हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, २१ ऑक्टोबर २०२३
अमेरिकन सरकारने बेशरमपणे इस्रायलला राजकीय आणि लष्करी पाठिंबा दिला आहे. अल अहली अरब हॉस्पिटलवर बॉम्बिंग झाल्यानंतर काही तासांतच राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी इस्रायलला भेट दिली आणि घोषित केले की अमेरिका शेवटपर्यंत इस्रायलच्या पाठीशी उभी राहील.
अमेरिकन साम्राज्यवाद्यांनी दोन विमानवाहू युद्धनौका भूमध्य समुद्रात इस्त्रायलच्या किनार्याच्या जवळ पाठवल्या आहेत आणि तातडीने अत्याधुनिक शस्त्रास्त्रे पाठवली आहेत. सीरियाच्या विमानतळांवर इस्त्रायलने बॉम्बफेक केली तेव्हाही अमेरिका इस्त्रायलच्या पाठीशी उभी राहिली आहे. कब्जा करून बसलेल्या इस्त्रायलच्या विरुद्ध पॅलेस्टिनी लोकांच्या न्याय्य लढ्याचा दहशतवाद म्हणून निषेध करावा असा दबाव अरब देशांवर आणण्यासाठी अमेरिका धमक्या देत आहे आणि इतर मार्गही वापरत आहे. अरब जगतातील लोक आणि देश असे करण्यास नकार देत आहेत. या देशांतील लोक त्यांच्या पॅलेस्टिनी बंधू-भगिनींच्या न्याय्य लढ्याला मनापासून पाठिंबा देत आहेत.
गाझामधील पॅलेस्टिनी लोकांविरुद्ध इस्रायलने सुरू केलेल्या युद्धाने मानवतेच्या विवेकाला धक्का बसला आहे. हा मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे. १७ ऑक्टोबर रोजी अल अहली अरब हॉस्पिटलवर जो निर्लज्ज बॉम्बहल्ला झाला, त्यात कमीतकमी ५०० डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णांचा मृत्यू झाला. त्याचा जगभरातून निषेध करण्यात आला. १० दिवस आणि रात्रींहून अधिक काळ, इस्रायल गाझामध्ये अंधाधुंद बॉम्बफेक करत आहे. निवासी अपार्टमेंट, शाळा आणि निर्वासित शिबिरांना लक्ष्य करत आहे. या बॉम्बहल्ल्यात हजारो पुरुष, महिला आणि लहान मुले मारली गेली आहेत, आणि हजारो जखमी झाले आहेत. इस्रायलने गाझामध्ये राहणाऱ्या २३ लाख लोकांची अमानुष नाकेबंदी केली आहे. अन्न, पाणी, वीज, इंधन आणि वैद्यकीय पुरवठा या सर्वात मूलभूत जीवनावश्यक गोष्टींपासून त्यांना वंचित केले आहे.
गाझावर सत्ता गाजवणारी पॅलेस्टिनी संघटना हमास नष्ट करण्यासाठी आम्ही हे करत आहोत या बहाण्याने / असे म्हणून इस्रायल या अमानुष युद्धाचे समर्थन करत आहे. “स्वसंरक्षणाचा अधिकार” या बहाण्याने ते युद्धाचे समर्थन करत आहे. लोकांच्या घरादारांवर, शाळांवर आणि रुग्णालयांवर बॉम्बचा वर्षाव करून त्यांना ठार मारणे आणि त्यांना अन्न, पाणी, वीज, वैद्यकीय पुरवठा आणि इतर आवश्यक गोष्टींपासून वंचित ठेवणे म्हणजे स्वसंरक्षण नाही हे जगाला माहीत आहे. तो तर सरळसरळ नरसंहार आहे.
पॅलेस्टिनी लोकांच्या सुरू असलेल्या या नरसंहाराच्या निषेधार्थ जगातील सर्व देशांतील लाखो लोक रस्त्यावर उतरले आहेत. ही नाकेबंदी आणि हे युद्ध त्वरित संपवण्याची मागणी ते एकमुखाने करत आहेत. एक राष्ट्र म्हणून अस्तित्वाचा आम्हाला हक्क आहे या पॅलेस्टिनी लोकांच्या दीर्घकालीन मागणीला ते पाठिंबा देत आहेत.
संयुक्त राष्ट्र संघाने युद्ध थांबवण्यासाठी त्वरित पावले उचलावीत अशी मागणी लोक आणि देश सातत्याने करत आहेत. तथापि, संयुक्त राष्ट्र संघाच्या सदस्य राष्ट्रांनी असे करण्याचा प्रत्येक प्रयत्न अमेरिकन साम्राज्यवादी आणि त्याच्या नाटो सहयोगींनी रोखला आहे.
