हिंदुस्थानातील कामगार वर्गाच्या चळवळीसमोरील आव्हाने

कामगार एकता कमिटीच्या (KEC) वार्ताहराने दिलेला अहवाल

कामगार एकता कमिटीने रविवार, 11 जून 2023 रोजी मुंबई येथे “हिंदुस्थानातील कामगार वर्गाच्या चळवळीसमोरील आव्हाने” या महत्त्वाच्या विषयावर बैठक घेतली. रेल्वे, वीज, संरक्षण, आयटी, शिक्षण आणि वस्त्रोद्योग अशा विविध व्यवसायांतील आणि सर्व वयोगटातील कामगार-स्त्री-पुरुषांनी सभागृह भरलेले होते.

बैठकीच्या सुरवातीला, नुकत्याच झालेल्या ओडिशा रेल्वे दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सरकार आणि रेल्वे अधिकाऱ्यांना सर्व जनतेने कठोर प्रश्न विचारण्याची आणि भारतीय रेल्वेच्या व्यवस्थापन प्रणालीच्या या अपयशाची जबाबदारी घेण्याची मागणी जोरदारपणे करण्याची वेळ आली आहे असे आवाहन सर्व उपस्थितांना करण्यात आले.

या अहवालात विविध सहभागींनी व्यक्त केलेल्या त्यांच्या विचारातील ठळक मुद्दे मांडले आहेत.

सर्व गरजेच्या वस्तू बनवणारे कामगार आणि देशाला अन्न पुरवणारे शेतकरी हे संपूर्ण लोकसंख्येच्या 90% पेक्षा जास्त असले तरी, त्यांच्या अत्यंत साध्या, मूलभूत गरजा – अन्न, पाणी, स्वच्छता, घर, कपडे, वीज, उत्तम आरोग्य आणि शिक्षण सेवा ह्या पुरेशा प्रमाणात त्यांना मिळत नाहीत. आणि परिस्थिती आणखी बिकटच होत चालली आहे. देशाचे कायदे आणि धोरणे ठरवण्यात आणि त्यांची अंमलबजावणी करण्यात आपण कष्टकऱ्यांची कोणतीच भूमिका नसते. आपले संघर्ष चिरडून टाकण्यासाठी राज्यकर्ते सर्व शक्तीनिशी शक्य असेल ते करत आहेत. सत्तेत कोणताही पक्ष असो, भांडवलदार वर्गाचाच कार्यक्रम राबवला जातो जेणेकरून ते आपल्या जिवावर अधिक श्रीमंत होतच राहतात.

भांडवलशाही ही आपल्या देशातील प्राथमिक उत्पादक प्रणाली आहे, व ती आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेची चालक व प्रेरक आहे.उत्पादनाची साधने आणि आर्थिक संसाधने भांडवलदारांची खाजगी मालमत्ता आहे. ते एखाद्या बांडगुळाप्रमाणे पूर्णपणे इतरांच्या श्रमावर जगतात. त्यामध्ये मोठ्या उद्योगांचे मालक, खाणी आणि सेवा पुरवणाऱ्या कंपन्या, मोठे घाऊक व्यापारी, सावकार, जमीनीचे आणि इमारतीचे मालक आणि मोठे भांडवलदार शेतकरी यांचा समावेश होतो.त्यांची संख्या केवळ काही दश लक्ष एवढीच आहे.

हिंदुस्थानात 166 अमेरिकन डॉलर अब्जाधीश आहेत, त्यांची एकत्रित संपत्ती सुमारे $750 अब्ज (रु. 60 लाख कोटी) आहे. या 166 व्यक्तींची एकत्रित संपत्ती 140 कोटी हिंदुस्थानी लोकसंख्येच्या एकूण वार्षिक उत्पन्नाच्या एक चतुर्थांशापेक्षा जास्त आहे.

देशात 14 लाखांहून अधिक नोंदणीकृत कंपन्या मोठ्या प्रमाणात वस्तू आणि सेवांचे उत्पादन करत असताना, 150 मक्तेदारी गटांच्या मालकीच्या जवळपास 1000 पेक्षा कमी कंपन्या जवळजवळ सर्व बाजारपेठांवर वर्चस्व गाजवतात. ते आपल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर, जसे की अन्न, वीज, शिक्षण, वाहतूक, दळणवळण, आयटी इत्यादी मूलभूत सेवा ह्या सर्वांवर वाढत्या प्रमाणात वर्चस्व गाजवताहेत. या मक्तेदार कंपन्या त्यांच्या कामगारांना शक्य तितका कमी पगार देऊन त्यांचे शोषण करतात आणि ग्राहकांना जास्तीचे दर आकारत त्यांचीही लूट करतात .

