10 मे रोजी, हिंदुस्थानातील लोक ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीविरुद्ध महान गदरची जयंती मोठ्या अभिमानाने साजरी करतात. 1857 मध्ये याच दिवशी मेरठमधील लष्करी छावणीतील सैनिकांनी ब्रिटिशांविरुद्ध बंडाचा झेंडा रोवला होता. त्यांनी दिल्लीकडे कूच केले आणि मुघल शासक बहादूर शाह जफरच्या पाठिंब्याने, इंग्रजांना भारतातून हाकलून देण्याचा त्यांचा इरादा जाहीर केला. त्यांनी सर्व समाजातील आणि देशभरातील लोकांना त्यांच्यात सामील होण्याचे आवाहन केले. हम है इसके मलिक, हिंदुस्तान हमारा (हिंदुस्थान आमचा आहे, आम्ही त्याचे स्वामी आहोत) हे त्यांचे जोशपूर्ण घोषवाक्य होते.
थोड्याच वेळात हा उठाव संपूर्ण उत्तर, मध्य, पूर्व, ईशान्य आणि दक्षिण हिंदुस्थानात वणव्यासारखा पसरला. उपखंडातील ब्रिटीश सत्ता जवळजवळ कोलमडून पडली, कारण त्यांच्या स्वतःच्या सैन्याने जनतेच्या पाठिंब्याने त्यांच्या विरोधात बंदुका फिरवल्या. एकोणिसाव्या शतकातील ब्रिटीश सत्तेविरुद्धचा हा सर्वांत मोठा उठाव होता, व तो ही अशा वेळेस जेव्हा हे साम्राज्य आपल्या शक्तीच्या शिखरावर होतं. अतुलनीय क्रूरता आणि दहशतीचा वापर करून, ब्रिटिशांना अखेरीस संघर्ष चिरडण्यात यश आले. असे असले तरी, 1857 चा महान गदर तेव्हापासून आपल्या लोकांना त्यांच्या मुक्तीच्या लढ्यात प्रेरणा देणारी एक शक्तिशाली शक्ती आहे.
अगदी त्याच वेळी, कार्ल मार्क्सने या उठावाला हिंदुस्थानाचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध मानले आणि त्याचे स्वागत केले. हे स्पष्ट होते की ही एक चळवळ होती ज्यामध्ये विविध प्रांत, धर्म आणि समाजातील विविध वर्ग आणि स्तरातील लोक सामील होते. काही लोकांचे विशेषाधिकार पुनर्संचयित करणे हे त्याचे उद्दिष्ट नव्हते तर तेथील लोकांच्या मालकीचा नवा हिंदुस्थान उभारणे हा त्याचा उद्देश्य होता. ब्रिटिश वसाहतवाद्यांनी हे मुद्दाम झाकून ठेवले होते; त्यांनी त्याला बंगाल आर्मीचा काही महिन्यांतच संपलेला “शिपायांचा बंड”असे संबोधून त्याचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला होता. वसाहतवादी राजवट संपल्यानंतर हिंदुस्थानी शासक भांडवलदार वर्गानेही महान गदरचे महत्त्व कमी केले आहे. त्यांचा वर्ग 1947 मध्ये ब्रिटीशांशी करार करून आणि वसाहतवाद्यांनी विकसित केलेल्या आपल्या लोकांच्या दडपशाही आणि शोषणाच्या बहुतेक संरचना अबाधित राखून सत्तेवर आला. 1857 च्या उठावाचे खरे मुक्तिवादी चरित्र, त्याची देशभक्ती आणि लोकशाही कल्पना आणि हिंदुस्थानाविषयीची दृष्टी समोर न आणणे त्यांच्या हिताचे होते.
ब्रिटीशांनी रेखाटलेल्या चित्राच्या विपरीत, 1857 चा उठाव शून्यातून किंवा सैन्याच्या एका रेजिमेंटमधील (तुकडीमधील) असंतोषातून उद्भवला नाही. देशभरातील खेड्यापाड्यातील आणि शहरांतील लोकांचा समुदाय आणि आदिवासी लोकांनी अनेक दशके ब्रिटिश आणि त्यांच्या जुलमी शासन आणि शोषण पद्धतींविरुद्ध अनेक लढाया लढल्या होत्या. बंडाचा उद्रेक होण्याआधी, ब्रिटीश वसाहतवाद्यांविरुद्ध उठाव करण्यासाठी लोकांना एकत्रित करण्याचे प्रयत्न अनेक महिने सुरू होते. ह्याच संदर्भात मे 1857 मध्ये एका रेजिमेंटमध्ये सुरू झालेल्या बंडाला परकीय राजवटीविरुद्ध देशव्यापी उठावाचे स्वरूप धारण केले.
