास्तीत जास्त धोका आहे. लोकांमध्ये धार्मिक भावना भडकावून त्यांतील विभागणी अधिक तीव्र करण्याचे काम सत्ताधारी वर्गाच्या राजकीय पार्ट्यांनी केले आहे.

मक्तेदारांच्या नियंत्रणात असलेल्या प्रचार-वाहिन्यांनी हा दहशतवादी कोणी हल्ला आयोजित केला ह्याबाबत चित्रविचित्र अनुमाने व्यक्त केली आहेत. जनतेत अजून जास्त भीतीचे वातावरण पसरविणे हाच अशा अनुमानांचा हेतू आहे.

पंजाबमध्ये आणि हिंदुस्थानात अराजकता व हिंसेचे, दहशतीचे आणि धार्मिक भावना भडकविण्याचे वातावरण पसरवून कोणाचा फायदा होतो ह्याचा विचार लोकांनी शांतचित्ताने करायला हवा. दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या आणि धार्मिक भांडणे भडकाविणाऱ्या सर्व राजकीय शक्तींचा त्यांनी विरोध करायला हवा.

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी पंजाबमधील लोकांना असे आवाहन करते की, त्यांची एकता तोडणाऱ्या सर्व प्रयत्नांचा त्यांनी विरोध करावा.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published.