आपल्या हुतात्म्यांचे आवाहन – क्रांतीद्वारे समाजवादी हिंदुस्थान!

 

हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, 10 मार्च, 2018

23 मार्च हा हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी 1931मध्ये ब्रिटिश राज्याने शहीद भगत सिंह, शहीद सुखदेव व शहीद राजगुरूंना फाशी दिली होती.

BhagatSingh-Jail-painting

1857च्या महान क्रांतीनंतर व तिच्या आधीपासून देखील पूर्ण हिंदुस्थानी उपखंडात ब्रिटिश राज्याने असंख्य देशभक्तांना ठार मारले होते. “राज्याचे शत्रू” म्हणून त्यांच्या वर ते शेरा मारत. हुतात्मा दिनाच्या निमित्ताने हे देशभक्त कशासाठी लढले व त्यांना ब्रिटिशांनी का मारले हे आठवायला पाहिजे.

आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये अशा अनेक राजनैतिक व्यक्ती आहेत ज्यांचा उल्लेख “स्वातंत्र्य-सैनिक” म्हणून करण्यात येतो. मात्र ब्रिटिश राज्यकर्त्यांनी त्या सर्वांना “राज्याचे शत्रू” मानले नाही. त्या सर्वांना त्यांनी फाशी दिली नाही.

खरे तर वसाहतवादविरोधी आंदोलनात दोन प्रकारच्या पार्ट्या व राजनैतिक व्यक्ती होत्या. त्या दोन परस्पर विरोधी धारणांचे प्रतिनिधित्व करायच्या – क्रांतीकारी धारणेचे व तडजोड करणाऱ्यांचे. हिंदुस्थानी समाजांतर्गत शोषित बहुसंख्यक व शोषक अल्पसंख्यक ह्यांच्या अनुरूप ह्या दोन धारणा होत्या.

भगत सिंहाचे क्रांतीबद्दल विचार

क्रांती हा शब्द ते कोणत्या अर्थाने वापरतात, हा प्रश्न त्यांना जेव्हा कोर्टात विचारला गेला, तेव्हा भगत सिंह म्हणालेः

“क्रांतीमध्ये रक्तरंजित लढाई असायलाच हवी असे नाही व त्यात वैयक्तिक बदल्यास देखील जागा नसते. क्रांती म्हणजे बाँब किंवा पिस्तुलीचा पंथ नव्हे. आमच्या मते ’क्रांती’चा अर्थ असा की उघडपणे अन्यायावर आधारित असलेली विद्यमान प्रणाली बदलली पाहिजे. उत्पादनकर्ते किंवा श्रमिक, समाजाचे सर्वात आवश्यक घटक जरी असले, तरी त्यांच्या श्रमाच्या फळांची चोरी केली जाते व त्यांना आपल्या मूलभूत अधिकारांपासून वंचित करण्यायत येते. जो शेतकरी सर्वांसाठी धान्य उगवतो, तो आपल्या कुटुंबियांबरोबर उपाशी राहतो; जो विणकर जगाच्या बाजारपेठेस कपडा पुरवतो, तो स्वतःचे किंवा आपल्या लेकरांचे शरीरही झाकू शकत नाही; भव्य राजवाडे उभारणाऱ्या गवंड्यांना, लोहारांना व सुतारांना जनावरांसारखे झोपडपट्टीत राहावे लागते. समाजातील परजीवी, भांडवलदार व शोषक आपल्या शौकांसाठी कोट्यावधी उडवतात. ह्या भयानक असमानतेमुळे व नशीबाने थोपवलेल्या विषमतेमुळे अंदाधुंदी अटळ आहे. ही अशी परिस्थिती जास्त काळ टिकू शकत नाही…

’’ह्या संस्कृतीच्या पूर्ण इमारतीला जर वेळीसच वाचवले नाही तर ती कोलमडून पडेल. म्हणूनच एका मूलभूत परिवर्तनाची गरज आहे, आणि ज्यांना ह्याची जाणीव आहे, त्यांचे कर्तव्य आहे समाजाचे समाजवादी आधारावर पुनर्निमाण करणे. हे जर केले नाही आणि मानवाद्वारे मानवाच्या व राष्ट्रांद्वारे राष्ट्रांच्या शोषणाचा जर अंत केला नाही, तर आज मानवजातीला ज्या हालापेष्टांचा व जनसंहाराचा धोका आहे, त्यांना प्रतिबंधित करता येणार नाही. युद्धबंदी व सार्वत्रिक शांतीच्या युगाचे स्वागत करण्याबद्दल सर्व गप्पा केवळ ढोंगीपणाच आहेत.