एकदा दिल्लीत गदरचा ध्वज रोवला गेल्यावर लढाऊ शिपायांनी तत्परतेने इंग्रजांविरुद्धच्या युद्धाचे आयोजन तर केलेच, शिवाय मुघल राज्याची पुनर्स्थापना किंवा ब्रिटिश सत्तेचे अनुकरण न करता नवीन राज्यसत्तेचा पाया रचला. यावरून असे दिसून येते की ते अशा प्रकारचे दूरदर्शी लोक होते ज्यांची दृष्टी इंग्रजांना पराभूत करण्याच्या उद्दिष्टापर्यंत मर्यादित नव्हती.
एक लष्करी परिषद स्थापन करण्यात आली जिने सहा पानांचा दस्तऐवज जारी केला; ज्याला नवीन सरकारचे ‘संविधान’ म्हणता येईल. त्यात बारा कलमी कार्यक्रमाचा समावेश होता. इतर गोष्टींबरोबरच, प्रशासनाच्या बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी कोर्ट ऑफ एडमिनिस्ट्रेशनची (प्रशासकीय दरबाराची) स्थापना केली गेली, ज्याने त्याचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडले. प्रशासकीय दरबारात सैन्याच्या पायदळ, घोडदळ आणि तोफखाना विभागातील प्रत्येकी दोन प्रतिनिधी आणि निवडून आलेले चार नागरी सदस्य होते. प्रत्येक सदस्य एका विभागाचा प्रभारी होता आणि त्याला इतर चार सदस्यांची समिती मदत करत असे. ह्या समित्या विचारमंथन करून शिफारशी करत असत परंतु बहुमताच्या आधाराने निर्णय घेतले जात असत; सदस्यांना प्रत्येकी एक आणि अध्यक्षांना दोन मते होती. मुघल बादशहाला दरबाराच्या बैठकींमध्ये बसण्याचा अधिकार होता आणि दरबाराच्या निर्णयांना मान्यता द्यावी लागत असे, परंतु निर्णय प्रशासकीय दरबार घेत असे.
या नवीन प्रकारच्या राज्यसत्तेला भ्रूण स्वरुपात राहावे लागले कारण लढवय्यांना सतत क्रूर आणि धूर्त शत्रूविरुद्ध युद्ध करावे लागत असे. यामुळे त्यांना नवीन शक्ती एकत्रित करण्यासाठी आणि आणखी विकसित करण्यासाठी वेळ मिळाला नाही. तरीही यावरून असे दिसून येते की, हिंदुस्थानातील लोकांनी ब्रिटीशांच्या विरोधात उठून, त्यांच्या स्वत:च्या लोकशाही परंपरा आणि हुशारीच्या आधारे एक नवीन व्यवस्था मांडली ज्यामध्ये ते स्वामी असते.
ब्रिटिश वसाहतवाद्यांनी हे बंड उत्तर हिंदुस्थानच्या काही भागांपुरते आणि काही रेजिमेंटपुरते मर्यादित असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न केला. विशेषतः पंजाब त्यांच्याशी ‘एकनिष्ठ’ असल्याचा दावा त्यांनी केला. या वेळी इंग्रजांविरुद्ध पंजाबच्या अनेक भागात उठाव झाल्याचे तथ्यांवरून दिसून येते. त्याचप्रमाणे या उठावाचा विस्तार दक्षिण हिंदुस्थानापर्यंत झाला नाही असे म्हटले जाते. याउलट, या प्रदेशात अनेकदा बंडखोरी झाली ज्यात मुख्यत्वे सैन्यात नसतानाही, लोकांच्या विविध विभागांचा समावेश होता. या प्रदेशातील बंडखोरांना उत्तरेत होत असलेल्या गदरची जाणीव होती आणि त्यांनी त्यांच्या संघर्षांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला.
