गिग कामगारांचे आंदोलन

झोमॅटोच्या मालकीची कंपनी ब्लिंकिटचे वितरण कामगार कंपनीने प्रती वितरण देयक कमी केल्यामुळे यावर्षी 12 एप्रिल रोजी संपावर गेले. ब्लिंकिटने वितरण कामगारांसाठी आपली नवीन पे-आउट संरचना आणली तेव्हा संप सुरू झाला, ज्या अंतर्गत किमान पे-आउट प्रती वितरण रुपये 25 वरून 15 रुपये इतका कमी करण्यात आला. या संशोधित पे-आउट संरचनेनुसार दिला जाणारा प्रोत्साहन भत्ता, डिलिवरीसाठी एकूण किती अंतर कव्हर केले यावर आधारित आहे — ‘किती प्रयत्न केले’यावर आधारित वेतन म्हणून हे धोरण सामान्यतः ओळखले जाते. परिणामी, ब्लिंकिट वितरण कर्मचार्‍यांना आता पूर्वीच्या 1,200 रुपयांच्या ऐवजी दिवसाला 600-700 रुपये मिळतात.

संपाला झोमॅटोचा प्रतिसाद म्हणजे ज्या स्टोअरमध्ये आंदोलक कामगार काम करत होते ते तात्पुरते बंद करणे. कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आले. दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत नवीन वितरण कामगार कामावर घेऊन स्टोअर पुन्हा उघडण्यात आले. झोमॅटोने दावा केला की संपाचा कंपनीच्या महसुलावर 1% पेक्षा कमी परिणाम होईल!

अलिकडच्या वर्षांत, गिग कामगारांनी सोशल मीडिया व्यासपीठाचा वापर सुरू केला आहे. त्यांच्या सारख्याच परिस्थितीत अडकलेल्या कामगारांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांच्या सगळ्यांच्या समान मागण्या आणि समस्या यांच्या भोवती एकता निर्माण करण्यासाठी ते सोशल मीडियाचा वापर करत आहेत. कॅब ड्रायव्हर्स, वितरण कामगार आणि काही इतर सेवांमधील गिग कामगारांच्या संघटना अधिक सदस्य बनवण्याचा आणि समान मागण्या मांडण्याचा प्रयत्न करत आहेत.

अलीकडेच, गृहसेवा पुरवठादार ‘अर्बन कंपनीने’ कामावर घेतलेल्या महिला कामगारांनी कंपनीच्या नवीन धोरणांचा निषेध केला. त्या नवीन धोरणांमुळे कामगारांना इच्छा नसतानाही दर महिन्याला ठराविक कामे घेण्यास भाग पाडले जाते. त्याचप्रमाणे डन्झो, स्विगी आणि झोमॅटो सारख्या वितरण सेवांचे वितरण कामगार, विविध सोशल मीडिया व्यासपीठावर सक्रियपणे या कंपन्यांच्या अन्याय्य देयक संरचनांचा पर्दाफाश करत आहेत.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *