अफगाणी लोकांविरुद्धचे अमेरिकी साम्राज्यवादाचे राक्षसी गुन्हे कधीच विसरता येणार नाहीत

अफगाणिस्तानच्या लोकांना स्वतःचे भवितव्य ठरवण्याचा अधिकार आहे

15 ऑगस्ट 2021, रोजी तालिबान सैन्याने काबूल शहरात प्रवेश केला आणि राष्ट्रपती महाल ताब्यात घेतला. काही तासांपूर्वी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी अमेरिकेच्या मदतीने देश सोडून पळून गेले होते. अमेरिकेने पैसे आणि प्रशिक्षण देऊन तयार केलेले तीन लाखांचे अफगाणी सैन्य लढाई न करताच बरखास्त करण्यात आले. या घटनांमुळे काबूलमधील अमेरिकेच्या समर्थित कठपुतळी राजवटीचा अंत झाला. याचबरोबर अफगाणिस्तानवरील सुमारे 20 वर्षांचा अमेरिकी साम्राज्यवादी  कब्जा संपुष्टात आला.

अफगाणिस्तानचे लोक धैर्यवान आणि अभिमानी लोक आहेत ज्यांनी नेहमीच आपल्या स्वातंत्र्याला अमूल्य मानले आहे. अफगाणी लोकांनी कोणत्याही त्यागाची भीती न बाळगता, त्यांना दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक परकीय साम्राज्यवादी शक्तीच्या विरोधात लढा दिला आहे. अफगाणी लोक रानटी आणि असभ्य आहेत असा खोटा प्रचार अँग्लो-अमेरिकन साम्राज्यवाद्यांनी केला आहे. अफगाणी लोकांच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाच्या  उल्लंघनाचे समर्थन करण्यासाठी हा निंदनीय प्रचार करण्यात आला आहे. अफगाणिस्तानातून कब्जा करणाऱ्या अमेरिकन सैन्याची माघार हा अफगाणिस्तानच्या शूर लोकांचा विजय आहे. परदेशी साम्राज्यवादी हुकूमशाहीतून मुक्त होऊन अफगाणी  लोकांनी स्वतःचे भवितव्य ठरवण्याचा मार्ग यामुळे उघडला गेला आहे.

वीस वर्षांपूर्वी, 7 ऑक्टोबर 2001 रोजी अमेरिकन साम्राज्यवादी आणि ब्रिटनने अफगाणी लोकांच्या विरोधात युद्ध सुरू केले. इतिहासातील सर्वात क्रूर युद्धांच्या यादीत त्याचा समावेश होतो. 11 सप्टेंबर 2001 रोजी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर हे युद्ध सुरू झाले. 20 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुशने घोषित केले की, अल कायदा नावाचा दहशतवादी गट न्यूयॉर्कवरील 9/11 च्या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार आहे आणि त्याचा नेता ओसामा बिन लादेन अफगाणिस्तानमध्ये तळ ठोकून आहे.

अमेरिकन साम्राज्यवाद्यांनी कोणत्याही पुराव्याशिवाय असा दावा केला की, अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यांचे सूत्रधार अफगाणिस्तान सरकारच्या पूर्ण पाठिंब्याने अफगाणिस्तानातून कार्यरत होते. हा दावा करून त्यांनी अफगाणिस्तानावरील आपल्या  हल्ल्याचे व कब्जाचे समर्थन केले. दहशतवाद्यांना आश्रय दिल्याच्या आरोपाच्या आधारे अमेरिकेने कोणत्याही देशाच्या किंवा लोकांच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करण्याचा आपल्याला अधिकार असल्याचे निर्लज्जपणे जाहीर केले. ज्या देशांनी “दहशतवादाविरोधातील युद्धाला“ पाठिंबा दिला नाही, अशा सर्व देशांना धमकी दिली. राष्ट्राध्यक्ष बुशने घोषित केले की “प्रत्येक प्रदेशातील प्रत्येक राष्ट्राला आता निर्णय घ्यायचा आहेः एकतर तुम्ही आमच्याबरोबर आहात किंवा तुम्ही दहशतवाद्यांसोबत आहात.“ अमेरिकन साम्राज्यवाद्यांनी जाहीर केले की ही दहशतवादाविरोधातील “अंतहीन युद्धाची” सुरुवात आहे,  जे जगभरात पुकारले जाईल