कोणत्याही पक्षाची सत्ता असली तरीही भांडवलदार आणि जनता यांच्यातील दरी वाढतच जात आहे. ही उद्योजक घराणी भाजप आणि काँग्रेससारख्या पक्षांना दशोहजारो कोटींचा निधी देतात. त्यामुळे ते या पक्षांचे मालक होतात. कोणताही पक्ष किंवा पक्षांची युती जेव्हा सरकार स्थापन करते तेव्हा त्यांचे काम निधी देणाऱ्यांचा कार्यक्रम राबवणे हे असते, तर विरोधी पक्ष लोकांचे हितसंबंध जोपासण्याचे नाटक करून सर्व सामान्य जनतेला मूर्ख बनवतात.

हे उघड आहे की भांडवलदारांची राजवट जर चालू ठेवली, तर आपले भविष्य खूप अंधकारमय होईल. ह्यास पर्याय म्हणजे, कामगार वर्ग आणि कष्टकरी यांचे राज्य प्रस्थापित करणे आणि त्यांच्यासाठी पृथ्वीवर स्वर्ग निर्माण करणे. हेच कामगार एकता कमिटीचे उद्दिष्ट आहे. ह्याची पहिली पायरी म्हणजे कामगार वर्ग कोण हे ओळखणे.

उत्पन्नाच्या किंवा व्यवसायाच्या आधारावर कामगार वर्ग ओळखणे चुकीचे आहे. उत्पादन साधने आणि सेवांची साधने यांच्या मालकांना आपली श्रमशक्ती विकून जे आपली उपजीविका कमावतात, ते सर्व कामगार आहेत. यामध्ये शारीरिक श्रमाची कामे करणाऱ्या कामगारांबरोबरच डॉक्टर, प्राध्यापक, आयटी कामगार इत्यादी उच्च पात्रताधारकांचाही समावेश आहे. उत्पादन आणि सेवांच्या मालकांचे एकमात्र उद्दिष्ट असते जास्तीत जास्त नफा मिळवणे. कामगारांना कमीत कमी वेतन देऊनच हे साध्य होते. मालक आणि कामगारांचे हित परस्पर विरोधी असल्यामुळे त्यांच्यात कधीच सामंजस्य होऊ शकत नाही.

सर्व जनतेच्या सुख आणि समृद्धीसाठी आवश्यक ती भूमिका कामगार आणि शेतकरी पार पडतात. आज भांडवलदार, विशेषत: मोठी कॉर्पोरेट घराणी, कृषीक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश करत आहेत आणि शेतकरी तसेच कामगार वर्गाला उद्ध्वस्त करत आहेत. हा वर्ग कामगार आणि शेतकरी या दोघांचाहीशत्रू आहे आणि हे ओळखून भांडवलदार वर्गाविरुद्ध एकत्र येणे दोघांनीही आवश्यक आहे.

भांडवलदार वर्गाला हे चांगलेच माहीत आहे. स्वतःची सत्ता टिकवून ठेवण्याची सर्वात विश्वासार्ह पद्धतींपैकी एक म्हणजे “फोडा आणि राज्य करा” हे ब्रिटीश धोरण, त्यांनी अजून विकसित केले आहे.  धर्म, जात, भाषा, राष्ट्रीयत्व इत्यादी आधारावर आपल्या देशातील कामगार आणि कष्टकरी विभागले गेलेले आहेत आणि त्या आधारावर त्यांच्यावर हल्लेही करण्यात येतात हे आपण रोज पाहतो. पण, आपण हे समजून घेतले पाहिजे की असे हल्ले केवळ त्या विशिष्ट समुदायावरील हल्ला नसतो तर संपूर्ण कामगार वर्गावरील हल्ला असतो!

युनियन आणि पक्षाच्या संलग्नतेच्या आधारावर, कामगार विरुद्ध पर्यवेक्षक आणि व्यवस्थापक (जे देखील कामगारच आहेत), ब्लू कॉलर आणि व्हाईट कॉलर, शारीरिक आणि बौद्धिक कामगार (ज्यांना कामगार मानलेच जात नाही), कायमस्वरूपी आणि कंत्राटी कामगार, कर्मचारी आणि व्यवस्थापक इ. आधारावर भांडवलदार वर्ग कामगारांमध्ये फूट पडतो आणि त्यांचे लक्ष मूळ समस्येकडून दुसरीकडे वळवितो.

हिंदुस्थानातील जनतेची एकमेव विभागणी आहे, जी आपण कधीही विसरता कामा नये; ती म्हणजे वर्गाच्या आधारावरील विभागणी. भांडवलदार वर्गाचे आणि कामगारांचे आणि इतर कष्टकऱ्यांचे हितसंबंध एकमेकांच्या विरुद्ध आहेत आणि त्यांच्यात कधीच सामंजस्य होवूच शकत नाही. आपली प्राथमिक ओळख ही कामगार वर्गाचा एक सदस्य म्हणून असायला हवी आणि आपली प्राथमिक निष्ठा ही कामगार वर्गासाठीच असायला हवी.

