हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, ५ नोव्हेंबर २०२३
७ नोव्हेंबर १९१७ रोजी (त्या वेळच्या रशियन कॅलेंडरप्रमाणे २५ ऑक्टोबर रोजी), लेनिनच्या नेतृत्वाखालील बोल्शेविक पक्षाच्या नेतृत्वाखाली, कामगार, शेतकरी आणि सैनिकांनी रशियामधील भांडवलशाहीची सत्ता उलथून टाकली. कामगार वर्गाची इतर सर्व कष्टकरी लोकांसोबत युतीची सत्ता क्रांतीने स्थापन केली.
महान ऑक्टोबर क्रांती अशा वेळी घडली जेव्हा साम्राज्यवादी शक्तींनी मानवी समाजाला पहिल्या जागतिक महायुद्धात ओढले होते. त्या युद्धाचा अंत करण्यात क्रांतीने निर्णायक भूमिका बजावली.
त्या जागतिक महायुद्धात ब्रिटेन, फ्रान्स, रशिया, इटली आणि जपानची युती एका बाजूला तर जर्मनी, ऑस्ट्रिया-हंगेरी आणि तुर्कस्तानची युती विरुद्ध बाजूला होती. अमेरिका पहिल्या युतीमध्ये सामील झाले. या प्रतिस्पर्धी साम्राज्यवादी शक्ती जगाच्या पुनर्विभाजनासाठी एकमेकांविरुद्ध युद्धात उभ्या ठाकल्या होत्या. भांडवलदार वर्गाची साम्राज्यवादी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठीच्या त्या युद्धात लाखो कामगार आणि शेतकरी एकमेकांना मारत होते. त्यात हिंदुस्थानासारख्या वसाहतीतील कामगार आणि शेतकरीही होते.
प्रत्येक साम्राज्यवादी राज्यातील सत्ताधारी भांडवलदार वर्गाने पितृभूमीच्या रक्षणाच्या नावाखाली आपापल्या देशातील कष्टकरी जनतेला युद्धासाठी संघटित केले होते. लेनिनच्या नेतृत्वाखालील बोल्शेविक पक्षाने युद्ध सुरू होण्यापूर्वीच साम्राज्यवाद्यांचे खरे उद्दिष्ट उघड केले. प्रत्येक भांडवलशाही देशातील कामगारांनी, शेतकऱ्यांनी आणि सैनिकांनी आपापल्या देशातील भांडवलदारी शोषकांवरच उलट बंदुका फिरवण्याचे आवाहन त्यांनी केले.
क्रांतीच्या विजयानंतर, रशियाला साम्राज्यवाद्यांच्या आपापसातील युद्धातून बाहेर काढणे, हे सोव्हिएत राज्याने उचललेल्या पहिल्या पाऊलांपैकी एक होते. युद्धानंतर जगाची आपापसात वाटणी करण्यासाठी साम्राज्यवादी शक्तींनी केलेले छुपे करार सोव्हिएत राज्याने जाहीरपणे उघड केले.
कामगार आणि शेतकऱ्यांच्या राजवटीची राजकीय व्यवस्था आघाडीच्या भांडवलशाही देशांमध्ये अस्तित्त्वात असलेल्या व्यवस्थेच्या अगदी विरुद्ध होती. त्या देशांमध्ये फक्त श्रीमंत अल्पसंख्येच्या हातात निर्णय घेण्याची शक्ती होती. ऑक्टोबर क्रांतीनंतर रशियामध्ये ‘सोव्हिएत्स’ नावाच्या त्यांच्या जनसंघटनांद्वारे कामगार, शेतकरी आणि सैनिकांनी निर्णय घेण्याच्या अधिकाराचा वापर केला. प्रत्येक सोव्हिएतच्या सदस्यांना निवडून येण्याचा आणि निवडून देण्याचा अधिकार होता. तसेच निवडून दिलेल्या प्रतिनिधीला कधीही परत बोलावण्याचा अधिकारही त्यांना होता. क्रांतिद्वारे सत्ता ताब्यात घेतल्यानंतर समाजाला सामंतवादाच्या अवशेषांपासून मुक्त करणे हे एक पहिले पाऊल होते. सोव्हिएत राज्याने जमीनदारांची शेकडो कोटी एकर शेतीयोग्य जमीन त्यांच्याकडून हिरावून घेतली आणि ती जमीन शेतकरी समित्यांकडे सोपविली. अशा प्रकारे शेतकऱ्यांना वेठबिगारीपासून मुक्त करण्यात आले.