परकीय आक्रमकांना हुसकावून लावण्याच्या उद्देशाने धर्म, जात आणि प्रादेशिक भेद विसरून संघटित झालेल्या सैनिक आणि शेतकरी, आदिवासी लोक, कारागीर, शहरी लोकांचा आणि विविध विभागातील देशभक्त लोकांचा हा सामूहिक उठाव होता. सप्टेंबर 1857 मध्ये ब्रिटिश सैन्याने दिल्ली पुन्हा ताब्यात घेतल्यावरही उठाव संपला नव्हता. त्यानंतर अनेक वर्षे हिंदुस्थानच्या विविध भागांत तो विविध स्वरूपात चालू राहिला. त्यानंतरही, हिंदुस्थानी लोकांसाठी आणि स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्व देशभक्तांसाठी आणि क्रांतिकारकांसाठी ते प्रेरणास्थान राहिले.
1947 मध्ये ब्रिटीश वसाहतवादी राजवट संपल्यानंतर हिंदुस्थानी राज्यकर्त्यांनी ब्रिटिश साम्राज्यवाद्यांना त्यांच्या गुन्ह्यांसाठी कधीही जबाबदार धरले नसले तरी, 1857 च्या वीर सेनानींविरुद्ध त्यांनी जी क्रूरता केली ती हिंदुस्थानी जनता कधीही विसरली नाही. हिंदुस्थानच्या लोकसंख्येपैकी 7%, किंवा 1 कोटी लोक ब्रिटिशांनी त्यावेळी लोकांवर केलेल्या अत्याचारामुळे मारले गेले! त्यानंतर अनेक वर्षांपर्यंत देशाच्या संपूर्ण प्रदेशात लोकसंख्या इतकी कमी झाली होती, की ब्रिटिश वसाहती अधिकार्यांनी नंतर तक्रार केली की त्यांना अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांच्या प्रकल्पांसाठी पुरेसे कामगार मिळत नाहीत. दिल्ली आणि इतर शहरे मोठ्या सूडबुद्धीने उद्ध्वस्त करण्यात आली. हिंदुस्थानात ‘सभ्यता’ आणत असल्याचा दावा करणाऱ्या सत्तेच्या प्रतिनिधींनी उठाव दडपण्यासाठी अत्यंत रानटी पद्धती वापरल्या. यामध्ये तोफेच्या तोंडातून लढवय्ये उडवणे आणि त्यांना रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या रांगांवर फाशी देणे यांचा समावेश होता. या ‘बंडखोरी’ने बलाढ्य ब्रिटीश साम्राज्याला किती धोका निर्माण केला होता हे यावरून दिसून येते.
आपल्या लोकांच्या सततच्या संघर्षामुळे 1947 मध्ये ब्रिटीश वसाहतवाद्यांना हिंदुस्थान सोडण्यास भाग पाडले असले तरी, 1857 च्या वीरांनी ज्या उद्दिष्टांसाठी लढा दिला तो पूर्ण झाला नाही. वसाहतवादी राजवटीला हातभार ज्याने लावला होता, तो हिंदुस्थानी मोठा भांडवलदार वर्ग देशाचा नवीन शासक बनला. इंग्रजांनी आपल्या लोकांना दाबून ठेवण्यासाठी जे कायदे आणि संस्था वापरल्या होत्या, बहुतेक त्याच कायद्यांचा आणि संस्थांचा वापर करून नवीन शासकांनी कामगार, शेतकरी आणि सामान्य लोकांवर अत्याचार आणि शोषण चालू ठेवले आहे. ब्रिटीश वेस्टमिन्स्टर सरकारची एक आवृत्ती चालू आहे, जी लोकांना सत्तेच्या वास्तविक वापरापासून दूर ठेवत असताना केवळ लोकशाहीचा भ्रम निर्माण करते. इथल्या आणि परदेशातील शोषकांना फायदा मिळवून देण्यासाठी लोकांची संपत्ती आणि संसाधने हिरावून घेतली जात आहेत. 1857 च्या सेनानींनी सुरू केलेला खरा मुक्तीचा संघर्ष अजूनही सुरू आहे. या संघर्षात, 1857 च्या महान गदरच्या कल्पना आणि उदाहरणे धडे देत आहेत आणि पुढील मार्ग दाखवीत आहेत.