हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, ६ ऑक्टोबर, २०२३
३ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या वेळेस, दिल्ली पोलिसांनी न्यूज पोर्टल न्यूजक्लिकच्या कार्यालयावर आणि दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये आणि हिंदुस्थानातील इतर शहरांमध्ये सुमारे पन्नास स्त्रीपुरुषांच्या घरांवर छापे टाकले. ज्यांना लक्ष्य करण्यात आले त्यांमध्ये पत्रकार, सांस्कृतिक कार्यकर्ते आणि इतर लोक ज्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीतरी या मीडिया हाऊससोबत काम केले आहे, अशा व्यक्ती होत्या. त्यांचे लॅपटॉप्स आणि मोबाईल्स जप्त करण्यात आले. यांपैकी पुरुषांना दिल्ली पोलिसांच्या लोधी रोड स्पेशल सेलमध्ये चौकशीसाठी नेण्यात आले आणि त्यांना संध्याकाळी उशिरापर्यंत कोठडीत ठेवण्यात आले, तर महिलांची त्यांच्या त्यांच्या निवासस्थानी चौकशी करण्यात आली. ज्या एफआयआर अंतर्गत हे छापे टाकण्यात आले त्यात कठोर UAPA कायद्याच्या अनेक तरतुदींचा समावेश आहे, जो दहशतवादाशी संबंधित आहे. न्यूजक्लिक न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि मुख्य संपादक प्रबीर पुरकायस्थ व न्यूजक्लिकच्या मानव संसाधन विभागाचे प्रभारी अमित चक्रवर्ती यांना अटक करण्यात आली असून त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.
या घटना म्हणजे पत्रकारांवर आणि प्रसारमाध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालेला उघड हल्ला आहेत. सर्व संकेतांवरून असे दिसते की, या न्यूज पोर्टल व पत्रकारांना लक्ष्य केले गेले कारण त्यांनी कामगार, शेतकरी, महिला, तरुणवर्ग आणि सर्व जनसामान्यांचे प्रश्न उपस्थित केले आहेत आणि सरकार आणि त्याचे अधिकृत कथन उघड करण्याचे धाडस केले आहे.
हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी या छाप्यांचा आणि अटकांचा लोकशाही अधिकारांवर केलेला निंदनीय हल्ला म्हणून निषेध करते. ती कठोर UAPA च्या वापराचा निषेध करते. अटक केलेल्यांना जामीन मिळण्याच्या शक्यतेशिवाय अनिश्चित काळासाठी तुरुंगात ठेवता यावे, यासाठीच हा कायदा लागू करण्यात आला आहे. छापे मारणे, अटक करणे आणि पत्रकारांविरुद्ध UAPA चा वापर करणे यामागे विरोध आणि असहमती दर्शवण्याचे धाडस करणार्यांचा आवाज बंद करणे हाच हेतू आहे.
कोणताही अधिकारी कोणत्याही सबबीखाली त्याचे उल्लंघन करू शकत नाही, असा सदसद्विवेकबुद्धीचा अधिकार हा एक मानवी हक्क आहे असे मानून आपल्या देशातील जनतेने नेहमीच तो जपला आहे आणि त्याचे संरक्षण केले आहे. कम्युनिस्ट गदर पार्टी आपल्या देशातील तमाम जनतेला केंद्र सरकारच्या या विवेकाच्या अधिकारावरील निर्लज्ज हल्ल्याचा एकजुटीने निषेध करण्याचे आवाहन करते.