न्यूयॉर्कमधील 9/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर वीस वर्षे उलटूनदेखील, अमेरिकेने आजतागायत कोणताही पुरावा दिलेला नाही की या हल्ल्यांमध्ये त्यावेळच्या अफगाणिस्तान सरकारची काही भूमिका होती.  याउलट, 11 सप्टेंबर 2001 रोजी घडलेले न्यूयॉर्कमधील दहशतवादी हल्ले अमेरिकी राज्यानेच आयोजित केले होते, हे सिद्ध करणारे पुरेसे परिस्थितीजन्य पुरावे आहेत.  अमेरिकेने अफगाणिस्तानवर आक्रमण करण्याची तयारी 11 सप्टेंबर 2001 पूर्वीच केली होती आणि ती फक्त योग्य वेळेची वाट पाहत होती, याचा भक्कम पुरावा उपलब्ध आहे.

9/11 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा वापर अमेरिकन राज्याने आशिया व आफ्रिकामधील अनेक मुस्लीम देश जिंकून घेण्यासाठीच्या युद्धांना अमेरिकेतील जनतेचा पाठिंबा मिळवण्याकरता केला. या हल्ल्यांचा वापर अमेरिकेने देशात आणि जगभरात इस्लामोफोबिया (मुस्लिमांविषयी भीती) पसरवण्यासाठी केला. तथाकथित “इस्लामिक दहशतवादाविरोधातील  युद्धाचे” नेतृत्व करत असल्याचा अमेरिकेने दावा केला. अरब आणि मुस्लिम लोकांना मागास, महिलाविरोधी, असभ्य धर्मांध आणि दहशतवादी म्हणून बदनाम करण्यासाठी पद्धतशीर प्रचार मोहीम राबवण्यात आली आहे. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी वेळोवेळी दहशतवादी हल्ले आयोजित केले आणि त्यांचा खोटा प्रचार विश्वासार्ह वाटावा याकरता दोषाचे खापर “इस्लामवाद्यांवर“ फोडले. जगभरातील मुस्लिमांमध्ये दहशत पसरवून त्यांचा छळ करण्यात आला आहे.

“दहशतवादाविरोधातील युद्धाचा” वापर लष्करी हल्ले व संपूर्ण देश उध्वस्त करण्याचे समर्थन करण्यासाठी करण्यात आला आहे. अफगाणिस्ताननंतर अमेरिका व तिच्या दोस्त राष्ट्रांनी इराक आणि लिबियावर आक्रमण करून ते उध्वस्त केले आहेत. आणि सीरिया व पश्चिम आशिया आणि उत्तर आफ्रिकेमधील इतर देशांमध्येही तेच करण्याचा प्रयत्न करत आहेत.

न्यूयॉर्कमधील 9/11 चे दहशतवादी हल्ले, अफगाणिस्तानवरील आक्रमण आणि कब्जा आणि अमेरिकेने आखलेले जागतिक “दहशतवादाविरोधातील युद्ध” या सगळ्याकडे पाहताना शीतयुद्धाच्या शेवटचे अमेरिकेच्या साम्राज्यवादाचे डावपेच विचारात घेतले पाहिजेत. संपूर्ण जगावर अतुलनीय वर्चस्व प्रस्थापित करणे हे अमेरिकेचे धोरण होते आणि आहे.

सोव्हिएत यूनियनच्या विघटनाचा उपयोग अमेरिकेच्या साम्राज्यवाद्यांनी पूर्व युरोपच्या पूर्वीच्या समाजवादी देशांना तसेच सोव्हिएत यूनियनच्या अनेक  युरोपीय  प्रजासत्ताकांना आपल्या वर्चस्वाखाली आणण्यासाठी केला. युगोस्लाव्ह फेडरेशन तुटले. १९९० मध्ये स्वीकारलेल्या ’चार्टर ऑफ पॅरिस फॉर अ न्यू युरोप’च्या जाहीरनाम्यानुसार अमेरिकेच्या साम्राज्यवाद्यांनी युरोपमधील सर्व देशांकडे  “मुक्त बाजार अर्थव्यवस्था“ आणि “बहुपक्षीय लोकशाही“च्या नियमांची मागणी केली आणि ते अंमलात आणले.