“आमच्या मते ’क्रांती’ म्हणजे अखेरीस अशा समाजव्यवस्थेची प्रस्थापना करणे जिला अशा प्रकारच्या कोलमडण्याचा धोका नसेल, आणि जिच्यात सर्वहारा वर्गाच्या सार्वभौमत्वास मान्यता असेल व एक जागतिक महासंघ मानवजातीला भांडवलशाहीच्या गुलामीपासून व साम्राज्यवादी युद्धांपासून मुक्त करेल.

“हे आमचे आदर्श आहे, व ह्या विचारधारेपासून स्फूर्ती घेऊन आम्ही न्याय्य व पुरेसा मोठ्याने इशारा दिलेला आहे. परंतू त्याची जर दाद घेतली गेली नाही व प्रचंड वाढत असलेल्या नैसर्गिक तागदींच्या वाटेत विद्यमान सरकारी प्रणालीने अडथळे ठेवणे जर बंद केले नाही, तर एक भयानक संघर्ष सुरू होईल जे सर्व अडथळ्यांना उल्थून टाकेल व क्रांतीच्या आदर्शास मूर्त रूप देण्यासाठी सर्वहारा वर्गाची हुकूमशाही प्रस्थापित करेल.”

क्रांतीकारी दिशा स्वकिरणाऱ्यांमध्ये 1857च्या हुतात्म्यांचा व हिन्दोस्तान गदर पार्टी व हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. हिन्दोस्तान गदर पार्टी ही हिंदुस्थानी लोकांची पहिली क्रांतीकारी पार्टी. सार्वजनिक सशस्त्र उठावाद्वारे वसाहतवादी ब्रिटिश सत्तेस उल्थून टाकण्यासाठी तिची 1913 मध्ये संस्थापना झाली होती. भगतसिंह व त्यांच्या सहकाऱ्यांना हिन्दोस्तान गदर पार्टीकडून स्फूर्ती मिळाली होती व तिच्या कार्यदिशेकडून त्यांना मार्गदर्शन मिळाले. रूसमधील महान ऑक्टोबर समाजवादी क्रांतीपासून व वीसच्या दशकातील सोवियत संघात समाजवादाच्या विजयी प्रगतीपासून ते अनेक धडे शिकले. हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनने नंतर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन म्हणून आपले नामकरण केले. ब्रिटिश हिंदुस्थानी राज्याचा पूर्णतः अंत करून त्याच्या जागी अगदी नवे राज्य प्रस्थापित करणे, हा तिचा उद्देश्य होता. हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनच्या 1925च्या घोषणापत्रात क्रांतीचे राजनैतिक उद्दिष्ट म्हणजे संयुक्त राज्य हिंदुस्थानाची प्रस्थापना, अशी मांडणी केली होती. ब्रिटिश वसाहतवादी राज्याच्या विरुद्ध मुक्ती संघर्षात जी विविध राष्ट्रे, राष्ट्रीयता व लोक एकत्र आले होते, त्या सर्वांच्या सार्वभौम अधिकारांचे हे नवे राज्य जतन करेल, असे त्यात विदित होते.

तडजोडीची कार्यदिशा स्वीकारणाऱ्यांमध्ये काँग्रेस पार्टीचे व मुस्लिम लीगचे नेते व मोठ्या भांडवलदारांच्या व मोठ्या जमीनदारांच्या विविध घटकांच्या हितांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इतर संघटनांचा समावेश होता. भांडवलदारी-साम्राज्यवादी प्रणालीत व वसाहतवादी राज्यात आपल्या प्रतिनिधींना सामावून घेण्यासाठी त्यांनी ब्रिटिश शासकांबरोबर सौदाबाजी केली. विद्यमान राज्याचे जतन करून त्यात आपल्या स्वार्थी हितांसाठी अनुरूप बदल करण्याचा त्यांचा निर्धार होता.

राजनैतिक सत्तेच्या स्वभावात मूलभूत परिवर्तनासाठी क्रांतीकारक लढत. दुसरीकडे शोषणाच्या प्रणालीत किंवा राज्याच्या स्वभावात व जनतेला फोडा व तिच्या वर राज्य करा, ह्या त्याच्या सांप्रदायिक आधारात कोणतेही मूलभूत परिवर्तन केल्याशिवाय शोषकांच्या एका समूहाच्या जागी दुसऱ्या समूहाला आणण्यासाठी तडजोड करणारे लढत असत.

समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या सद्सद्विवेकबुद्धीच्या अधिकाराच्या समर्थनार्थ क्रांतीकारक लढायचे. अशा प्रकारे, भक्ती व सूफी आंदोलनातून उमललेल्या पुरोगामी विचारसरणीस त्यांनी विकसित केले. त्यांनी बरोबर ओळखले की वसाहतवादी राज्यच सांप्रदायिकता व सांप्रदायिक हिंसेचे उगमस्थान आहे. सांप्रदायिक हिंसाचारासाठी आपल्या लोकांवर व त्यांच्या आस्थांवर दोषारोप करणे त्यांनी धुडकावले व त्याचा पर्दाफाश केला. विदेशी व दमनकारी वसाहतवादी राज्याविरुद्ध, धर्म, जात किंवा भाषेची तमा न बाळगता लोकांना एकजूट करण्यासाठी त्यांनी कार्य केले.

हिंदुस्थानात “हिंदू बहुसंख्यक” व विविध इतर धर्मांचे अल्पसंख्यक आहेत, ह्या हिंदुस्थानाबद्दलच्या वसाहतवादी संकल्पनेशी काँग्रेस पार्टी, मुस्लिम लीग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू महासभा व इतरांनी तडजोड केली. त्यांच्यापैकी काहींनी मुसलमानांविरुद्ध बदला घ्या, असे हिंन्दूनां आवाहन केले. आपल्या वेगळ्या राज्यासाठी लढा, असे इतरांनी मुसलमानांना आवाहन केले. अल्पसंख्यकांबद्दल सहिष्णुतता बाळगा, असे धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली काहींनी हिंदूंना आवाहन केले.

ब्रिटिश राज्यकर्त्यांनी क्रांतीकारी लोकांना व तडजोड करणारी कार्यदिशा स्वीकारणाऱ्यांना एकदम वेगळी वागणूक दिली. त्यांनी क्रांतीकारकांचे पाशवी दमन केले. तडजोड करणाऱ्यांना विशेषाधिकार व अनुदाने दिली. त्यांनी उघडपणे सांप्रदायिक संघटनांना व तसेच धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली सहिष्णुतेचे समर्थन करणाऱ्यांना देखील समर्थन दिले.

1947 मध्ये जे ’सत्तेचे हस्तांतरण’झाले, त्यामुळे राज्याच्या व आर्थिक प्रणालीच्या स्वभावात मूलभूत परिवर्तन काही झाले नाही. शोषकांच्या एका समूहाच्या जागी दुसरा शोषक समूह आला. ब्रिटिश भांडवलदारांच्या राज्याच्या जागी मोठ्या जमीनदारांच्या व इतर शोषकांच्या बरोबर युती करून हिंदुस्थानी मोठ्या भांडवलदारांनी सत्ता हस्तगत केली. राज्यात व सामाजिक प्रणालीत क्रांतीकारी परिवर्तन न होऊे देता राजनैतिक स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी व हिंदुस्थानाच्या मोठ्या भांडवलदारांनी पडद्यामागे अशा प्रकारचा सौदा केला होता.

गेली सात दशके, क्रांतीला रोखण्यासाठी वसाहतवादी राज्याचे, त्याच्या ’कायदेशार शासना’चे व त्याच्या सांप्रदायिक पायाचेही अखंड जतन करण्यात आले आहे. शोषण व लुटीच्या प्रणालीचे जतन करणे, लोकांना विभाजित ठेवणे व काहीही झाले तरी सामाजिक क्रांतीवर प्रतिबंध घालणे, हेच राज्याचे उद्दिष्ट राहिले आहे, पंतप्रधान मोदी जेव्हा दावा करतात की ’नव्या भारता’ची निर्मिती करण्यास त्यांचे सरकार प्रतिबद्ध आहे, तेव्हा ते ह्या थापेची उजळणी करतात की क्रांतीविना गुणात्मक परिवर्तन होऊ शकते. जवाहरलाल नेहरूंच्या काळापासून वेगवेगळ्या रूपांनी हीच थाप आपल्या लोकांना ऐकवली गेली आहे.

