प्राध्यापक जी.एन. साईबाबांचे वयाच्या 57 व्या वर्षी 12 ऑक्टोबर रोजी हैद्राबाद येथील NIMS रुग्णालयात अकाली निधन झाले.
प्रोफेसर साईबाबांनी आपले संपूर्ण सक्रिय जीवन, सर्व प्रकारच्या शोषण आणि अत्याचारापासून मानवतेच्या मुक्तीसाठी समर्पित केले होते. आपल्या देशातील लोकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध ते उत्कटतेने, धैर्याने लढले. त्यांच्या या धाडसी भूमिकेमुळे त्यांना राज्याकडून सातत्याने लक्ष्य करण्यात आले.
प्रोफेसर साईबाबा यांना 2014 मध्ये बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायदा (UAPA) अंतर्गत अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर CPI (माओवादी) शी संबंधित असल्याचा आणि दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता. न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. नागपूर जेलमध्ये त्यांनी सुमारे दहा वर्षे अत्यंत भीषण परिस्थितीत काढली. जेलमध्ये त्यांना एकांतवासात ठेवण्यात आले होते. त्यांना त्यांच्या प्रिय आईच्या मृत्यूपूर्वी तिला भेटण्यासाठी किंवा तिच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठीदेखील पॅरोल देण्यात आला नाही. शेवटी 7 मार्च 2024 रोजी मुंबई हायकोर्टाने त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून त्त्यांची सुटका केली. हा निर्णय भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला.
हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी प्रोफेसर साईबाबांच्या तुरुंगवासाचा आणि दीर्घ कारावासाचा निषेध करते. हे कृत्य उघडपणे अन्यायकारक आहे आणि मानवी हक्कांचे घोर उल्लंघन आहे.
प्रोफेसर साईबाबा वयाच्या पाचव्या वर्षापासून पोलिओमुळे कमरेच्या खाली अपंग झाले होते. ते फक्त व्हील चेअरच्या आणि सहाय्यकाच्या मदतीने फिरू शकत होते. अशा व्यक्तीला केवळ त्यांनी मांडलेल्या कल्पनांमुळे ‘खतरनाक गुन्हेगार’ म्हणून घोषित करणे हे विवेकाच्या अधिकाराचे उघड उल्लंघन होते. तुरुंगात असताना त्यांना जाणीवपूर्वक आणि क्रूरपणे वैद्यकीय उपचार नाकारण्यात आले, परिणामी ते अनेक रोगांना बळी पडले.
विवेकाच्या अधिकाराच्या आणि इतर मानवी हक्कांच्या रक्षणासाठी लढणाऱ्या सर्व भारतीयांना, प्रोफेसर साईबाबांचा तुरुंगातला दीर्घ कारावास हा सत्तेत असलेल्यांचा संदेश होता आणि एक प्रकारे धमकी होती, की त्यांनी हा संघर्ष सोडावा अन्यथा साईबाबांच्या नशिबी जे आले त्याला सामोरे जावे लागेल. सध्या, मानवाधिकारांच्या रक्षणार्थ संघर्ष करणारे शेकडो लढवय्ये UAPA अंतर्गत तुरुंगात त्रस्त आहेत;त्यांच्यावर राज्याविरुद्ध युद्ध छेडण्याचा आरोप आहे.
हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीचा असा विश्वास आहे की हिंदुस्थानी राज्याने,आपल्या हक्कांच्या रक्षणासाठी उठवलेला आपल्या लोकांचा आवाज दाबण्याचा कितीही प्रयत्न केले तरी ते कधीही यशस्वी होणार नाहीत. आपल्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी आपल्या लोकांचा लढा सुरूच राहील!