१६ ऑक्टोबर रोजी, मानवतावादी युद्धविराम तात्काळ करण्याची मागणी करणारा ठराव रशियाने संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत सादर केला. हा ठराव बहारीन, बांगलादेश, बेलारूस, जिबूती, इजिप्त, इरिट्रिया, इंडोनेशिया, जॉर्डन, कुवेत, लेबनॉन, माली, मलेशिया, मॉरिटानिया, मालदीव, निकारागुआ, ओमान, पाकिस्तान, कतार, सौदी अरेबिया, सुदान, तुर्की, व्हेनेझुएला, येमेन आणि झिम्बाब्वे इ. देशांनी सहप्रायोजित केला होता. सर्व ओलीसांची सुटका, गाझामधील लोकांसाठी मदत पोहोचवणे आणि नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याची मागणी या ठरावात करण्यात आली होती. पण अमेरिका आणि ब्रिटन, फ्रान्स व जपान या सुरक्षा परिषदेच्या तीन इतर सदस्यांनी या ठरावाच्या विरोधात मतदान केले. सुरक्षा परिषदेच्या चीन, गॅबॉन, मोझांबिक, रशिया आणि संयुक्त अरब अमिराती या पाच सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर ६ सदस्यांनी आपले मत मांडले नाही. ठराव अयशस्वी झाला. सुरक्षा परिषद हा हिंसाचार संपुष्टात आणेल अशी जगभरातील लोकांची जी आशा होती त्या आशेला पाश्चात्य देशांच्या प्रतिनिधी मंडळांनी धुळीत मिळवले, असे संयुक्त राष्ट्र संघामधील रशियाचे स्थायी प्रतिनिधी म्हणाले-
संयुक्त राष्ट्र संघामधील पॅलेस्टाईनच्या स्थायी निरीक्षकाने, सुरक्षा परिषदेला आंतरराष्ट्रीय कायद्याच्या तत्त्वांनुसार “कोणताही अपवाद न करता” कार्य करण्याचे आवाहन केले. “पॅलेस्टिनी लोकांच्या जीवनाला काहीही किंमत नाही असे संकेत देऊ नका. त्यांच्या डोक्यावर बॉम्ब टाकण्यासाठी इस्रायल जबाबदार नाही असे म्हणण्याचे धाडस करू नका,” असे ते म्हणाले. गाझामध्ये जे काही घडत आहे ती लष्करी कारवाई नसून, त्यांच्या पॅलेस्टिनी लोकांवर सर्वतर्फी हल्ला आहे आणि निष्पाप नागरिकांचे हत्याकांड असल्याचे त्यांनी नमूद केले. “गाझामध्ये कोठेही सुरक्षित नाही. दररोज रात्री कुटुंबातील लोक एकमेकांना मिठीत घेतात तेव्हा ही मिठी शेवटची आहे की नाही हे त्यांना माहित नसते“ असेही ते म्हणाले.
१८ ऑक्टोबर रोजी, ब्राझीलने सादर केलेला युद्धावरील नवीन ठरावावर सुरक्षा परिषदेत मतदान घेण्यात आले. संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सी आणि त्यांच्या भागीदारांना पूर्ण, सुरक्षित आणि विना अडथळा प्रवेश देण्यासाठी मानवतावादी युद्ध विराम देण्याची मागणी ठरावात करण्यात आली. हे युद्ध संपवण्याचे आवाहन नव्हते, तर गाझामधील लोकांपर्यंत मदत सामग्री पोहोचवण्याकरता केवळ विरामांचे आयोजन करावे एवढेच ठरावात मांडले होते. सर्व ओलिसांची तात्काळ आणि बिनशर्त सुटकेसाठी, सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या आणि मानवतावादी कर्मचाऱ्यांच्या तसेच रुग्णालयांच्या आणि वैद्यकीय सुविधांच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्याशी सुसंगत असे ते आवाहन होते. १२ देशांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले तर २ देशांनी मत मांडले नाही. हा ठराव मंजूर होण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेने आपला व्हेटो पॉवर (नकाराधिकार) वापरला.
युद्धात मानवतावादी विराम देण्याचे आवाहन असलेल्या या ठरावाला, संयुक्त राष्ट्र संघामधील अमेरिकेच्या स्थायी प्रतिनिधीने आपल्या विरोधाचे समर्थन करण्यासाठी असा युक्तिवाद केला की हा ठराव इस्रायलच्या “स्वसंरक्षणाच्या अधिकाराला” स्पष्टपणे समर्थन देत नाही, म्हणून आम्ही ठरावाचा विरोध करतो. इस्त्रायलने सुरू केलेल्या नरसंहारी युद्धाला अमेरिकेचा पूर्ण पाठिंबा असल्याचे यावरून दिसून येते. हे युद्ध स्वसंरक्षणासाठी आहे असे म्हणताना, पॅलेस्टिनी लोकांच्या राष्ट्र म्हणून अस्तित्वाच्या हक्काचे रक्षण मात्र अमेरिका करत नाही.
