हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचेनिवेदन , १० ऑक्टोबर २०२३
इस्रायल आणि हमासच्या पॅलेस्टिनी प्रतिरोधक लढवय्यांमध्ये संपूर्ण युद्ध भडकले आहे. आपसातील या शत्रुत्वाचा तात्काळ अंत व्हावा यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने त्वरित पावले उचलण्याची नितांत गरज आहे.
२,००० हून अधिक इस्रायली आणि पॅलेस्टिनी या युद्धात आधीच मरण पावले आहेत आणि या शिवाय हजारो जखमी झाले आहेत. ७ ऑक्टोबर रोजी हमासच्या पॅलेस्टिनी प्रतिकार सैनिकांनी ‘ऑपरेशन अल-अक्सा फ्लड’ या आकस्मिक हल्ल्याच्या प्रारंभानंतर, इस्रायलने गाझा पट्टीवर मोठ्या प्रमाणात हवाई बॉम्बफेक करून नागरी लोकसंख्येला लक्ष्य केले. ते गाझावर जमिनी आक्रमण करण्याच्या तयारीत आहे. वीस लाख पॅलेस्टिनी लोक जिथे वसले आहेत, त्या गाझा पट्टीची इस्रायलने संपूर्ण नाकेबंदी जाहीर केली व तिथे अन्न, औषधे, पाणी, इंधन आणि वीजपुरवठा खंडित केला आहे. आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार हा युद्ध-गुन्हा आहे.
त्याचा देश गाझाला वाळवंटी बेट बनवणार अशी धमकी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी दिली आहे. त्यांचे सरकार नरसंहार करण्यास तयार असल्याची ही घोषणा आहे. हा नरसंहार करण्याआधी इस्रायलला थांबवले पाहिजे.
अमेरिकन साम्राज्यवादी आणि त्यांचे नाटो सहयोगी इस्त्रायली सरकारला पाठिंबा देत आहेत आणि सध्याच्या युद्धासाठी पॅलेस्टिनी प्रतिकार लढवय्यांना जबाबदार धरत आहेत. ते इस्रायलला पूर्णपणे समर्थन देत आहेत, तसेच पॅलेस्टिनी लोकांवर नरसंहारी हल्ले करण्यास ते सक्षम व्हावे यासाठी तातडीने शस्त्रपुरवठा करीत आहेत. हे इस्रायलच्या लोकांसाठी अत्यंत धोकादायक आहे आणि पॅलेस्टाईनच्या लोकांसाठी देखील. हे युद्ध इतरत्र पसरून आणखी अनेक देश त्यात ओढले जाण्याची शक्यता आहे.
वेस्ट बँक आणि गाझामधील इस्रायलने काबीज केलेल्या क्षेत्रांतील पॅलेस्टिनी लोकांवर, इस्रायली सैन्याने पद्धतशीरपणे केलेल्या हत्येचा बदला म्हणून हमासने हा हल्ला केला होता. २००७ पासून गाझा पट्टीत राहणाऱ्या पॅलेस्टिनी लोकांवर, इस्रायल सरकारने अमानुष हवाई, समुद्र आणि जमीन नाकेबंदीलादली आहे. त्या पार्श्वभूमीवर सध्याच्या घटनेकडे पाहण्याची गरज आहे. गाझा पट्टीच्या चारही बाजूंनी कारागृहासारख्या भिंती आहेत. इस्रायलने गाझावर या अगोदर २००८,२०१२, २०१४ आणि २०२१ मध्ये चार प्रदीर्घ लष्करी हल्ले केले आहेत, त्या हल्यांमध्ये लहान मुलांसह हजारो पॅलेस्टिनी मारले गेले आहेत आणि हजारो घरे, शाळा, रुग्णालये आणि कार्यालयीन इमारती नष्ट झाल्या आहेत.
व्याप्त वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेममध्ये, पॅलेस्टिनी कुटुंबांना त्यांच्या घरातून जबरदस्तीने हुसकावून देऊन इस्त्रायली वसाहती स्थापन करण्याच्या कार्यक्रमाला, अलिकडच्या काही वर्षांत नेतन्याहू सरकारने गती दिली आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याने यास मनाई असतानाही त्यांनी तसे केले आहे. सुमारे ७.५ लाख इस्रायली स्थायिक आता वेस्ट बँक आणि पूर्व जेरुसलेममधील सुमारे २५० वसाहतींमध्ये राहत आहेत. पूर्व जेरुसलेममधील ऐतिहासिक अल अक्सा मशीद ताब्यात घेण्यासाठी इस्रायल चिथावणीखोरांचे गट पाठवत आहे. स्वतःची जमीन, घरे आणि प्रार्थनास्थळांचे रक्षण करणार्या पॅलेस्टिनींवर इस्रायलची सशस्त्र सेना क्रूरपणे हल्ले करते आणि त्यांची हत्या करते.
पॅलेस्टाईनचे लोक एक राष्ट्र म्हणून अस्तित्वात राहण्याच्या हक्कासाठी बहादुर संघर्ष करत आहेत. पॅलेस्टाईन राष्ट्र नष्ट करण्याचे धोरण इस्रायलने अवलंबले आहे. पॅलेस्टिनी भूभागावरील ताब्यास आणि गाझाची नाकेबंदी संपवण्यास इस्रायलने नकार दिला आहे.
संयुक्त राष्ट्र संघामधील पॅलेस्टिनी राजदूतांनी पॅलेस्टिनींवरील इस्रायलच्या दीर्घकाळ चाललेल्या युद्धाला प्रतिसाद म्हणून या प्रतिकाराचे समर्थन केले आहे: “इस्रायल एखाद्या राष्ट्रावर, त्याच्या लोकांवर, त्याच्या भूमीवर, त्याच्या पवित्र स्थळांवर संपूर्ण युद्ध करून त्याबदल्यात शांतीची अपेक्षा करू शकत नाही… पॅलेस्टिनी लोक एक ना एक दिवस, एक ना एक मार्गाने मुक्त होतील,” असे ते म्हणाले.
संयुक्त राष्ट्र संघाने पॅलेस्टिनी लोकांचा मातृभूमीसाठीचा कायदेशीर हक्क सुनिश्चित केला पाहिजे. त्याने पॅलेस्टिनी प्रदेशांवरील इस्रायलचा ताबा संपवला पाहिजे आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने दोन राज्यांच्या निर्मितीचा जो ठराव पारित केला होता त्या ठरावाची अंमलबजावणी सुनिश्चित केली पाहिजे. 1967 पूर्वीच्या ज्या सीमा होत्या त्यानुसार पूर्व जेरुसलेम ही राजधानी असेल अशा पॅलेस्टाईन राज्याची स्थापना सुनिश्चित करणे आवश्यक आहे. तरच या प्रदेशात शाश्वत शांततेची हमी मिळू शकेल.