हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, 9 ऑक्टोबर 2024
इस्रायलने 7 ऑक्टोबर 2023 पासून पॅलेस्टिनी लोकांविरुद्ध सुरू केलेल्या नरसंहाराच्या युद्धाने मानवतेच्या विवेकाला जबरदस्त धक्का बसला आहे.
या नरसंहाराच्या गुन्हेगारीचे प्रमाण शब्दात वर्णन करता येत नाही. गाझामधील 90% पेक्षा जास्त इमारती नष्ट झाल्या आहेत. रुग्णालये, शाळा आणि धार्मिक प्रार्थनास्थळांना विशेष लक्ष्य करण्यात आले आहे. हजारो लोकांची हत्या करण्यात आली आहे, ज्यापैकी बहुसंख्य महिला आणि मुले आहेत. आणखी हजारो बेपत्ता आहेत, ज्यांचे मृतदेह नष्ट झालेल्या इमारतींच्या ढिगाऱ्याखाली पडले आहेत. लाखोंना गंभीर दुखापत झाली आहे. मुले उपासमारीने आणि ज्या आजारांचा प्रतिबंध करणे शक्य आहे त्या आजारांनी मृत्युमुखी पडत आहेत. इस्रायली सैन्याने गाझाच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यास भाग पाडल्यामुळे गाझातील 22 लाख लोक कायमचे निर्वासित झाले आहेत. त्यांच्यासाठी कोणतीही जागा सुरक्षित नाही, कारण इस्रायली सशस्त्र सेना त्यांना कोठेही आणि सर्वत्र स्वैरपणे मारत आहे. इस्रायलचे तुरुंग वेस्ट बँक, पूर्व जेरुसलेम आणि गाझा या इस्रायल व्याप्त प्रदेशातील पॅलेस्टिनी तरुणांनी भरलेले आहेत.
पॅलेस्टिनी लोकांवरील क्रूर दडपशाहीचे, “स्वसंरक्षणाच्या अधिकाराच्या” नावाखाली इस्रायल समर्थन करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्या मातृभूमीच्या कब्जाविरुद्ध पॅलेस्टिनी लोकांच्या न्याय्य प्रतिकार संघर्षाला, इस्त्रायलच्या सार्वभौमत्वावर हल्ला असे दाखवले जात आहे. इस्रायल व्याप्त प्रदेशातील पॅलेस्टिनी लोकांना त्या कब्जाचा प्रतिकार करण्याचा आणि त्यांच्या मुक्तीसाठी लढण्याचा अधिकार आहे. इस्रायल, एक कब्जा करणारी शक्ती आहे व म्हणून, गाझा, वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेमवरील त्याच्या सततच्या कब्जाचे समर्थन करण्यासाठी “स्वसंरक्षणाचा अधिकार” ते वापरू शकत नाही. देशादेशांमधील संबंध नियंत्रित करणारा आंतरराष्ट्रीय कायदा केवळ तेव्हाच स्वसंरक्षणाचा अधिकार मान्य करतो, जेव्हा एखादा देश स्वतःच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करत असतो – इतर लोकांच्या मातृभूमीच्या ताब्याचे रक्षण करण्यासाठी आणि ताबा कायम ठेवण्यासाठी नव्हे.
इस्रायलने आता आपल्या नरसंहाराच्या युद्धाचा रंगमंच लेबनॉनपर्यंत वाढवला आहे. प्रथम पेजर आणि वॉकीटॉकी मध्ये पेरलेल्या बॉम्बचा वापर करून दहशतवादी हल्ला केला, परिणामी अनेक लोक मृत्यूमुखी पडले आणि हजारो लोक गंभीर जखमी झाले. यानंतर राजधानी बैरुत आणि लेबनॉनच्या इतर शहरांमध्ये मोठे बॉम्बस्फोट केले गेले ज्यामुळे दोन हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत. इस्रायलने आता लेबनॉनवर भूमी आक्रमण सुरू केले आहे. लेबनॉन सरकारच्या म्हणण्यानुसार, 12 लाखांहून अधिक लोकांना त्यांच्याच देशात निर्वासित होण्यास भाग पाडले गेले आहे.
आपल्या सार्वभौमत्वाच्या रक्षणाच्या नावाखाली इस्रायलने इराण, इराक, सीरिया आणि येमेनवर दहशतवादी हल्ले सुरू केले आहेत. युद्धाच्या ज्वाळांनी पश्चिम आशियातील सर्व देशांना वेढण्याची दाट शक्यता आहे.
पश्चिम आशियातील देश आणि लोकांसमोरील गंभीर परिस्थिती हा अमेरिकेने इस्रायल सरकारला दिलेल्या राजकीय, आर्थिक आणि लष्करी मदतीचा थेट परिणाम आहे. पॅलेस्टिनी लोकांचा नरसंहार करण्यासाठी आणि इतर देशांच्या सार्वभौमत्वावर हल्ला करण्यासाठी अमेरिकी सरकारने इस्रायलला बिनशर्त पाठिंबा दिला आहे.
अमेरिकी साम्राज्यवादाचा पाठिंबा असलेल्या इस्रायलच्या आक्रमक कृतींचा गाझा, वेस्ट बँक तसेच लेबनॉन आणि इतर शेजारील देशांमध्ये असंख्य संघटनांकडून प्रतिकार केला जात आहे. स्वतःच्या सार्वभौमत्वाच्या रक्षणार्थ इस्त्रायल विरुद्ध लढणाऱ्यांना, साम्राज्यवादी प्रचारमाध्यमे दहशतवादी म्हणून रंगवत आहेत, तर इस्त्रायली राज्याच्या दहशतवादाला कायदेशीर स्वसंरक्षण म्हणून समर्थन देतत आहे. सत्य पूर्णपणे उलटे दाखवले जात आहे.