अमेरिकेच्या साम्राज्यवाद्यांनी जगावर विजय मिळवण्याची नांदी म्हणून आशियावर विजय मिळवण्यासाठी “दहशतवादाविरोधातील युद्ध” सुरू केले. अरब आणि मुस्लिम लोकांना लक्ष्य केले गेले कारण  त्यांना स्वतःचा इतिहास आणि संस्कृती आहे, त्यांची स्वतःची आर्थिक आणि राजकीय व्यवस्था आहे आणि युरोपियन आणि अमेरिकन राजकीय नियम स्वीकारण्याला त्यांचा नकार आहे. शिवाय, पश्चिम आशिया, मध्य आशिया आणि उत्तर आफ्रिका येथे तेल आणि वायूचे प्रचंड साठे आहेत. हा संपूर्ण प्रदेश आपल्या वर्चस्वाखाली आणण्याचे अमेरिकेचे उद्दिष्ट होते.

अमेरिकेने मुद्दामहून अफगाणिस्तानला या ”इस्लामिक दहशतवादाविरोधातील  युद्धाचे”चे पहिले लक्ष्य म्हणून निवडले. कारण  अफगाणिस्तानचे सरकार लष्करीदृष्ट्या कमकुवत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटे पडलेले होते. शिवाय, अफगाणिस्तान रणनीतिकदृष्ट्या स्थित होता, तेल आणि वायूने समृद्ध असलेले इराण आणि पूर्वीचे सोव्हिएत यूनियन, पाकिस्तान आणि चीनच्या मध्य आशियाई प्रजासत्ताकांच्या सीमेला लागून होता. अफगाणिस्तानवर आपले नियंत्रण प्रस्थापित केल्यावर या देशांमध्ये  हस्तक्षेप करणे आणि अस्थिरता पसरवणे अमेरिकेला शक्य झाले असते.

ऐंशीचे दशक म्हणजे असा काळ होता जेव्हा अफगाणिस्तान हा देश अमेरिका आणि सोव्हिएत यूनियनसाठी युद्धभूमी बनला होता. डिसेंबर 1979 मध्ये सोव्हिएत सैन्याने एका लष्करी उठावाद्वारे सत्तेत आलेल्या सोव्हिएतला पाठिंबा देणाऱ्या सरकारचे रक्षण करण्यासाठी अफगाणिस्तानात प्रवेश केला. अफगाणिस्तानच्या लोकांनी त्यांच्या सार्वभौमत्वाच्या उल्लंघनाला विरोध केला व कब्जा करणाऱ्या सैन्याविरोधात बंड पुकारले.

अमेरिकन साम्राज्यवाद्यांनी त्यांच्या स्वतःच्या हेतूंसाठी अफगाणी लोकांच्या स्वातंत्र्य लढ्याचा हवा तसा वापर करून घेतला. सोव्हिएत सैन्याशी लढण्याकरता त्यांनी अनेक अफगाणी गटांना व त्यांच्यासोबत निरनिराळ्या भागांतील आणि समुदायांतील विविध उच्च लष्करी अधिकाऱ्यांना निधी पुरवला, प्रशिक्षण दिले आणि सशस्त्र केले. जेव्हा सोव्हिएत यूनियनने 1989 मध्ये अफगाणिस्तानातून माघार घेतली तेव्हा वेगवेगळ्या सशस्त्र गटांमध्ये गृहयुद्ध सुरु झाले. हे गृहयुद्ध 1996 मध्ये तालिबानने काबूलमध्ये सत्ता काबीज करेपर्यंत 6 वर्षांहून अधिक काळ टिकले. यानंतरही अफगाणिस्तानातील विविध प्रदेश प्रतिस्पर्धी गटांच्या नियंत्रणाखाली होते.

