कार्ल मार्क्स, एक महान क्रांतिकारी विचारवंत आणि कामगार वर्गाचे पुरस्कर्ते, यांचा जन्म 5 मे 1818 रोजी झाला. भांडवलशाहीचे उच्चाटन करण्यासाठी आणि कामगार वर्गाची आणि सर्व समाजाची सर्व प्रकारच्या शोषणापासून मुक्ती करण्यासाठी योगदान देणे हे त्यांचे जीवन ध्येय होते.
मार्क्स हे सर्वप्रथम एक क्रांतिकारक होते. समाजाच्या क्रांतिकारी परिवर्तनाची गरज ओळखून ते प्रेरित झाले. त्यांच्याच शब्दात, “तत्त्वज्ञांनी जगाला केवळ समजून घेण्याचे विविध प्रयत्न केले आहेत. पण मुद्दा मात्र जग बदलण्याचा आहे.”
मार्क्सने आपले कार्य अशा वेळी केले जेव्हा 19व्या शतकात औद्योगिक भांडवलदार वर्गाच्या वाढी बरोबरच श्रमजीवी वर्गाची म्हणजेच सर्वहारा वर्गाची वाढ देखील होत होती. उत्पादनाचे कोणतेही साधन मालकीचे नसलेल्या आणि आपल्या स्वत: च्या श्रमशक्तीशिवाय विकण्यासाठी इतर काहीही नसलेल्या व्यक्तींचा श्रमजीवीवर्गात समावेश होतो. तो असा काळ होता जेव्हा अनेक देशांमध्ये कामगार वर्गाच्या संघटना उदयास येत होत्या. कम्युनिस्ट लीग ही श्रमजीवीवर्गाची आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून स्थापन झाली.
मार्क्स आणि त्यांचे सहकारी फ्रेडरिक एंगेल्स यांचे सैद्धांतिक कार्य, श्रमजीवी वर्गाच्या संघर्षाच्या बरोबरीनेच विकसित झाले. मार्क्स आणि एंगेल्स यांनी कम्युनिस्ट लीगच्या नियमांचा मसुदा तयार केला, जो डिसेंबर 1847 मध्ये लीगच्या दुसऱ्या महाअधिवेशनात स्विकारण्यात आला.
त्यांनी दोघांनीमिळून 1848 मध्ये कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला. कम्युनिस्ट जाहीरनाम्यात कम्युनिस्टांचे कार्य विषद करण्यात आले – कामगार वर्गाला शासक वर्ग बनण्यासाठी उत्पादन साधनांच्या खाजगी मालकीचे सामाजिक मालकीमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेली चेतना आणि संघटना प्रदान करणे हेच ते कार्य होय. भांडवलदार वर्गाचे पतन आणि श्रमजीवीवर्गाचा विजय अपरिहार्य आहे, असा शक्तिशाली निष्कर्ष जाहीरनाम्याने मांडला. जाहिरनाम्याच्या शेवटी अशी घोषणा होती:
“कम्युनिस्ट क्रांतीने सत्ताधारी वर्गांना हादरू द्या. श्रमजीवी लोकांकडे त्यांच्या साखळदंडाशिवाय गमावण्यासारखे दुसरे काहीच नाही. त्यांना जिंकण्यासाठी मात्र जग आहे. सर्व देशांतील कष्टकरी लोकांनो, एक व्हा!”
कम्युनिस्ट जाहिरनामा हा त्या काळापासून आजपर्यंत जगातील सर्वात प्रभावशाली राजकीय दस्तावेज ठरला आहे.