सर्व प्रकारच्या दमन व शोषणापासून मुक्त हिंदुस्थान, ही आजही आपल्या लोकांतील मोठ्या बहुसंख्येची आकांक्षा आहे. प्रत्यक्षात मात्र कामगार बेकारी, महागाई व कामाच्या ठिकाणच्या प्रचंड शोषणापासून मुक्त नाहीत. उपजीविकेच्या वाढत्या असुरक्षिततेपासून व मोठमोठ्या कंपन्यांच्या हितार्थ आपली जमीन हिरावून घेण्याच्या धोक्यापासून शेतकरी मुक्त नाहीत. पक्षपात, दमन व जुन्या व नव्या प्रकारच्या हिंसेपासून महिला मुक्त नाहीत. विद्यापीठांमध्ये विविध राजनैतिक विषयांवर चर्चा करण्याकरता विद्यार्थी मुक्त नाहीत. राज्याच्या व वैयक्तिक हिंसाचारापासून व गुंडगिरीपासून सामाजिक वातावरण मुक्त नाहीत. आजसुद्धा लोक जातीय भेदभावाने व सामाजिक बष्किराने पीडित आहेत. सांप्रदायिक हिंसाचाराच्या धोक्यापासून आपण मुक्त नाही.

सर्व प्रकाराच्या दास्यत्वापासून मुक्त नव-हिंदुस्थानाच्या निर्मितीची शपथ पुरी केली जात नाही ह्याचे कारण काय आहे? कारण हेच आहे की जुन्याचा अंत केल्याविना नव्याची निर्मिती होऊ शकत नाही. ज्या नव-हिंदुस्थानासाठी आपले क्रांतीकारी शहीद लढले, त्याच्या निर्मितीसाठी जुन्या शोषक भांडवलदारी प्रणालीस व त्याचे रक्षण करण्यासाठी जे राज्य बनवले आहे त्यास क्रांतीद्वारे उल्थून टाकणे ही अनिवार्य अट आहे. हिंदुस्थान अशा क्रांतीची आस बाळगून आहे जी भांडवलशाही उल्थून टाकेल, सामंतवाद व वसाहतवादाच्या सर्व अवशेषांचा अंत करेल व साम्राज्यवादाची साखळी तोडून बाहेर पडेल. ह्या क्रांतीद्वारे कामगार – शेतकऱ्यांचे राज्य प्रस्थापित केलेच पाहिजे. आजचे राज्य म्हणजे भांडवलदार राज्याची हुकूमशाही आहे. त्याच्या जागी संपूर्णतः नवे राज्य प्रस्थापित केले पाहिजे. हे राज्य म्हणजे आपल्या क्रांतीकारी शहीदांनी ज्या प्रमाणे विचार केला त्या प्रमाणे सर्वहारा वर्गाच्या हुकूमशाहीचे व स्वेच्छाधारित हिंदुस्थानी संघाचे राज्य असेल.

सर्वहारा वर्गाच्या हुकूमशाहीचे हे राज्य श्रमिकांना शोषणापासून मुक्तीची हमी देईल, शेतीकाम करणाऱ्यांना असुरक्षिततेपासून मुक्ती देईल, जातीवर व लिंगावर आाधारित पक्षपातापासून, राष्ट्रीय दमनापासून व सर्व प्रकारच्या छळापासून मुक्ती देईल. राष्ट्रीय संपत्तीचा फायदा श्रमिक जनतेला मिळेल ह्याची ते हमी देईल. असे करण्यासाठी ते इतर लोकांच्या श्रमाच्या फळांवर जगणाऱ्या शोषक अल्पसंख्यकांच्या आर्थिक आधाराचा अंत करेल. उत्पादन व विनिमयाच्या महाकाय साधनांना मूठभरांच्या खाजगी मालमत्तेपासून ते सर्व लोकांच्या सामाजिक मालमत्तेत परिवर्तित करेल. ते साम्राज्यवादी प्रणालीपासून पूर्णतः नातं तोडेल व स्वावलंबी समाजवादी अर्थव्यवस्था निर्माण करेल.

शहीद भगत सिंह व इतर क्रांतीकारी शहीदांचा मार्ग उचलून धरण्याचा अर्थ, क्रांतीविना नव-हिंदुस्थानाची निर्मिती होऊ शकते हा खोटा दावा धुडकाऊन देणे. ब्रिटिश वसाहतवादी शासकांपासून वारसारूपी मिळालेल्या पूर्णतः कुजक्या व शोषक भांडवलदारी प्रणालीचे व राज्याचे जतन करून व त्याच्यातच काही सुधार करून काहीच नवे बनू शकत नाही.

आपल्या शहीदांच्या हाकेस साद देणे म्हणजे हिंदुस्थानी धरतीवर आमूलाग्र कांतीसाठी कार्य करणे.

इंकलाब झिंदाबाद!

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published.