पितृसत्ता जिवंत ठेवणाऱ्या या भांडवलशाही व्यवस्थेत स्त्रियांचे दुहेरी शोषण होत आहे, एक कामगार म्हणून आणि दुसरेस्त्री म्हणून. जर स्त्रियांना जागृत आणि संघटित केले तर त्या आपल्या वर्गाची ताकद अनेक पटींनी वाढवतील. त्याचप्रमाणे तरुणांमध्ये मोठी क्रांतिकारी क्षमता आहे. त्यांच्याकडे अमर्याद ऊर्जा, आशावाद आणि नवीन कल्पना आहेत. ऐतिहासिकदृष्ट्या, संपूर्ण जगात, मानवतेच्या प्रगतीमध्ये महिला आणि तरुणांचा मोठा वाटा आहे. कामगार संघटनांनी महिलांच्या आणि तरुणांच्या सहभागाला प्रोत्साहन देणारी अनुकूल परिस्थिती निर्माण करण्यास विशेष प्रयत्न केले पाहिजेत.

जर आपण एक वर्ग म्हणून संघटित झालो तर आपल्यावरील वाढते हल्ले आपण नक्कीच हाणून पाडू शकू. हे तर महत्त्वाचे आहेच पण त्याचबरोबर आपले धोरणात्मक उद्दिष्ट लक्षात ठेवणेही महत्त्वाचे आहे. शेतकरी आणि इतर कष्टकरी जनतेसह संघटित होऊन आपण आपल्या देशाचे राज्यकर्ते बनलो पाहिजे.

आपण आपल्या वर्ग बंधू-भगिनींना हे पटवून दिले पाहिजे की आपण राज्य करण्यास सक्षम आहोत, कारण त्यांच्यापैकीच बरेच जण आपल्या वर्गाची ताकद कमी लेखतात. समाजात काम करणाऱ्या आणि योगदान देणाऱ्या सर्वांची सुरक्षितता, रक्षण आणि चांगले आरोग्य सुनिश्चित करणे हे राज्यकर्त्याचे प्राथमिक कर्तव्य आहे! सध्याचे राज्यकर्ते याच्या अगदी उलट करत आहेत.

नैसर्गिक आपत्तीच्या वेळी तसेच घाईघाईने केलेले लॉकडाऊन आणि राज्याने आयोजित केलेल्या जातीय “दंगली” यांच्या सारख्या मानवनिर्मित संकटांच्या वेळी आपणच आपल्या असंख्य सहकारी नागरिकांना वाचवतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनात लोकांनी अतिशय सुसंघटित पद्धतीने एकमेकांची काळजी घेतली, रक्षण केले आणि गरजाही भागवल्या.

आपल्याकडे असलेल्या तुटपुंज्या संसाधनांसह एकमेकांची काळजी घेण्याची आपली इच्छा आणि आपली क्षमता आपण वेळोवेळी सिद्ध केली आहे. आज देशाच्या संसाधनावर अब्जाधीशांचे नियंत्रण आहे. आपणच जर देशाच्या संसाधनांवर नियंत्रण ठेवले तर आपण या पृथ्वीवर एक स्वर्ग नक्कीच निर्माण करू शकू!

2024 च्या निवडणुकीच्या तयारीसाठी आतापासूनच वेगवेगळ्या पक्षांनी आपल्याला लाडीगोडी लावण्यास सुरू केले आहे. 2024 मध्ये सत्तेवर येणारा हा किंवा तो पक्ष आपल्या समस्या सोडवेल अशी फसवणूक आपण करून घेता कामा नये. परंतु कामगार वर्गाच्या स्वतंत्र कार्यक्रमाचा विकास करण्यासाठी आणि त्याभोवती सर्व कामगार कष्टकऱ्यांची एकजूट बांधण्यासाठी शक्य तितक्या व्यापक चर्चा आपण सुरू ठेवल्या पाहिजेत. देशाची अर्थव्यवस्था ही सर्व श्रमिकांच्या सतत वाढत्या भौतिक आणि सांस्कृतिक गरजा पूर्ण करणारी आणि त्यांचे कल्याण करणारी असावी; आणि ह्यात कोणाचेही शोषण किंवा अत्याचार करण्यास वाव नसावा; अंतिम निर्णय घेण्याची शक्ती जनतेकडे असली पाहिजे व निवडून आलेले प्रतिनिधी जनतेला उत्तरदायी असले पाहिजेत; तसेच, दक्षिण आशियातील शेजारी देशांतील लोकांशी परस्पर आदर आणि सहकार्यावर आधारित मैत्रीपूर्ण संबंध निर्माण केले पाहिजेत – ही तशा कार्यक्रमाची काही वैशिष्टे आहेत.

आपल्या संघटनांना गुणात्मक आणि संख्येने वृद्धिंगत करून आपण आपली लढण्याची क्षमता बळकट केली पाहिजे. तसेच आपण संघटित होऊन कामगार वर्ग आणि इतर कष्टकरी यांचा कार्यक्रम केंद्रस्थानी आणला पाहिजे. आपल्या देशाचे राज्यकर्ते होण्यासाठी आपल्याला संघटित झाले पाहिजे!

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *