महान ऑक्टोबर क्रांतीची शिकवण चिरायू होवो ! चला आपण हिंदुस्थानच्या क्रांतीच्या विजयासाठी परिस्थिती तयार करूया !

4 नोव्हेंबरच्या दिवशी, 100 वर्षांपूर्वी, संपूर्ण रशियात अनेक कारखान्यांमध्ये आणि सैन्याच्या तुकड्यांमध्ये भांडवलदार वर्गाची सत्ता क्रांतीद्वारे उलथून टाकण्याची जय्यत तयारी सुरु होती. राजधानी पेट्रोग्राड शहरातील स्मोल्नी ह्या रशियन सोशल डेमोक्रॅटिक लेबर पार्टी (बोल्शेविक) च्या मुख्यालयात 6 नोव्हेंबर 1917 रोजी कॉम्रेड लेनिन ह्यांचे आगमन झाले. त्या दिवशी रात्रभर सैन्याच्या क्रांतिकारी तुकड्या आणि लाल सेनेच्या तुकड्या तिथे येत राहिल्या. जिथे प्रासंगिक सरकार पाय रोवून बसले होते, त्या शहराच्या मध्यभागी असलेल्या हिवाळी राजवाड्याला वेढा देण्यासाठी बोल्शेविक पार्टीने त्यांना पाठविले.

हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीचे सचिव कॉम्रेड लाल सिंग ह्यांचे मुख्य भाषण, 4 नोव्हेंबर 2017

साथींनो!

4 नोव्हेंबरच्या दिवशी, 100 वर्षांपूर्वी, संपूर्ण रशियात अनेक कारखान्यांमध्ये आणि सैन्याच्या तुकड्यांमध्ये भांडवलदार वर्गाची सत्ता क्रांतीद्वारे उलथून टाकण्याची जय्यत तयारी सुरु होती. राजधानी पेट्रोग्राड शहरातील स्मोल्नी ह्या रशियन सोशल डेमोक्रॅटिक लेबर पार्टी (बोल्शेविक) च्या मुख्यालयात 6 नोव्हेंबर 1917 रोजी कॉम्रेड लेनिन ह्यांचे आगमन झाले. त्या दिवशी रात्रभर सैन्याच्या क्रांतिकारी तुकड्या आणि लाल सेनेच्या तुकड्या तिथे येत राहिल्या. जिथे प्रासंगिक सरकार पाय रोवून बसले होते, त्या शहराच्या मध्यभागी असलेल्या हिवाळी राजवाड्याला वेढा देण्यासाठी बोल्शेविक पार्टीने त्यांना पाठविले.

7 नोव्हेंबरला, म्हणजे त्या वेळच्या रशियन कॅलेंडर प्रमाणे 25 ऑक्टोबर रोजी, क्रांतिकारी कामगार, सैनिक, आणि नाविकांनी हिवाळी राजवाड्यावर कब्जा केला आणि प्रासंगिक सरकारच्या प्रतिनिधींना अटक केले. मंत्रालये, स्टेट बँक, रेल्वे स्टेशन, डाक आणि तार कार्यालये, आदी सगळ्यांवर त्यांनी कब्जा केला. बोल्शेविक पार्टीच्या नेतृत्वाखाली श्रमिक वर्गाने रशियात राजकीय सत्ता स्वतःच्या हातात घेतली. पूर्ण जग ह्यामुळे हादरून गेले. सर्व देशातील भांडवलदारांच्या छातीत त्यामुळे धडकी भरली.

कामगार आणि सैनिकांच्या सोविएतांच्या प्रतिनिधींच्या दुसऱ्या अखिल रशियन काँग्रेसचे कामकाज 7 नोव्हेंबर रोजी रात्री 10:40 वाजता सुरु झाले. अगदी त्याचवेळी क्रांतिकाऱ्यांनी हिवाळी राजवाड्यावर कब्जा केला होता. 8 नोव्हेंबरला पहाटे 5 वाजता, लेनिनने लिहिलेल्या “कामगार, सैनिक आणि शेतकऱ्यांना आवाहनाच्या” मसुद्याला काँग्रेसने संमती दिली. सोविएतांच्या काँग्रेसने राजकीय सत्ता हातात घेतली आहे ह्याची त्यात घोषणा होती. 8 नोव्हेंबरला रात्री 8 वाजता काँग्रेसची दुसरी बैठक सुरु झाली. त्यात काँग्रेसने शांततेचे फर्मान संमत केले. त्यामुळे पहिल्या विश्वयुद्धात रशियाचा सहभाग संपुष्टात आला. काँग्रेसने जमिनीबद्दलचे फर्मानही संमत केले. त्यानुसार जमीनदारांच्या कब्जाखालील शेकडो करोडो एकर जमीन शेतकऱ्यांच्या समित्यांच्या हातात सोपविण्यात आली. काँग्रेसने कॉम्रेड लेनिनच्या नेतृत्वाखाली पहिले सोविएत सरकार प्रस्थापित केले. लोकांच्या कमिसारांच्या परिषदेचा अध्यक्ष अशी कॉम्रेड लेनिनची निवड झाली.

लष्करी हस्तक्षेप करून सोविएत सत्तेला उलथून टाकण्याची पराकाष्ठा 14 भांडवलदारी देशांनी केली. पण त्यांचा पूर्ण पराभव झाला. 1922 साली, संयुक्त सोविएत समाजवादी गणराज्य प्रस्थापित करण्यात आले. पूर्वीच्या रशियन साम्राज्याच्या अधिपत्यातील अनेक राष्ट्रे स्वखुशीने त्यात एकजूट झाली. नवीन सोविएत राज्याने मोठ्या भांडवलदारांची संपत्ती जप्त केली आणि मोठ्या उद्योगांना, दळणवळणाच्या क्षेत्राला, बँकांना आणि व्यापाराला सार्वजनिक मालकीच्या सामाजिक उपक्रमात परावर्तित केले. आपल्या छोट्या छोट्या जमिनीच्या तुकड्यांना स्वखुशीने एकत्रित करून मोठी सहकार शेती निर्माण करण्यास नवीन सोविएत राज्याने गरीब शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. सर्व चीजवस्तू आणि सेवांना, सर्व कष्टकरी जनतेच्या गरजांची पूर्ती करण्यासाठी एका सामायिक नियोजनाखाली आणण्यात आले. एक नवीन समाजवादी अर्थव्यवस्था निर्माण झाली ज्यात बेकारी, महागाई अथवा कुठल्याही प्रकारचे आर्थिक संकट नव्हते. सोविएत सत्तेने अशी परिस्थिती निर्माण केली की त्यामुळे सर्व प्रकारच्या भेदभावापासून महिलांना मुक्ती मिळाली आणि समाज-जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्यांना समान दर्जा प्राप्त झाला.

1936 साली सोविएत युनियनमधील लोकांनी एक नवीन राज्यघटना स्विकारली जी जगातील सगळ्यात लोकतांत्रिक आणि आधुनिक राज्यघटना आहे. स्टॅलिन राज्यघटना असे तिला ओळखण्यात येते. आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धात जर्मन, इटालियन आणि जपानी साम्राज्यवादी आघाडीला पराभूत करण्यात सोविएत युनियनने जी बहाद्दूर भूमिका निभावली, त्यामुळे 1945 पर्यंत तर सोविएत युनियनला जगभरातील लोकांचे प्रेम आणि आदर मिळाला. महान ऑक्टोबर समाजवादी क्रांती ही घटना प्रचंड ऐतिहासिक महत्त्वाची असण्याची ही काही कारणे आहेत. आज जरी सोविएत युनियन अस्तित्वात नसले, तरी त्या क्रांतीने जो दैदिप्यमान मार्ग दाखविला आणि जे नव्या प्रकारचे राज्य आणि व्यवस्था प्रस्थापित केली त्याने आजही समाजाच्या विकासासाठी संघर्ष करणाऱ्यांना मार्गदर्शन मिळते.

साथींनो!

ऑक्टोबर क्रांतीने वैज्ञानिक समाजवादाच्या माक्र्सवादी सिद्धांताची वैधता अत्यंत प्रखरपणे दाखवून दिली.

माक्र्सवादाचा उदय 19 व्या शतकात ज्यावेळी झाला त्यावेळी युरोप मधील अनेक देशांत, मोठ्या प्रमाणावरील औद्योगिक उत्पादनात आधुनिक यंत्राचा वापर सुरु झाल्यामुळे उत्पादक शक्तींचा प्रचंड विकास झाला होता. जुनी सामंती व्यवस्था मोडकळीस येत होती. अनेक क्षेत्रात वैज्ञानिक ज्ञानाचा विकास होत होता. भांडवलदारी अर्थव्यवस्था ठराविक काळाने संकटात येत होती व त्यामुळे उत्पादक शक्तींचा मोठया प्रमाणावर नाशही होत होता. दर काही वर्षांनी हजारो कामगारांना नोकरीवरून काढून टाकण्यात येत होते. बेरोजगारी हा समाजाचा कायमचा आजार झाला होता.

सातत्याने येणाऱ्या त्या संकटाचे मूळ हे उत्पादन प्रक्रियेचे सामाजिकीकरण आणि उत्पादन साधनांची खाजगी मालकी यांच्या परस्पर अंतर्विरोधात आहे, हे कार्ल माक्र्सनी शोधून काढले. भांडवलदारी व्यवस्था हीसुध्दा तात्पुरतीच आहे असा त्यांनी निष्कर्ष काढला. उत्पादन साधनांच्या खाजगी मालकीच्या ऐवजी सामाजिक मालकी प्रस्थापित करून भांडवलशाहीच्या जागी साम्यवादाची (कम्युनिझमची) प्रस्थापना होईल असा त्यांनी निष्कर्ष काढला.

समाजात वर्ग विभाजन आणि वर्ग संघर्ष आहेत हे त्यांच्या अगोदरही वैज्ञानिकांनी मान्य केले होते. कार्ल माक्र्सनी असा निष्कर्ष काढला की वर्ग संघर्षामुळे सर्वहारा (श्रमजीवी) वर्गाची हुकुमशाही प्रस्थापित होईल. भांडवलशाही मधील अंतर्विरोध संपुष्टात आणण्यासाठी आणि वर्गविरहित साम्यवादी समाज (कम्युनिस्ट समाज) प्रस्थापित करण्यासाठी ते आवश्यक आहे.

माक्र्सच्या ह्या निष्कर्षांची भांडवलदार वर्गाच्या प्रवक्त्यांनी खिल्ली उडविली. खाजगी संपत्ती आणि भांडवलदार वर्गाशिवाय समाज शक्यच नाही असा त्यांचा दावा होता. सर्वहारा (श्रमजीवी) वर्ग समाज चालविण्यास सक्षम नाही असे त्यांनी घोषित केले. भांडवलदारांच्या अशा सगळ्या दाव्यांना आणि घोषणांना ऑक्टोबर क्रांतीने चकणाचूर केले.

73 दिवस टिकलेला 1871चा “पॅरिस कम्युन”, हा सत्ताधारी वर्ग बनण्याचा सर्वहारा वर्गाचा पहिला प्रयत्न होता. फ्रांसच्या कामगारांच्या त्या बहाद्दूर प्रयत्नापासून माक्र्स आणि एंगेल्सनी एक महत्त्वाचा निष्कर्ष काढला. भांडवलदारांची तयार राज्य यंत्रणा हातात घेऊन सर्वहारा वर्ग तिचा स्वतःचे राज्य चालविण्यासाठी वापर करू शकत नाही, हा तो महत्त्वाचा निष्कर्ष होता. कष्टकऱ्यांना दडपून ठेवण्यासाठी आणि भांडवलदार वर्गाची हुकुमशाही त्यांच्यावर लादण्यासाठी भांडवलदार राज्याची जी राज्य यंत्रणा असते तिचा खात्माच करायला हवा. त्याच्या जागी एक नवीन राज्य प्रस्थापित करायला हवे जे सर्वहाराच्या हुकुमशाहीचे साधन असेल. रशियातील ऑक्टोबर क्रांतीने ते प्रतिपादन प्रत्यक्षात साकार केले.

ऑक्टोबर क्रांतीने भांडवलदारी राज्याची संपूर्ण यंत्रणा अगदी मुळासकट उखडून टाकली. त्याच्या जागेवर एका नवीन राज्याची प्रस्थापना केली – कामगार वर्गाचे वर्चस्व सुनिश्चित करण्याचे एक साधन असे सोविएत राज्य.

औद्योगिक कामगारांचे लोकप्रिय राजकीय संघटनाचा एक प्रकार म्हणून ‘कामगार प्रतिनिधींचे सोविएत’ हे रशियातील 1905मधील उठावा-दरम्यान उदयास आले होते. ह्या सोविएत म्हणजे वर्ग संघर्षात तावून सुलाखून निघालेल्या कामगार वर्गामधील लढवय्या कामगारांचे प्रतिनिधी मंडळ. कामगार स्वतःच आपल्यामधील कामगारांचे चयन करून त्यांना प्रतिनिधी मंडळांसाठी निवडून द्यायचे. सोविएतची ही कल्पना कामगारांच्या मनात घर करून बसली होती आणि झारची सत्ता उखडून टाकण्यासाठीच्या फेब्रुवारी 1917च्या क्रांतिकारी उठावात त्यांनी ती पुन्हा अमलात आणली. प्रमुख शहरांमध्ये कामगार आणि सैनिकांच्या प्रतिनिधींच्या सोविएत आणि अनेक ग्रामीण जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या सोविएत प्रस्थापित झाल्या.

सर्व सत्ता सोविएतांच्या हातात सुपूर्द करून ऑक्टोबर क्रांतीने एका संपूर्णपणे नवीन राज्याचा, अर्थात् सोविएत राज्याचा, पाया रचला. अनेक विशेषाधिकार असणाऱ्या आणि लट्ठ पगार घेणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या जागी नागरी सेवकांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचे वेतन कुशल कामगारांपेक्षा जास्त नसायचे आणि त्यांना कामावरून परत बोलाविण्याचा अधिकारही जनतेच्या हातात असायचा. झारच्या परजीवी बांडगुळ अशा सैन्याच्या ऐवजी लाल सेना उभारण्यात आली, जी शोषकांची सत्ता झुगारून देण्यासाठीच्या क्रांतिकारी संघर्षात उदयास आली होती आणि विकसित झाली होती. नागरी सेवक आणि सैनिक, सगळे सोविएतांच्या अखिल रशियन काँग्रेसच्या अधिपत्याखाली होते. सर्वहाराच्या हुकुमशाहीचा एक विशिष्ट प्रकार म्हणून सोविएत राज्याचा उदय आणि विकास झाला. हे एक असे साधन होते ज्याने शोषकांचा विरोध चिरडून सर्व प्रकारच्या शोषणाचा नायनाट केला.

साथींनो!

ज्या देशात भांडवलशाहीचा पूर्ण विकास झाला असेल आणि जिथे सर्वहारा वर्गाची बहुसंख्या असेल तिथेच समाजवादी क्रांती विजयी होऊ शकेल असे 19 व्या शतकात बहुतेक माक्र्सवादी मानत असत. म्हणूनच झारच्या रशियात समाजवादी क्रांती सफल होणे अशक्य आहे असेच मानले जाई, कारण ब्रिटन, फ्रांस, आणि युरोपातील इतर अनेक देशांच्या मानाने भांडवलशाही विकासाच्या बाबतीत रशिया फारच पिछाडलेला होता. रशियन समाजात सर्वहारा वर्ग अल्पसंख्यक होता. शेतजमिनीच्या लहान लहान तुकड्यांवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची बहुसंख्या होती. अशा परिस्थितीत फक्त भांडवलदारी लोकशाही क्रांतीच शक्य आहे असा युक्तिवाद आणि मांडणी बरेच माक्र्सवादी करीत. झारच्या हुकूमशाहीच्या जागी भांडवलदारी लोकशाही प्रस्थापित करणे हेच क्रांतीचे उद्दिष्ट असू शकते, असा ते उपदेश करीत.

हा सर्व युक्तिवाद लेनिनने नाकारला आणि रशियात सर्वहारा वर्गाने सत्ताधारी वर्ग बनण्याच्या आवश्यकतेवर भर दिला व त्याची जोरकस मांडणी केली. 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातच, शोषण आणि लुटीची वैश्विक व्यवस्था असा भांडवलदारी व्यवस्थेचा विकास झाला होता. वैज्ञानिक समाजवादाच्या माक्र्सवादी सिद्धांताच्या आधारावर त्या ठोस परिस्थितीचे लेनिनने विश्लेषण केले. साम्राज्यवाद ही भांडवलशाहीची उच्चतम अवस्था आहे असे मूल्यांकन लेनिनने केले. ह्या अवस्थेत भांडवलशाहीच्या अंतर्गत असणारे अंतर्विरोध संपुष्टात आणणे शक्य होते, असे मूल्यांकन लेनिनने केले. भांडवलशाही देशांच्या असंतुलित विकासाचे नियम त्यांनी शोधले आणि साम्राज्यवादाची जागतिक साखळी ज्या देशात सगळ्यात कमजोर असेल तिथे तुटेल असे भाकीत केले. ज्या देशात इतर देशांच्या तुलनेने भांडवलशाहीचा विकास कमी झालाय त्या देशातही सर्वहाराची क्रांती विजयी होऊ शकते असा निष्कर्ष त्यांनी काढला.

सर्वहारा वर्गाला सत्ताधारी वर्ग व्हायचे असेल तर त्यासाठी एका क्रांतिकारी पार्टीचे नेतृत्व आवश्यक आहे. दुसऱ्या इंटरनॅशनलमध्ये सहभागी असलेल्या पाट्र्या संसदीय संघर्षासाठी सक्षम होत्या. राजकीय सत्तेवर बलपूर्वक कब्जा करण्यासाठी श्रमजीवी वर्गाचे नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यात नव्हती. लेनिनने एक अशा प्रकारची पार्टी उभारण्याची कल्पना मांडली, जी श्रमजीवी वर्गाचाच हिस्सा असेल आणि त्याच बरोबर आघाडीची फळीही असेल. ती क्रांती हाच पेशा असणाऱ्यांची पार्टी असेल. सगळ्यात जास्त लढाऊ आणि वर्गीयदृष्टया सगळ्यात जागृत कामगारांना त्या पार्टीचे सभासदत्व मिळेल. ती पार्टी सगळ्यात जास्त उन्नत आणि आधुनिक सिद्धांताचे मार्गदर्शन घेईल. श्रमिक वर्गाने स्वतःच्या हातात राजकीय सत्ता घेण्यासाठी त्याचे नेतृत्व करण्याच्या उद्दिष्टापासून ती पार्टी कधीही ढळणार अथवा पथभ्रष्ट होणार नाही.

त्या वेळी रशियन क्रांतीकाऱ्यांमध्ये अनेक गूट, पाट्र्या, आणि वैचारिक कल होते. त्यात नारोदनिक(लोकवादी) सगळ्यात प्रमुख होते. कामगार वर्गाला नव्हे तर शेतकऱ्यांना ते मुख्य क्रांतिकारी शक्ती मानत. शासक वर्गातील काही मोजक्या व्यक्तींना काही हीरोंनी (नायकांनी) जर ठार मारले तर झारशाहीची सत्ता उलथून टाकता येईल असे ते मानत. अनेक माक्र्सवादी असेही मानत की एका पार्टीत एकजूट होणे आवश्यक नाही. तात्कालिन आर्थिक मागण्यांसाठीचा कामगारांचा संघर्ष आपोआपच समाजवादाची स्थापना करेल असे मानणाऱ्या संघटनाही होत्या. अशा सर्व चुकीच्या आणि हानीकारक विचारांच्या आणि कृतींच्याविरुद्ध सातत्याने आणि बिनतडजोड संघर्ष करून, सर्व रशियन कम्युनिस्टांना, कामगार वर्गाचे नेतृत्व करणाऱ्या एका क्रांतिकारी पार्टीमध्ये एकजूट करण्याच्या कार्यात कॉम्रेड लेनिनची प्रमुख भूमिका होती.

पार्टीच्या सभासदत्वासाठी काय नियम असावेत, हा एक महत्त्वाच्या प्रश्न होता ज्याच्यावर तीव्र संघर्ष झाला. एखाद्या सभासदाने केवळ पार्टीच्या कार्यक्रमाला पाठिंबा देणे व नियमितपणे सदस्यत्वाची फी देणे पुरेसे नाही असे लेनिनने ठामपणे मांडले. पार्टीच्या एकातरी संघटनेच्या शिस्तीखाली प्रत्येक सभासदाने काम करणे आवश्यक आहे. असे केल्यानेच पार्टीचे सर्व सभासद एका समान शिस्तीखाली एकजुटीच्या शक्तीने काम करतील.

रशियन सोशल डेमोक्रॅटिक लेबर पार्टीची स्थापना 1898मध्ये झाली. 1911 पर्यंत विचारांबद्दल आणि काम करण्याच्या पद्धतीच्या वेगवेगळ्या दिशांबद्दल त्या पार्टीत अंतर्गत टक्कर होत राहिली. लेनिनच्या नेतृत्वाखालील गटाला बहुमत होते. त्यांना बोल्शेविक म्हणत असत. बोल्शेविक गटाचे ठाम मत होते की झारची सत्ता उलथून टाकण्यासाठी जनतेचा सार्वत्रिक सशस्त्र उठाव आवश्यक आहे आणि त्याद्वारे शेतकऱ्यांच्या साथीने श्रमिक वर्गाची सत्ता प्रस्थापित करणे आवश्यक आहे. अल्पमतातील, म्हणजेच मेंशेविकांचे म्हणणे होते की भांडवलदारांच्या पार्टीबरोबर (कॉन्स्टिटयूशनल डेमोक्रॅटिक पार्टीबरोबर) युती करून झारशाहीच्या जागेवर भांडवलदारी लोकशाहीची स्थापना करावी. जानेवारी 1912मध्ये झालेल्या पार्टीच्या संमेलनात सगळे क्रांतिकारी बोल्शेविकांच्या विचारांभोवती एकजूट झाले, तर मेंशेविक विचारांचे कट्टर समर्थक पार्टीतून बाहेर पडून एका वेगळ्या पार्टीच्या माध्यमातून काम करू लागले.

लोकतांत्रिक केंद्रीयवादाच्या आधारावर पोलादी एकजूट असलेले एक क्रांतिकारी पार्टीचे मॉडेल म्हणून रशियन सोशल डेमोक्रॅटिक लेबर पार्टी (बोल्शेविक)चा विकास झाला. नंतर त्या पार्टीचे सोविएत रशियाची कम्युनिस्ट पार्टी (बोल्शेविक) असे नामकरण झाले. “प्राव्दा” नावाच्या कामगारांच्या एका उत्कृष्ट वृत्तपत्राच्या सहाय्याने पार्टीने क्रांतिकारी कामगारांच्या नवीन पिढीला पार्टीचे सभासद बनविले आणि प्रशिक्षित केले. क्रांतीची लाट जेव्हा जोरात असते तेव्हा कशी आगेकूच करायची आणि जेव्हा क्रांतीची पीछेहाट होते तेव्हा सुनियोजितपणे कसे मागे हटायचे हेही बोल्शेविक पार्टीला माहित होते. बोल्शेविक पार्टी कायदेशीरपणे आणि बेकायदेशीरपणे अशा दोन्ही प्रकारे काम करीत होती. 1917 पर्यंत, श्रमजीवी वर्गाची सगळ्यात आघाडीची आणि संघटित पार्टी अशा स्वरुपात बोल्शेविक पार्टी प्रस्थापित झाली होती. क्रांतिकारी कार्यदिशेच्या सभोवती पार्टीमध्ये पोलादी एकता प्रस्थापित झाली होती.

फेब्रुवारी क्रांतीमध्ये जेव्हा झारची सत्तेवरून उचलबांगडी झाली तेव्हा सोविएतांमध्ये बोल्शेविकांना बहुमताचा पाठिंबा नव्हता. म्हणूनच, स्वतःच्या हातात सत्ता घेण्यासाठी सोविएत तयार नव्हते. एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली होती जिला लेनिनने दुहेरी सत्ता असे म्हटले.

एका बाजूला भांडवलदार वर्गाच्या नेतृत्वाखालील प्रासंगिक सरकार होते, ज्याला अंतर-साम्राज्यवादी युद्धातील रशियाचा सहभाग कायम ठेवायचा होता. तर दुसऱ्या बाजूला आपापल्या प्रतिनिधींच्या सोविएतांमध्ये संघटित झालेले कामगार, शेतकरी आणि सैनिक होते ज्यांना जमीन, ब्रेड (भाकरी) आणि शांती हवी होती. त्यावेळी सोविएत्सवर सोशालिस्ट रेवोलुशनरी पार्टी आणि मेंशेविकांचा जास्त प्रभाव होता. ते भांडवलदारी प्रासंगिक सरकाराबद्दल भ्रम पसरवित होते.

16 जून 1917 रोजी सोविएतांच्या प्रथम अखिल रशियन काँग्रेसची बैठक आयोजित केली गेली. कामगार, शेतकरी व सैनिकांच्या 300 सोविएतांच्या 1090 प्रतिनिधींनी त्यात भाग घेतला. त्यांच्यापैकी केवळ 105 प्रतिनिधी बोल्शेविक पार्टीचे होते. त्या अधिवेशनाने प्रासंगिक सरकाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.

त्या परिस्थितीत बोल्शेविक पार्टीने अत्यंत संयमाने आणि अथक काम केले. कामगार, शेतकरी व सैनिकांमधील राजकीयदृष्ट्या अधिक जागृत लोकांना त्यांनी समजावून सांगितले की प्रासंगिक सरकाराचे चरित्र आणि खरे स्वरूप भांडवलदारी आणि साम्राज्यवादी आहे. शांती, जमीन आणि ब्रेड ह्या जनतेच्या इच्छा ते कधीच पुऱ्या करणार नाही. म्हणूनच सर्व सत्ता सोविएतांच्या हातात येणे अत्यावश्यक आहे. हे कार्य सातत्याने आणि संयमाने केल्यामुळेच वर्ग-समझौत्याच्या विचारांचा पराभव करण्यात बोल्शेविक पार्टी यशस्वी झाली.

सप्टेंबरच्या सुरुवातीपर्यंत, बहुतांश कामगार-शेतकऱ्यांना स्वतःच्या अनुभवावरून नीट समजले की प्रासंगिक सरकार त्यांच्या मागण्या कधीच पूर्ण करणार नाही. बोल्शेविक पार्टीला आणि सर्व सत्ता सोविएतांच्या हाती यावी ह्या विचाराला पाठिंबा वेगाने वाढू लागला.

7 नोव्हेंबरला सोविएतांच्या द्वितीय अखील रशियन काँग्रेसच्या अधिवेशनात 670 प्रतिनिधींनी भाग घेतला. त्यांपैकी 472 बोल्शेविक पार्टीचे होते. सोविएतांच्या हातात संपूर्ण सत्ता देण्यात यावी ह्या प्रस्तावाला तब्बल 505 प्रतिनिधींनी पाठिंबा दिला.

बहुतांश कष्टकरी लोकांना आपल्या नेतृत्वाखाली संघटित करण्यासाठी बोल्शेविक पार्टीने अथक आणि सातत्याने काम केले. रशियात भांडवलदार वर्गाच्या पराजयाचे आणि श्रमजीवी वर्गाच्या विजयाचे हेच मुख्य कारण होते.

रशियात शोषक वर्गाला सत्तेवरून खाली खेचून श्रमजीवी वर्ग शासक वर्ग बनला कारण बोल्शेविक पार्टीने श्रमजीवी वर्गात क्रांतिकारी जागृती विकसित केली व त्याला संघटित केले. पार्टीने दाखविलेल्या दिशेनुसार कष्टकरी जनतेने पोलादी एकजुटीने आगेकूच केल्यामुळेच ती शासक वर्गाचा गळा पकडून त्याला सत्तेवरून खाली खेचू शकली. म्हणूनच महान ऑक्टोबर समाजवादी क्रांतीचा उद्घोष करणे म्हणजेच कॉम्रेड लेनिन आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संघटित पार्टीचा उद्घोष करणे होय.

साथींनो!

ऑक्टोबर क्रांतीच्या शताब्दीच्या निमित्ताने आपण फक्त त्या ऐतिहासिक घटनेचा आणि तिच्या महान नेत्यांचा उद्घोष करण्यासाठी जमलेलो नाही.

आपण हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट नेत्यांची एक पार्टी आहोत. इतिहासाकडे आपण एका राजकीय दृष्टीकोणातून बघतो. आत्ताच्या काळात हिंदुस्थानमध्ये क्रांतीचा विजय होण्यासाठी आवश्यक परिस्थिती कशी निर्माण करता येईल हे आपण त्या महान क्रांतीपासून शिकू इच्छितो.

कामगार आणि कष्टकरी शेतकऱ्यांना हिंदुस्थानचे शासक बनविण्यासाठी आपण काय करायला हवे? हिंदुस्थानच्या भूमीत श्रमजीवी वर्गाची हुकुमशाही असलेले राज्य निर्माण करण्यासाठी, टाटा, बिर्ला, अंबानी, अडाणी आणि इतर मक्तेदार भांडवलदारांची संपत्ती जप्त करण्याचे फर्मान जारी करेल, अशी कष्टकरी बहुसंख्य जनतेची सत्ता निर्माण करण्यासाठी आपण काय केले पाहिजे? हीच समस्या आहे जी आपल्याला सोडवायची आहे.

आजच्या परिस्थितीबद्दल आपण खूपच चिंतित आहोत आणि म्हणूनच भूतकाळाकडे बघत आहोत. आजच्या गंभीर परिस्थितीशी कसा मुकाबला करायचा हे आपण भूतकाळापासून शिकलो पाहिजे. आपल्या देशातील जनतेच्या आणि जगभरातील कामगार व शोषितांच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग उघडण्यासाठी आपण भूतकाळापासून शिकू इच्छितो. 100 वर्षांपूर्वी बोल्शेविक जे करण्यात सफल झाले ते आपण आत्ता करायला हवे.

जागतिक स्तरावरील आजची स्थिती आणि 100 वर्षांपूर्वीची परिस्थिती ह्यात काही साम्य आहे आणि बराच काही फरकही आहे. त्यावेळी विरोधी साम्राज्यवादी गटांनी संपूर्ण जगाला एका अत्यंत विनाशकारी युद्धात ढकलले होते. ह्या युद्धात वेगवेगळ्या देशांतील कामगार-शेतकऱ्यांना एकमेकांना ठार मारण्याचे आदेश देण्यात आले होते. आज अमेरिकन साम्राज्यवाद्यांनी आणि त्यांच्या सहयोग्यांनी अशी परिस्थिती निर्माण केलीय की जगातील अनेक भूभागांमध्ये सतत युद्धस्थिती आणि ड्रोनद्वारे हल्ले नित्याचेच झाले आहे. आधीच्या दोन्ही विश्वयुद्धांपेक्षा जास्त विनाशकारी असेल, असे तिसरे विश्वयुद्ध होण्याची टांगती तलवार आहे.

अमेरिकन साम्राज्यवादी स्वतःच्या अधिपत्याखाली एक धृवीय जग प्रस्थापित करू पाहतायत. त्या अभियानाचे शिकार झालेले देश, त्या देशातील लोक तसेच अमेरिकेतील कामगार वर्ग आणि लोक त्याला वाढत्या प्रमाणात विरोध करताहेत. प्रतिस्पर्धी साम्राज्यवादी शक्तींशीही अमेरिकन साम्राज्यवाद्यांची टक्कर वाढत आहे. . अमेरिकन सत्ताधारी वर्गातही गंभीर फूट आहे. प्रचलित साम्राज्यवादी प्रणालीमधील अस्थिरता आणि कमजोरी ह्यावरून दिसून येते.

