मजदूर एकता कमिटीच्या वार्ताहराचा अहवाल
राजस्थान परिचारिका संयुक्त संघर्ष समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन, राजस्थानच्या विविध जिल्हा रुग्णालयांमध्ये कार्यरत परिचारिकांनी त्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ 14 ऑगस्ट 2023 रोजी मेणबत्ती मोर्चा आणि मशाल मिरवणूक काढली. आंदोलक परिचारिकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी, परिचारिकांनी त्यांच्या मागण्यांचे प्रदर्शन म्हणून निषेधाच्या ठिकाणी ध्वजारोहण केले. सरकारने आपल्या मागण्यांवर कोणतीही कार्यवाही न केल्यास, २५ ऑगस्ट रोजी जयपूर येथे भव्य मोर्चा आणि निदर्शने करण्यात येतील, असा इशारा त्यावेळी परिचारिकांनी दिला.
आंदोलक परिचारिकांच्या प्रमुख मागण्या आहेत – नर्सिंग शिक्षण आणि प्रगत विभागीय नर्सिंग प्रशिक्षण यांना प्राधान्य देण्यात यावे; नर्सिंग शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत; वेतन आणि भत्ते केंद्र सरकारी संस्थांच्या बरोबरीने आणले जावेत; कंत्राटी परिचारिकांचे नियमितीकरण करावे आणि नियुक्ती (प्लेसमेंट) स्थांद्वारे भर्ती करण्यावर पूर्ण बंदी घालावी; नर्सिंग ऑफिसर, नर्सिंग ट्यूटर आणि प्राचार्य यांचे सर्व हक्क सुरक्षित आहेत याची खात्री करणे; कालबद्ध पदोन्नती धोरणाची अंमलबजावणी; सवलतीच्या दरात निवासी भूखंड देऊन त्यावर नर्सिंग वसाहतींची निर्मिती; रुग्णालयाच्या अतिरिक्त कामांसाठी परिचारिकांच्या वापरावर बंदी घालावी; स्वतंत्र नर्सिंग संचालनालयाची स्थापना करावी इ.
राजस्थानमधील परिचारिकांचा गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. 24 जून रोजी, राजस्थान नर्सेस असोसिएशन आणि राजस्थान राज्य नर्सेस असोसिएशन युनायटेड,आणि परिचारिकांच्या इतर अनेक संघटना, परिचारिकांच्या 11 कलमी प्रलंबित मागण्यांसाठी एकत्र आल्या. राजस्थान परिचारिका संयुक्त संघर्ष समिती स्थापन करून राज्यव्यापी संघर्षाची घोषणा करून पुढील संघर्षाची रणनीती त्यांनी आखली. 18 जुलैपासून आपल्या 11 कलमी मागण्यांसाठी राजस्थानमधील सरकारी रुग्णालयांमध्ये 2 तास कामावर बहिष्कार टाकण्याची घोषणा त्यांनी केली. मात्र असे असतानाही सरकारने परिचारिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने 1 ऑगस्टपासून राजस्थानभरातील रुग्णालये, वैद्यकीय केंद्रे आणि नर्सिंग प्रशिक्षण केंद्रांमध्ये परिचारिकांनी दोन तास आंदोलने आणि दारोदार बैठका घेतल्या. तसेच, 2 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक उपचार केंद्रांवर गेट मीटिंग घेण्यात आल्या. तर, 10 ऑगस्ट रोजी परिचारिकांनी आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ आणि सरकारच्या कामगार विरोधी आणि लोकविरोधी धोरणांच्या विरोधात घोषणा देत जिल्हा रुग्णालय ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
16 ते 24 ऑगस्ट या कालावधीत सर्व ग्रामीण व शहरी जिल्हा रुग्णालयांसमोर गेट मिटिंग जाहीर करण्यात आल्या आहेत.
या बैठका आणि निदर्शनांच्या दरम्यान, आपत्कालीन सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय परिचारिकांनी घेतला आहे, जेणेकरून लोकांना अत्यावश्यक आरोग्य सेवांचा लाभ मिळू शकेल.