सर्व प्रकारच्या भेदभाव आणि दडपशाहीपासून महिलांच्या मुक्तीकडे सोव्हिएत राज्याने प्रथम लक्ष दिले. महिलांना उत्पादक कामात आणि समाजाच्या सर्व घडामोडींमध्ये सहभागी होण्यासाठी दूरगामी उपाययोजना करण्यात आल्या.
राष्ट्रीय दडपशाहीचे उच्चाटन हे सर्वहारा लोकशाहीच्या यशाचे एक वैशिष्ट्य होते. युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक (USSR) म्हणजे स्वखुशीने एकत्रित आलेल्या लोकांचा संघ अशा स्वरूपात प्रस्थापित केले गेले, ज्यामध्ये प्रत्येक घटक राष्ट्राला विभक्त होण्यासह स्वयंनिर्णयाचा अधिकार होता. राष्ट्रीय मुक्तीसाठी लढणाऱ्या जगभरातील शोषित लोकांना प्रेरणा देणारे हे एक उत्कृष्ट उदाहरण होते.
ऑक्टोबर क्रांतीनंतरच्या पहिल्या काही महिन्यांत, सोव्हिएत राज्याने बड्या भांडवलदारांची मालमत्ता जप्त केली आणि मोठे उद्योग, वाहतूक, बँकिंग आणि व्यापार यांचे सार्वजनिक मालकीच्या सामाजिक उपक्रमांमध्ये रूपांतर केले. १९२०च्या दशकात, सोव्हिएत राज्याने गरीब शेतकर्यांना त्यांच्या जमिनी स्वेच्छेने एकत्र करून मोठ्या प्रमाणावर सामूहिक शेती करण्यासाठी प्रेरित केले. सर्व कष्टकरी लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, सर्व वस्तूंचे आणि सेवांचे उत्पादन आणि वितरण एकाच योजनेखाली आणले गेले. एक नवीन आर्थिक व्यवस्था उदयास आली, जिच्यात कोणतीही बेरोजगारी नव्हती आणि महागाई नव्हती. कष्टकरी जनतेचे जीवनमान वर्षानुवर्षे सातत्याने सुधारत गेले.
१९२९पासून सुरू झालेल्या महामंदीचे दुष्परिणाम अमेरिका, ब्रिटेन, फ्रान्स आणि इतर भांडवलशाही देशांच्या अर्थव्यवस्थांना भोगावे लागले. पण त्याचवेळी सोव्हिएत युनियनमधील समाजवादी अर्थव्यवस्थेचा मात्र वेगवान गतीने अखंड सर्वांगीण विकास झाला.
सोव्हिएत युनियनमधील समाजवादाच्या प्रगतीने जगातील सर्व देशांतील कामगार वर्ग आणि पीडितांना प्रेरणा दिली. ज्यामध्ये भांडवलदार आणि जमीनदार नाहीत अशी समाज व्यवस्था उभारणे शक्य आहे हे सोव्हिएत युनियनने दाखवून दिले. वसाहतवादी शासन, साम्राज्यवाद आणि सर्व प्रकारच्या शोषणापासून सर्व लोकांच्या मुक्तीचा मार्ग त्याने खुला केला.
रशियातील सर्वहारा क्रांतीमुळे जागतिक बाजारपेठेचा मोठा भाग साम्राज्यवादी शक्तींच्या प्रभावाच्या आणि नियंत्रणाच्या कक्षेतून बाहेर पडला. यामुळे भांडवलशाहीचे जागतिक संकट अधीक तीव्र झाले. त्यामुळे साम्राज्यवाद्यांची आपापसातील स्पर्धा अधिक तीव्र झाली आणि दुस-या महायुद्धाची परिस्थिती निर्माण झाली.
१९३९मध्ये जगाचे पुनर्विभाजन करण्यासाठी दुसरे जागतिक महायुद्ध, म्हणजेच दुसरे आंतर-साम्राज्यवादी युद्ध, सुरू झाले. ब्रिटेन आणि फ्रान्ससारख्या जुन्या वसाहतवादी शक्तींच्या अंमलाखालील भूभागावर कब्जा करण्यासाठी, जर्मनी, जपान आणि इटलीसारख्या नव्या उदयोन्मुख शक्तींच्या साम्राज्यवादी भांडवलदार वर्गाने सशस्त्र आक्रमणाचा सहारा घेतला.