मार्क्स हे फर्स्ट इंटरनॅशनल वर्किंगमेन असोसिएशनमधील एक प्रमुख व्यक्तिमत्व होते. जागतिक श्रमजीवी वर्गाच्या क्रांतिकारी भूमिकेबद्दलच्या त्यांच्या तीव्र विश्वासानुसार त्यांनी कार्य केले. मार्क्सवाद म्हणजे मार्क्सने स्पष्ट केलेला सिद्धांत; त्याचा उदय झाला वर्गसंघर्षामधून, शोषण आणि वर्ग विभाजनापासून स्वतःची आणि सर्व समाजाची मुक्तता करण्यासाठी, भांडवलदार वर्गाची सत्ता उलथून टाकण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी श्रमजीवीवर्गाचे वैचारिक शस्त्र म्हणून. ती काही फक्त एक कल्पना नाही जिने एखाद्या व्यक्तीच्या मेंदूत जादूने आकार घेतला.
कॉम्रेड लेनिनच्या शब्दांत, “जर्मन तत्त्वज्ञान, इंग्रजी राजनैतिक अर्थव्यवस्था आणि फ्रेंच समाजवाद, या एकोणिसाव्या शतकात माणसाने निर्माण केलेल्या सर्वोत्तम गोष्टींचा मार्क्सवाद हा निर्विवाद उत्तराधिकारी आहे.”
तत्वज्ञान
फ्रान्समध्ये १८व्या शतकाच्या शेवटी झालेल्या भांडवलदार वर्गाच्या लोकशाही क्रांतीने सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा आणि मध्ययुगीन विचारांविरुद्ध बंड करून भौतिकवादाच्या तत्त्वज्ञानाला जन्म दिला. आदर्शवादाच्या अनुसार हे भौतिक जग एका भव्य कल्पनेचे, एका अलौकिक शक्तीची व्युत्पत्ती आहे. मार्क्स आणि एंगेल्स यांनी अशा सर्व प्रकारच्या आदर्शवादाच्या विरोधात, भौतिकवादी तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला आणि ते तत्त्वज्ञान पूर्णपणे विकसित केले. त्यांनी द्वंद्वात्मक भौतिकवादाच्या तात्विक दृष्टीकोनाला आणि पद्धतीला जन्म दिला.
द्वंद्ववाद असे मानते की अंतर्गत विरोधाभास सर्व गोष्टी आणि घटनांमध्ये अंतर्भूत असतात. त्या सर्वांच्या नकारात्मक आणि सकारात्मक बाजू आहेत, भूतकाळ आणि भविष्य आहे, काहीतरी लोप पावत आहे आणि काहीतरी अस्तित्वात येत आहे. जुने आणि नवे, जे मरत आहे आणि जे जन्माला येत आहे, जे नाहीसे होत आहे आणि जे विकसित होत आहे, या विरोधाभासांमधील संघर्ष हा विकासाच्या प्रक्रियेची आंतरिक सामग्री असते. निसर्ग आणि समाज समजून घेण्याची द्वंद्वात्मक पद्धत म्हणजे प्रत्येक गोष्ट सतत गतिमान स्थितीत असते हे ओळखणे; या स्थितीचा चालक म्हणजे विरोधी शक्तींमधील द्वंद्व. छोटे परिमाणात्मक बदल घडत राहतात आणि त्याच्या परिणामी गुणात्मक झेप घेतली जाते आणि विकास होतो.
मार्क्स आणि एंगेल्स यांनी द्वंद्वात्मक भौतिकवादाची तत्त्वे मानवी समाजाच्या इतिहासाला लागू केली आणि वर्गीय समाजाच्या गतीचे सामान्य नियम स्पष्ट केले. आदिम वर्गविहीन अवस्थेपासून वर्ग समाजाच्या विविध स्वरूप आणि अवस्थांमधून भांडवलशाहीच्या सध्याच्या टप्प्यापर्यंत, क्रांतींद्वारे समाजाच्या उत्क्रांतीचे ऐतिहासिक भौतिकवादी विश्लेषण, कम्युनिस्ट घोषणापत्रात सादर केले गेले. या विश्लेषणाच्या आधारे, घोषणापत्राने असा निष्कर्ष काढला आहे की भांडवलशाही ही देखील एक अस्थायी व्यवस्था आहे, जिचे अस्तित्व संपणे अटळ आहे आणि तिच्या जागेवर कम्युनिझमची श्रेष्ठ व्यवस्था प्रस्थापित होणार हे अटळ आहे. कम्युनिझमचा प्रारंभिक टप्पा समाजवाद आहे.