25 वर्षांपूर्वी जेव्हा सोविएत युनियनचे विघटन झाले तेव्हा जागतिक क्रांतीची पिछेहाट सुरु झाली. जागतिक राजनितीच्या मंचावरील मध्यवर्ती केंद्र बिंदूपासून कामगार वर्ग बाजूला फेकला गेला. विविध कम्युनिस्ट पाट्र्यांनी आपली नावेही बदलली. काहींनी आपले नाव बदलले नाही पण श्रमिक वर्गाची हुकुमशाही प्रस्थापित करण्याचेे उद्दिष्ट मात्र त्यांनी सोडून दिले. जे अगोदरच सामाजिक लोकशाहीच्या विचारांशी तडजोड करीत होते ते त्याच मार्गावर आणखी वाहून गेले. उदारीकरण आणि खाजगीकरणाला काहीच पर्याय नाही असेही ते मान्य करू लागले. विविध देशांतील कामगार स्वतःच स्वतःच्या वर्गीय हितांविरुद्ध संघटित झाले आणि समाजवादाच्या पतनाची मागणी करू लागले. मध्यम स्तरातील लोकांनी मोठ्या भांडवलदारांची बाजू घेतली.

आत्तााा 2017 साली मात्र कामगार वर्ग वाढत्या भांडवलदारी शोषणाला सहन करायला तयार नाही असे संकेत स्पष्ट दिसत आहेत. मोठे भांडवलदार आणि त्यांच्या आश्वासनांवरचा मध्यम स्तरातील लोकांचा विश्वासही वेगाने ढासळत आहे. समाजवाद आणि कम्युनिझमबद्दलचे आकर्षण तरुणांमध्ये वाढत आहे. साम्राज्यवादी व्यवस्थेतील सर्वच प्रमुख अंतर्विरोध अधिकाधिक तीव्र होत आहेत. क्रांतीची पिछेहाट संपून क्रांतीची लाट पुन्हा उसळी घेईल अशीच सारी लक्षणे आहेत. 100 वर्षांपूर्वी बोल्शेविकांनी जसे काम केले तसे काम आजचे कम्युनिस्ट करतील का? ह्यावर बरेच काही अवलंबून आहे.

आज आपल्या देशात लाखो कामगार, शेतकरी आणि इतर शोषित लोक अनेक संघर्ष करताना दिसतात. खाजगीकरणाचा कार्यक्रम आणि कामगार कायद्यांमध्ये कामगार विरोधी सुधारणा ह्यांच्या विरोधात वाढत्या संख्येने कामगार रस्त्यावर उतरत आहेत. शेतकऱ्यांचा असंतोष वाढतोय. शेतकऱ्यांसाठी सुरक्षित उपजीविका राज्याने द्यावी अशी मागणी ते आम जनआंदोलनातून सातत्याने करत आहेत. राज्याचा दहशतवाद आणि राज्य व्यवस्थेतील वाढती सांप्रदायिकता संपुष्टात यावी अशी मागणी आम जनता करत आहे. शोषक अल्पसंख्य भांडवलदारांची सत्ता कष्टकरी बहुसंख्येने उखडून टाकण्यासाठी कष्टकरी जनसमुदायाची क्रांतिकारी चेतना आणि संघटना ह्यांचीच उणीव आहे.

क्रांतीच्या विजयासाठी भांडवलदार वर्गाची सत्ता उलथून ती स्वतःच्या हातात घेणे शक्य आहे आणि आवश्यक आहे, अशा क्रांतिकारी जागृतीने कामगारांनी आणि शेतकऱ्यांनी संघर्ष करायला हवा. अशी जागृती निर्माण करणे ही क्रांतीसाठीच्या सगळ्यात महत्त्वाच्या आत्मनिष्ठ (subjective) आवश्यकतांपैकी एक आहे. एक लेनिनवादी प्रकारची क्रांतिकारी कम्युनिस्ट पार्टीच ही भूमिका निभावू शकेल.

साथींनो!

क्रांतीसाठी आत्मनिष्ठ परिस्थिती निर्माण करण्याच्या ह्या उद्देश्यानेच डिसेंबर 1980मध्ये हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीची स्थापना झाली. आपल्या देशातील कम्युनिस्ट आंदोलन वेगवेगळ्या पाट्र्यांमध्ये विभागलेले होते. त्या पाट्र्यांनी सोशल डेमोक्रसी (सामाजिक लोकशाही) बरोबर समझौता केला होता. प्रस्थापित वर्तमान राज्य आणि संसदीय लोकशाही प्रणालीमध्ये त्या पूर्णपणे विलीन झाल्या होत्या. “समाजवादासाठी संसदीय मार्गा” विरुद्ध ज्यांनी बंड केले ते अनेक गटांत विभागले होते. अशा परिस्थितीत आपण एक लेनिनवादी पार्टी निर्माण करण्याचा निर्णय घेतला. एक अशी पार्टी जी हिंदुस्थानातील श्रमजीवी वर्गाचे नेतृत्व करेल. एक अशी पार्टी जिच्यात हिंदुस्थानातील सगळे कम्युनिस्ट सामील होतील.

श्रमजीवी वर्गाची अशी एक एकीकृत नेतृत्व देणारी पार्टी प्रस्थापित करणे, जिच्यात सर्व हिंदुस्थानी कम्युनिस्ट सामिल होऊन लढतील, हे अत्यंत कठीण काम आहे हे आम्हां सगळ्यांनाच माहीत होते. पण ते अशक्य काम नाहीय. 19व्या शतकाच्या उत्तारार्धात रशियात काय परिस्थिती होती ह्याचा विचार करा. तिथले कम्युनिस्टही त्यावेळी अनेक गटांमध्ये व गुटांमध्ये विभागलेले होते. लेनिनच्या नेतृत्वाखाली बोल्शेविकांनी जो बिन-तडजोड आणि सातत्याने अथक संघर्ष केला, त्यामुळे विचार व कामांमध्ये सर्व कम्युनिस्टांची मजबूत एकजूट झाली.

माक्र्सवाद-लेनिनवादाच्या सैद्धांतिक विचारावर आधारित एक क्रांतिकारी पार्टी उभारण्यात आपल्याला महत्तवपूर्ण यश मिळालेय. “संसदीय मार्गाने समाजवाद” ह्या फसव्या भ्रमाविरुद्ध आपण सातत्याने संघर्ष केलाय. त्यासाठी प्रस्थापित राज्य आणि राजकीय प्रक्रिया ही भांडवलदारांच्या हुकुमशाहीसाठीची अस्त्रे आणि यंत्रणा आहेत आणि ब्रिटीश वसाहतवादाचा वारसा आहेत, हे आपण वारंवार उघड केलेय. “शहरांना ग्रामीण भागांनी वेढा घाला” ह्या लाईन विरुद्धही आपण बिनतडजोड संघर्ष केलाय. ती लाईन मानण्याचा अर्थ होतो श्रमजीवी वर्गावर अविश्वास.

आपली पार्टी म्हणजे भांडवलदारी लोकशाहीच्या प्रक्रियेत विलीन झालेली निवडणूक यंत्रणाही नाही आणि श्रमजीवी वर्गापासून दूर झालेली भूमिगत लष्करी यंत्रणाही नाही. लेनिनवादाच्या शिकवणुकीनुसार संघटनात्मक बाबींत आपण कडक गुप्तता पाळतो, पण त्याचवेळी आपले राजकारण मात्र पूर्णपणे उघड आहे आणि आम जनतेपर्यंत ते पोहचते. लोकतांत्रिक केंद्रवादाच्या तत्वांना अमलात आणून आणि पार्टी सभासदत्वाचे लेनिनवादी नियम पाळून, आपण गटबाजीपासून मुक्त असणारी व पोलादी एकजूट असलेली पार्टी उभारली आहे.

मोठ्या उद्योगांमध्ये आणि सेवा क्षेत्रांमध्ये पार्टीच्या मूळ संघटना बनविण्यात आपल्याला प्राथमिक यश मिळू लागलेय. ह्याच दिशेने आपण आपले काम निरंतर वाढविले पाहिजे. भांडवलदारांच्या हल्ल्यांविरुद्ध कामगारांचा एकजुटीचा विरोध संघटीत करून त्याला नेतृत्व द्यायला हवे. कामगार – शेतकऱ्यांची एकजूट आघाडी उभारून हिंदुस्थानाच्या भूमीवर श्रमजीवींची हुकुमशाही प्रस्थापित करण्याच्या

दृष्टीकोनाने हे काम करायला हवे.

 

आपल्या पार्टीला नक्कीच सफलता मिळाली असली तरी कम्युनिस्ट आंदोलन अजूनही विभागलेलेच आहे. वर्गसंघर्ष पुनःपुन्हा शोषकांची सत्ता उलथून टाकण्याच्या उद्दिष्टांपासून दुसरीकडे भरकटतो, ह्याचे हेच मुख्य कारण आहे. हिंदुस्थानातील कम्युनिस्टांची एकता पुनस्र्थापित करण्यासाठी, क्रांती आणि श्रमजीवी वर्गाच्या दृष्टीने हानिकारक अशा सर्व विचारांविरुद्धचा संघर्ष आपण अधिकच तीव्र करायला पाहिजे.

 

कम्युनिस्ट आंदोलनामध्ये सोशल डेमोक्रसी बरोबर समझौता करणारी जी मंडळी आहेत, ती क्रांती म्हणजे एक दूरवरचे स्वप्न आहे अशी मांडणी करतात. भाजपाला एक “धर्मनिरपेक्ष” पर्याय शोधणे हे तात्कालिन उद्दिष्ट असायला हवे, असे ते म्हणतात. वर्गीय समझौता करणारी ही मंडळी, प्रस्थापित राज्य आणि तथाकथित धर्मनिरपेक्ष भांडवलदारी पाट्र्यांबद्दल भ्रम पसरवितात. रशियातील मेंशेविक आणि सोशालिस्ट रेव्होलुशनरी पाट्र्यादेखील रशियातील प्रासंगिक भांडवलदारी सरकाराबद्दल आणि कॉन्स्टीट्युशनल डेमोक्रटीक पार्टीबद्दल असाच भ्रम पसरवीत. अशा सगळ्या भ्रमांचा आपण पर्दाफाश करायला हवा.

कामगार आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण संसदीय लोकशाहीचा वापर करू शकतो, हा खूपच धोकादायक आणि नुकसानकारक भ्रम आहे. भांडवलदार वर्गाची लोकशाही आणि हुकुमशाहीशी असलेले तिचे नाते, ह्याबद्दल भांडवलदार आणि त्यांचे विचारवंत जो गोंधळ पसरवितात, त्यात त्यामुळे आणखीनच भर पडते. ते असे विचार मांडतात की जणू प्रस्थापित लोकशाहीत प्रत्येक वर्गाचे हितरक्षण शक्य आहे व हुकुमशाही ही अशा लोकशाहीच्या अगदी विरुद्ध आहे.

पण सत्य हेच आहे की परस्पर विरोधी वर्गात विभागलेल्या समाजात एका वर्गासाठी लोकशाहीसाठी आवश्यक आहे त्याच्या वर्ग-शत्रूंवर हुकुमशाही. बहुसंख्य शोषितांवर क्रूर हुकुमशाही वापरून हवी तेवढी संपत्ती एकत्रित करण्याचे स्वातंत्र्य भांडवलदारी राज्य सुनिश्चित करते. ह्याउलट अल्पसंख्या असलेल्या शोषकांवर कडक हुकुमशाही वापरून, श्रमजीवींचे राज्य बहुसंख्य असलेल्या कष्टकऱ्यांना शोषणापासून पूर्णपणे मुक्त करेल.

संसदीय लोकशाही म्हणजे भांडवलदारांच्या हुकूमशाहीचेच एक रूप आहे हे सत्य लेनिननी उघड केले. संसदीय लोकशाही म्हणजे भांडवलदारी हुकूमशाहीचे एक पसंतीचेे स्वरूप आहे. एकदा का अशी संसदीय लोकशाही प्रस्थापित झाली की कुठलीही पार्टी सत्तेवर का येईना अथवा कोणीही मंत्री का होईना, भांडवलदारांचीच सत्ता सुरक्षित राहते.

कामगार, शेतकरी आणि सैनिकांच्या मनातून संसदीय लोकशाहीबद्दलचे सर्व भ्रम नष्ट करण्यात बोल्शेविक पार्टी सफल झाली, हे ऑक्टोबर क्रांती सफल होण्याचे कारण होते. श्रमिक वर्गाच्या लोकशाहीचे एक स्वरूप म्हणून सोविएत लोकशाही प्रस्थापित करण्यात बोल्शेविक पार्टीने कामगार वर्गाला नेतृत्व दिले.