अँग्लो-अमेरिकन साम्राज्यवाद्यांनी नाझी जर्मनीला पद्धतशीरपणे शस्त्रात्रे पुरविली आणि सोव्हिएत युनियनवर हल्ला करण्यासाठी प्रोत्साहित केले. फॅसिस्ट आक्रमकांशी लढण्यासाठी आणि समाजवादी मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी, सोव्हिएत युनियनच्या कम्युनिस्ट पक्षाने (बोल्शेविक) सोव्हिएत युनियनच्या लोकांना संघटित केले आणि त्यांचे नेतृत्व केले. नाझी फॅसिस्टांच्या ताब्यात असलेल्या सर्व देशांमध्ये, कब्जाकारी सैन्याविरुद्धच्या वीर संघर्षात लढण्यासाठी, त्या देशातील कम्युनिस्टांनी लोकांचे नेतृत्व केले. आंतर-साम्राज्यवादी युद्धाचे रूपांतर फॅसिस्टविरोधी जनयुद्धात झाले. सोव्हिएत युनियनच्या लोकांनी आणि त्याच्या लाल सैन्याने, इतर देशांच्या लोकांसह एकत्रितपणे फॅसिझमचा पराभव करण्यात आणि जागतिक युद्धाचा शेवट करण्यात निर्णायक भूमिका बजावली.
आज जरी सोव्हिएत युनियन अस्तित्वात नसले, तरी भांडवलशाही आणि समाजवाद यांच्यातील जीवन-मरणाचा संघर्ष हा मूलभूत विरोधाभास जागतिक स्तरावर अजूनही आहे. उत्पादनाचे सामाजिक स्वरूप आणि सर्व आर्थिक निर्णयांना चालना देणारा खाजगी नफ्याचा हेतू, यांच्यातील विरोधाभासाच्या रूपात तो दिसून येतो. भांडवलशाही देशांतील शोषक विरुद्ध शोषित यांच्यातील संघर्ष, आणि साम्राज्यवाद विरुद्ध अत्याचारित राष्ट्रे आणि लोक यांच्यातील संघर्षाच्या रूपात तो विरोधाभास दिसून येतो. भांडवलशाही आणि समाजवादाच्या परस्परविरोधी सामाजिक व्यवस्थांमधील संघर्ष, हा विनाशकारी युद्धांकडे जाणे आणि शांततेसाठी झटत राहणे यांच्यातील संघर्षाच्या केंद्रस्थानी आहे.
साम्राज्यवादी उद्दिष्टांसाठी विनाशकारी युद्धे केल्याशिवाय भांडवलशाही टिकून राहू शकत नाही. भांडवलदार सत्ताधारी वर्ग एकामागून एक येणारी आर्थिक अरिष्टे थांबवू शकत नाहीत. बेरोजगारी, महागाई आणि मानवी श्रमाचे सतत वाढणारे शोषण तो वर्ग रोखू शकत नाही. लोकशाही आणि मानवी हक्कांचे खुलेआम उल्लंघन हे जवळपास सर्वच भांडवलशाही देशांत होते. भांडवलशाही शासनाच्या जागेवर सर्वहारा शासन प्रस्थापित करणे आणि भांडवलशाहीतून समाजवादाकडे संक्रमण करणे, हाच शोषणाचा अंत करण्यासाठी, लोकांच्या हक्कांची हमी आणि शाश्वत शांतता सुनिश्चित करण्याचा एकमेव मार्ग आहे.
२१व्या शतकात उत्पादक शक्तींचा विकास आतापर्यंत अकल्पनीय प्रमाणात झाला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने, संपूर्ण मानवतेसाठी समृद्धी आणि संरक्षण सुनिश्चित करण्याची शक्यता निर्माण केली आहे. पण हे घडण्यासाठी, कामगार वर्गाने भांडवलशाही व्यवस्थेविरुद्ध क्रांतीसाठी उठाव करणे, सत्ता स्वतःच्या हातात घेणे आणि भांडवलशाहीच्या लालसेऐवजी मानवी गरजा पूर्ण करण्याच्या दिशेने अर्थव्यवस्थेला वळवणे आवश्यक आहे.
ऑक्टोबर क्रांतीने दाखवलेला मार्ग, हा आजही मानवी समाजाला धोकादायक आणि विनाशकारी दिशेपासून मुक्त करण्याचा एकमेव मार्ग आहे.