गेल्या वर्षभरापासून, पॅलेस्टिनींचा नरसंहार थांबवण्याच्या मागणीसाठी सर्व देशांतील न्यायप्रेमी लोक रस्त्यावर उतरले आहेत. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी आणि जगभरातील असंख्य देशांमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर निदर्शने झाली आहेत. सर्व देशांच्या लोकांनी अशी मागणी केली आहे की अमेरिका आणि इतर सरकारांनी इस्त्रायली राज्याला वित्तपुरवठा आणि शस्त्रपुरवठा त्वरित थांबवावा.
युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने सदस्य राष्ट्रांच्या प्रचंड बहुमताने एक ठराव संमत केला आहे, ज्यामध्ये इस्रायलने पॅलेस्टिनी लोकांविरुद्धचे युद्ध थांबवावे, इस्रायल व्याप्त पॅलेस्टिनी प्रदेशातून आपले सैन्य इस्रायलने मागे घ्यावे आणि पॅलेस्टिनी लोकांना त्यांचे स्वतःचे राज्य आहे याची सुनिस्चीती करावी असे नमूद केले आहे. तथापि, इस्रायलने जगभरातील लोकांचा आणि देशांचा आवाज ऐकण्यास नकार दिलाय, कारण त्याला अमेरिकी साम्राज्यवाद आणि त्याच्या मित्र राष्ट्रांचा भक्कम पाठिंबा आहे. जगभरातील विरोधाला धुडकावून देत, इस्रायलने संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेझ यांना इस्रायलमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही, असेदेखील जाहीर केले आहे!
नरसंहार थांबवण्याची आणि इस्रायलला शस्त्रास्त्रांची विक्री थांबवण्याची मागणी करणाऱ्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या ठरावावर हिंदुस्थानने मतदान करणे टाळले आहे. हिंदुस्थानी राज्य इस्रायलला शस्त्रास्त्रांच्या निर्यातीला परवानगी देत आहे. या कृतीमुळे पॅलेस्टिनी लोकांचा हिंदुस्थानी शासक वर्गाने केलेला लज्जास्पद विश्वासघात दिसून येतो. पॅलेस्टिनी राष्ट्राच्या स्वयंनिर्णयाच्या हक्काचे समर्थन करणाऱ्या हिंदुस्थानी जनतेचादेखील हा विश्वासघात आहे.
या प्रदेशावर स्वतःचे पूर्ण वर्चस्व सुनिश्चित करण्यासाठी अमेरिकी साम्राज्यवाद अनेक दशकांपासून इस्रायलचा पश्चिम आशियात बंदुकीसारखा वापर करत आहे, जिचा निशाणा पॅलेस्टिनी आणि इतर अरब लोक आहेत. तेल आणि नैसर्गिक वायूने समृद्ध असलेला हा प्रदेश आहे. त्याच्या संभाव्य प्रतिस्पर्ध्यांना या संसाधनांचा वापर करता येऊ नये, म्हणून अमेरिकी साम्राज्यवादाला या मौल्यवान संसाधनांवर नियंत्रण हवे आहे. इस्त्रायलला लष्करी, आर्थिक आणि राजकीय पाठबळ देणे, हा संपूर्ण जगावर स्वतःचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या अमेरिकी साम्राज्यवादाच्या रणनीतीचा अविभाज्य भाग आहे.
अमेरिकेला पश्चिम आशियातील सर्व देशांना गुडघ्यावर आणून त्यांच्या कडून शरणागती हवी आहे. विशेषत: ते इराणला लक्ष्य करत आहे कारण इराणने अमेरिकेसमोर नमतं घेण्यास नकार दिला आहे आणि ते स्वतःच स्वतःचा आर्थिक आणि राजकीय मार्ग अवलंबत आहे. इराण आणि त्या प्रदेशातील इतर साम्राज्यवादविरोधी शक्तींवर हल्ला करण्यासाठी अमेरिका इस्रायलचा वापर करू इच्छिते.
गेल्या वर्षभरातील घडामोडींमुळे संपूर्ण जगासमोर अमेरिकेचा खरा चेहरा उघड झाला आहे. पश्चिम आशियातील समस्येवर शांतीपूर्ण उपाययोजना रोखणारी अमेरिका ही मुख्य शक्ती आहे हे अधिकाधिक स्पष्ट होत आहे. इस्त्रायलला शस्त्रास्त्र विक्री बंद करण्याची आणि पॅलेस्टिनी लोकांचा नरसंहार तात्काळ थांबवण्याची मागणी करत फ्रान्स आणि जपानसारख्या अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांकडूनही आवाज उठवला जात आहे.
अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाने इस्रायलला शस्त्रपुरवठा त्वरित बंद करण्याची जगभरातील जनतेची मागणी पूर्णपणे न्याय्य आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेने त्यांचे दहशतवादी हल्ले आणि इतर देशांवरील लष्करी आक्रमणे थांबवावीत, अशी मागणीही तितकीच न्याय्य आहे.
इस्लामी दहशतवाद हा मानवजातीचा प्रमुख शत्रू आहे, असे असत्य अमेरिकी साम्राज्यवादाने जगभर पसरवले आहे. खरे तर आज मानवजातीचा सर्वात धोकादायक शत्रू अमेरिकी साम्राज्यवादच आहे. जागतिक वर्चस्वासाठी त्याची आक्रमक मोहीम जागतिक शांतीला सर्वाधिक धोका निर्माण करत आहे.
पॅलेस्टिनी लोकांचा त्यांच्या राष्ट्रीय हक्कांसाठीचा संघर्ष सर्व पुरोगामी मानवतेच्या पाठिंब्यास पात्र आहे.