आंदोलनातील विचारांच्या आणि कृतींच्या चुकीच्या लाईनचा धिक्कार करणे पुरेसे नाही. ते विचार, ती लाईन का चूक आहेत आणि श्रमिक वर्गाच्या मुक्तीच्या दृष्टीने का घातक आहेत हे आपण समजावायला हवे. हा संघर्ष करताना आपण असा ठाम विश्वास बाळगायला हवा की जे कोणी क्रांती आणि कम्युनिझम (साम्यवाद) च्या बाजूचे असतील ते शेवटी नक्कीच अशा एका कम्युनिस्ट पार्टीत एकजूट होतील जी हिंदुस्थानातील कामगार वर्गाचे नेतृत्व करेल.

कम्युनिस्ट आंदोलनात आजही अशा अनेक व्यक्ती आणि गट आहेत ज्यांच्या मते, दूरवरच्या विविध ठिकाणी स्वतंत्र क्षेत्र निर्माण करून ग्रामीण भागाकडून खेड्यांनी शहरांना घेरायचे, हाच क्रांतीचा मार्ग आहे. चीनमध्ये सशस्त्र शेतकरी क्रांती सफल झाली म्हणजेच हिंदुस्थानातही ती सफल होईल असे त्यांना वाटते. हिंदुस्थानी कम्युनिस्टांच्या एका प्रतिनिधी मंडळाला 1951 मध्येच कॉम्रेड स्टॅलिननी समजाविले होते की आपल्या देशातील परिस्थितीत तो मार्ग का असफल होईल. कॉम्रेड स्टॅलिननी समजाविले होते की चीनच्या कम्युनिस्ट पार्टीने “लाँग मार्च” करून सोविएत संघाच्या लगतच्या क्षेत्रात आपले स्वतंत्र क्षेत्र निर्माण केले होते म्हणून ते सफल झाले. पण हिंदुस्थानच्या सीमेवर असा कुठलाही मित्र समाजवादी देश नाही. त्यांनी शेवटी असाच निष्कर्ष सांगितला की कामगार आणि शेतकऱ्यांच्या एकजुटीचे संघटनच हिंदुस्थानात क्रांती सफल करू शकते.

आज हिंदुस्थानातील कामगार आणि शेतकरी भांडवलदारी हल्ल्यांविरुद्धचा संघर्ष तीव्र करत आहेत. कामगार वर्गाची राजकीय एकजूट आणि शेतकऱ्यांबरोबर युती बांधून मजबूत करण्यासाठी आत्ताची परिस्थिती कम्युनिस्टांसाठी अनुकूल आहे. भांडवलदारी हल्ल्यांविरुद्ध एकजूट संघर्षाची साधने म्हणून औद्योगिक क्षेत्रात आणि शहरांत कामगार एकता समित्या प्रस्थापित झाल्या आहेत. काही ग्रामीण भागांमध्ये कामगार-शेतकरी समित्या स्थापित झाल्यात. अनेक स्थानिक विभागांत लोकांच्या हाती सत्ता प्रस्थापित करावी ह्या उद्देश्याने समित्या बनल्यात. बोल्शेविकांनी ज्याप्रमाणे सोविएतांमध्ये सक्रीय सहभाग घेऊन, भविष्यातील श्रमिक वर्गाच्या राज्यसत्तेची आयुधे असा त्यांचा विकास ज्याप्रमाणे केला, त्याचप्रमाणे आपल्या देशातील कम्युनिस्टांनी संघर्षाच्या ह्या विविध संघटनांत सहभाग घेऊन भविष्यातील श्रमिक वर्गाच्या राज्य सत्तेची आयुधे म्हणून त्यांचा विकास केला पाहिजे.

साथींनो!

गेल्या 100 वर्षांत जगभरात ज्या घडामोडी झाल्या, त्यामुळे माक्र्सवादी-लेनिनवादी विचार हे वैज्ञानिक असल्याचेच सिध्द झालेय. जागतिक क्रांतीची लाट भरती-ओहोटीच्या स्थित्यंतरातून गेली. पण ह्या युगाचा गुणधर्म मात्र लेनिननी मांडले तोच राहिलाय. जागतिक स्तरावर दोन परस्परविरोधी समाजव्यवस्थांच्या मधील टक्कर सुरू आहे. साम्राज्यवादाच्या सर्वोच्च टप्प्यावर पोचलेली भांडवलदारी व्यवस्था, साम्यवादाचा पहिला टप्पा असणाऱ्या समाजवादाच्या जन्माविरुद्ध आणि विकासाविरुद्ध जीवन-मरणाचा संघर्ष करीत आहे.

ऑक्टोबर क्रांतीपूर्वी, श्रमिक वर्ग त्याची सत्ता उलथून टाकून स्वतःची सत्ता प्रस्थापित करू शकेल, अशी कल्पनाही साम्राज्यवादी भांडवलदार वर्गाने केली नव्हती. पण ऑक्टोबर क्रांतीच्या विजयानंतर मात्र समाजवाद जिथे प्रस्थापित झाला होता, तिथून त्याचे उच्चाटन करण्यासाठी आणि इतरत्र समाजवादाचा जन्मच होऊ नये ह्यासाठी त्याने अनेक कपट-कारस्थाने लढवली.

जेव्हा सोविएत युनियनचे विघटन झाले तेव्हा जगाने एका नवीन कालखंडात प्रवेश केला आहे, क्रांतीच्या लाटेच्या ओहोटीचा हा कालखंड आहे, हे आपल्या पार्टीने ओळखले. हा असा कालखंड आहे जेव्हा श्रमिक वर्गाविरुद्ध आणि समाजवादाविरुद्ध वारे वाहत आहे. आज साम्राज्यवादी व्यवस्थेतील सर्वच मुख्य अंतर्विरोध अधिकच तीव्र झाले आहेत. क्रांतीच्या लाटेची भरतीची वेळ जवळ येत आहे ह्याचीच ही चिन्हे आहेत. जगभरात अंतर्विरोध तीव्र होत असताना, आपण हिंदुस्थानातील लोकांसाठी अंतर्गत आणि बाहेरील शक्तींचा धोका अधिकच वाढला आहे. क्रांतीसाठी आत्मनिष्ठ परिस्थिती लवकरात लवकर तयार करायचे आव्हान आपल्यापुढे आहे.

चला तर साथींनो, आपल्या पार्टीला आणखीन मजबूत करूया! राजकीय दृष्ट्या एकजूट कामगार वर्गाच्या नेतृत्वस्थानी हिंदुस्थानच्या कम्युनिस्टांची एकजूट पुनस्र्थापित करूया!

आपल्या देशात श्रमिक वर्गाची क्रांती विजयी करण्यासाठी आवश्यक आत्मगत परिस्थिती निर्माण करून महान ऑक्टोबर क्रांतीला सलाम करूया!!

इंकलाब जिंदाबाद !

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published.