राजनैतिक अर्थव्यवस्था
मार्क्सच्या आधीच्या वैज्ञानिक विचारवंतांनी, भांडवलशाही अर्थव्यवस्थेत वस्तूंच्या देवाणघेवाणीवर नियंत्रण ठेवणाऱ्या मूल्याचा नियम शोधून काढला होता. त्यांनी शोधून काढले होते की, एखाद्या वस्तूचे मूल्य त्यामध्ये असलेल्या मानवी श्रमाच्या प्रमाणात ठरते. तथापि, ते विचारवंत भांडवलदारांच्या नफ्याचे स्रोत शोधू शकले नाहीत. बाजारामध्ये, सर्वसाधारणपणे,समान मूल्याच्या वस्तूंची देवाणघेवाण जर होत असेल, तर एका वर्गाला नफा खिशात घालणे आणि त्यांची खाजगी संपत्ती वाढवणे हे कसे शक्य होते? कार्ल मार्क्सने आपला वरकड मूल्याचा सिद्धांत मांडल्यापर्यंत या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर कोणीही देऊ शकले नाही.
भांडवलदारांच्या नफ्याचा स्रोत हे मजुरीवर काम करणाऱ्यांचे शोषण आहे, हे मार्क्सने ओळखले. नफा, व्याज आणि भाड्याच्या स्वरुपात मिळणारे उत्पन्न, हे दुसरे तिसरे काही नसून, भांडवलदार मालक ज्या कामगारांना नोकरी देतात त्यांच्याकडून वसूल केलेल्या वरकड किंवा अतिरिक्त मूल्याचे भाग असतात. मजुरी करणारा कामगार दररोज कामाच्या पहिल्या काही तासांत स्वतःच्या मजुरीचे उत्पादनकरत असतो; आणि उरलेल्या तासांत तो भांडवलदार मालकांसाठी अतिरिक्त मूल्य निर्माण करत असतो.
19व्या शतकातील युरोपमध्ये, भांडवलशाही, आर्थिक भरभराट आणि आर्थिक दिवाळे यांच्या पुनरावृत्तीच्या चक्रातून गेली. त्याच्या परिणामी दर दशकात एकदा तरी अतीउत्पादनाचे संकट आले. उत्पादन व्यवस्था वारंवार संकटात का पडते हे राजकीय अर्थव्यवस्थेच्या अभ्यासकांना स्पष्ट करता आले नाही. मार्क्सने ओळखले की अशा पुनरावृत्तीच्या संकटांचे स्त्रोत हे भांडवलशाहीच्या मूलभूत विरोधाभासात, उत्पादनाचे सामाजिक स्वरूप आणि उत्पादन साधनांच्या मालकीचे खाजगी स्वरूप, यांच्यातील विरोधाभासात आहे. जास्तीत जास्त नफा मिळविण्याच्या त्यांच्या आपापसातील स्पर्धेत, वर्ग, कामगार वर्गाची आणि इतर शोषित घटकांची क्रयशक्ती, भांडवलदार पूर्णपणे पिळून घेतात, ज्यामुळे विक्रेय वस्तूंची बाजारात मागणी कमी होते. सर्व भांडवलशाही समाजात “अति–उत्पादनाचे“ वारंवार संकट येण्याचे हेच कारण आहे, म्हणजेच लोकांच्या हातात क्रयशक्ती नसल्यामुळे उत्पादनाची वाढ खंडित होते.
मार्क्सच्या शोधांमुळे असा निष्कर्ष निघाला की समाजाला वर्ग विभाजनाशिवाय आणि वारंवार येणाऱ्या संकटांशिवाय, त्याच्या पुढच्या उच्च टप्प्यावर जाण्यासाठी, भांडवलशाहीचा मूलभूत विरोधाभास सोडवणे आवश्यक आहे. याचा अर्थ, सामाजिक उत्पादन साधने जी खाजगी संपत्ती आहेत, त्यांचे सामाजिक संपत्तीत रूपांतर करणे. तसे केल्यानेच भांडवलशाहीच्या लालसेची पूर्तता करण्याऐवजी समाजाच्या गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने उत्पादनाचे नियोजन करणे शक्य होईल.
वैज्ञानिक समाजवाद
युरोपमधील भांडवलदार वर्गाच्या लोकशाही क्रांतींनी जुनी सरंजामशाही व्यवस्था उखडून टाकली होती, परंतु भांडवलशाहीच्या नव्या समाजव्यवस्थेत बहुसंख्य कष्टकरी लोक शोषित आणि पीडित राहिले. कष्टकरी लोकांच्या अपूर्ण आकांक्षांनी समाजवादाची संकल्पना आणि दृष्टी निर्माण केली, की ही समाजाची एक भांडवलशाहीपेक्षा वरच्या दर्जाची अशी श्रेष्ठ व्यवस्था असेल जी भांडवलशाहीच्या समस्यांपासून मुक्त असेल. तथापि, समाजवादाच्या सुरुवातीच्या कल्पना आदर्शवादी होत्या. आदर्शवादी समाजवाद्यांनी भांडवलशाही समाजावर टीका केली परंतु ते हे सूचित करू शकले नाहीत की कोणती सामाजिक शक्ती नवीन समाजाची निर्मिती करण्यास सक्षम आहे.
मार्क्सवादाने समाजवादाला वैज्ञानिक पाया दिला. श्रमजीवी वर्ग, ज्याच्याकडे काम करण्याच्या शक्तीशिवाय कोणत्याही मालमत्तेची मालकी नाही, हा असा एकच वर्ग आहे हे त्याने ओळखले, ज्याला भांडवलशाहीपासून कम्युनिझमकडे क्रांतिकारी परिवर्तन पूर्ण करण्यामध्ये स्वारस्य आहे आणि क्षमतादेखील आहे.
मार्क्सच्या आधीच्या विद्वानांनी हे शोधून काढले होते की समाजाचा विकास एका टप्प्यातून दुसऱ्या टप्प्यात परस्परविरोधी हितसंबंध असलेल्या वर्गांमधील संघर्षातून झाला आहे. मार्क्सने हा सिद्धांत त्याच्या तार्किक निष्कर्षापर्यंत विकसित केला – म्हणजे, वर्ग संघर्ष अपरिहार्यपणे श्रमजीवी वर्गाच्या हुकूमशाहीकडे नेतो, जी वर्ग विभाजनाच्या समाप्तीची आणि वर्गहीन कम्युनिस्ट समाजाच्या उदयाची पूर्वसंध्या असेल.
निष्कर्ष
गेल्या 175 वर्षांहून अधिक काळात जगात घडलेल्या सर्व घडामोडी मार्क्सवादाच्या वैज्ञानिक वैधतेची पुष्टी करतात. आज आपण प्रत्येक भांडवलशाही देशाच्या अर्थव्यवस्थेत जे तीव्र विरोधाभास पाहतो, त्यावरून स्पष्टपणे दिसून येते की ती एक ढासळत असलेली व्यवस्था आहे. वाढती गरिबी, बेरोजगारी या समस्या सोडविण्यास ती असमर्थ आहे तसेच एका ध्रुवावर अतिश्रीमंत अल्पसंख्याक आणि दुसऱ्या ध्रुवावर शोषित बहुसंख्य यांच्यातील वाढती दरी यावर उपाय देण्यासहीती असमर्थ आहे.
कार्ल मार्क्सने ज्याचा पुरस्कार केला तोच उपाय उरतो – म्हणजे, भांडवलशाहीची कबर खोदून समाजवादाचा आणि वर्गहीन कम्युनिस्ट समाजाचा मार्ग खुला करणारी श्रमजीवी वर्गाची क्रांती.