प्रसारमाध्यमांवरील आपल्या वर्चस्वाचा वापर करून चुकीची माहिती पसरवण्याची मोहीम अमेरिकेने चालवली आहे. पॅलेस्टिनींविरुद्ध इस्रायलच्या नरसंहाराच्या युद्धाचा निषेध करणाऱ्या जगातील लोकांचा, सेमेटिकविरोधी (ज्यूविरोधी) म्हणून निषेध केला जात आहे. अमेरिकेतील आणि इतर देशांतील अनेक ज्यू लोक युद्धाच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत, “माझ्या नावाने हे युद्ध नाही” असे म्हणत आहेत आणि पॅलेस्टिनींच्या त्यांच्या स्वत:च्या मातृभूमीच्या हक्काचे समर्थन करीत आहेत ही वस्तुस्थिती जाणूनबुजून लपवून ठेवली जात आहे. जे लोक त्यांच्या अस्तित्वासाठी लढा देत आहेत, ते पॅलेस्टिनी लोकच समस्येचे स्त्रोत आहेत आणि इस्रायल त्याचे बळी आहेत, असे ही प्रचार मोहीम रंगवत आहे आणि पॅलेस्टिनी लोकांनाच अपराधी म्हणून बद्नाम करीत आहे. पॅलेस्टिनी प्रतिकार सैनिकांवर सर्व प्रकारच्या गुन्ह्यांचा खोटा आरोप लावला जातो, आणि नंतर त्या खोट्या बातम्या असल्याचे उघड होते.
पॅलेस्टिनी लोकांच्या नरसंहाराची जबाबदारी अमेरिकेचीही आहे हे जगभरातील लोकांना अधिकाधिक स्पष्ट होत आहे. अमेरिकेने इस्त्रायलला भरपूर शस्त्र देऊन सज्ज केले आहे; याचा उद्देश या भूभागात स्वतःच्या साम्राज्यवादी हितसंबंधांचे रक्षण आणि विकास करण्यासाठी इस्त्रायलला वापरणे हा आहे. याच उद्येशाने, अगदी ७५ वर्षांपूर्वी इस्रायलच्या स्थापनेपासूनच, पॅलेस्टिनी लोकांविरुद्ध इस्रायलच्या सर्व अक्षम्य कृत्यांचे समर्थन व रक्षण करण्यासाठी, अमेरिकेने संयुक्त राष्ट्र संघात आपल्या नकाराधिकाराचा वापर केला आहे.
अमेरिका असा मार्ग अवलंबत आहे जो इस्रायली, पॅलेस्टिनी आणि या प्रदेशातील इतर सर्व लोकांसाठी विनाशकारी आहे. अमेरिकेच्या लष्करी औद्योगिक संकुलाचे एक प्रमुख सदस्य, लॉकहीड मार्टिनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स टॅक्लेट यांनी अमेरिकेचे धोरण पुढील शब्दांत मांडले: “इस्रायलला कोणत्याही लष्करी कारवाईपासून रोखण्यात काही अर्थ नाही. […] अशी तंटे आहेत ज्यांचे निराकरण शस्त्रांनी करणे आवश्यक आहे आणि आम्ही ही शस्त्रे देण्यासाठी तयार आहोत.”
हे युद्ध आणि गाझा नाकेबंदी तात्काळ थांबवण्याच्या मागणीसाठी हिंदुस्थानातील लोक जगभरातील इतर देशांच्या लोकांसोबत एक आहेत. पॅलेस्टिनी लोकांचा आपला अस्तित्वाचा अधिकार अगदी न्यायोचित आहे. इस्रायल, पॅलेस्टाईन आणि त्या भूभागातील इतर देशांच्या लोकांसाठी शाश्वत शांतता सुनिश्चित करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पॅलेस्टिनी लोकांच्या हक्कांचे समर्थन करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांची अंमलबजावणी करणे. यामध्ये इस्रायलने पॅलेस्टाईन प्रदेशातून १९६७ पूर्वीच्या सीमेपर्यंत माघार घेणे, पूर्व जेरुसलेम ही राजधानी असलेल्या पॅलेस्टिनी राज्याची निर्मिती, व्याप्त प्रदेशातून इस्रायली वसाहती हटवणे आणि सर्व पॅलेस्टिनी निर्वासितांना त्यांच्या मायदेशी परत जाण्याचा अधिकार यांचा समावेश आहे. .
इस्रायलने पॅलेस्टिनी लोकांविरुद्ध सुरू केलेले नरसंहारी युद्ध जाणूनबुजून लांबवल्याबद्दल हिंदुस्थानाची कम्युनिस्ट गदर पार्टी अमेरिकन साम्राज्यवाद्यांचा धिक्कार करते. संयुक्त राष्ट्र संघाने स्थापनेच्या वेळी प्रस्थापित केलेल्या सर्व तत्त्वांचा अमेरिकेने पूर्ण अवमान केला आहे. अमेरिका जो मार्ग अवलंबत आहे त्यामुळे जगातील लोकांसाठी फार मोठा धोका आहे.
स्वतःच्या मातृभूमीसाठीचा पॅलेस्टिनी लोकांचा न्याय्य संघर्ष चिरायू होवो!