या काळात अमेरिकेने सोव्हिएत कब्जाच्या विरोधात जिहाद पुकारण्याच्या नावाखाली दहशतवादी गट उभारले. अफगाणिस्तानातून सोव्हिएत मागे फिरल्यानंतर, अमेरिकन साम्राज्यवाद्यांनी त्यांचे धोरणात्मक हितसंबंध पुढे नेण्यासाठी युरोप, आशिया आणि आफ्रिकेतील देशांमध्ये अस्थिरता पसरवण्याकरता सीआयएच्या प्रशिक्षित गटांना पुन्हा नियुक्त केले. यामध्ये युगोस्लाव्हिया, सेंट्रल एशियन रिपब्लिक्स, रशियन फेडरेशन, चीन, सीरिया आणि उत्तर आफ्रिकेतील विविध देशांचा समावेश होता.

गेल्या वीस वर्षांच्या कालावधीत अमेरिकेने “दहशतवादाविरोधातील युद्धाच्या” नावावर अफगाणी लोकांविरोधात अकल्पनीय गुन्हे केले आहेत. गावांवर केलेल्या निर्दयी बॉम्बहल्ल्यांमध्ये लाखो अफगाणी लोक मारले गेले आहेत. कब्जा केलेल्या अमेरिकन सैन्याने वंश, जमातींमधील संलग्नता इत्यादी गोष्टींवरून अफगाणी लोकांना अफगाणी लोकांविरोधात उभे करण्याचा प्रयत्न केला आहे. अफगाणी लोकांनी त्यांच्या देशावर अमेरिकन साम्राज्यवाद्यांनी केलेल्या कब्जाचा कधीच स्वीकार केला नाही. ते परकीय सत्तेपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी धैर्याने लढले आहेत.

20 वर्षांपूर्वी अफगाणिस्तानवर केलेले आक्रमण आणि कब्जा त्याकाळी अमेरिकन साम्राज्यवादी धोरणात्मक हेतू साध्य करण्यासाठी उपयोगी ठरला. अमेरिकन साम्राज्यवादी त्यांचा “दहशतवादाविरोधातील युद्ध” हा आराखडा अमेरिकन लोकांवर व जगातील सर्व भांडवलवादी देशांवर लादू शकत होते आणि जगावर अधिराज्य मिळवण्याची मोहीम पुढे नेऊ शकत होते. 20 वर्षांनंतर आता मात्र तो हेतू साध्य होत नाही.

क्रूर युद्धांचा आरंभ करणे आणि सातत्याने जगभरात अशी युद्धे पुकारत राहणे, या वागण्याचे समर्थन करणे आता अमेरिकन साम्राज्यवादाला अधिकाधिक कठीण जात आहे. अमेरिकन साम्राज्यवादी त्यांना हव्या त्या कोणत्याही देशाला दहशतवादी राज्य म्हणून सहज घोषित करून अशा देशांमध्ये लष्करी हस्तक्षेप करू शकतात, हे मान्य करायला बहुतेक देश, लोक आणि सरकारे राजी नाहीत.

अमेरिकेत इतर राष्ट्रे व लोकांविरोधातल्या अमेरिकेच्या युद्धांना वाढता विरोध आहे. दूरदेशातील भूमीवर आपले रक्त का सांडावे, असा प्रश्न अमेरिकन लोकांमध्ये अधिकाधिक विचारला जात आहे.

म्हणूनच अमेरिकन राज्य सततच्या अफगाणिस्तानवरील कब्जाचे समर्थन करण्यास अधिकाधिक असमर्थ आहे.

अशा परिस्थितीमध्ये अमेरिकन साम्राज्यवादी, अमेरिकन आणि जगभरातील लोकांना एकच धोरणात्मक ध्येय साध्य करण्याकरता एकत्र आणण्यासाठी नवनवीन घोषणा करत आहेत. ते ध्येय म्हणजे जगावर विजय मिळवण्याची नांदी म्हणून आशियावर विजय मिळवणे. अमेरिकन साम्राज्यवाद्यांनी घेतलेला  अफगाणिस्तानातून त्यांचे सशस्त्र सैन्य मागे घेण्याचा निर्णय ह्या दृष्टिकोनातून पहिला गेला पाहिजे.

अमेरिकेच्या नेतृत्वाखाली जगातील साम्राज्यवाद्यांनी अफगाणी लोकांविरुद्ध अकल्पनीय  गुन्हे केले आहेत. हे गुन्हे कधीच विसरता येणार नाहीत.

अफगाणिस्तानच्या लोकांना सर्व परदेशी साम्राज्यवादी हुकूमशाहीतून मुक्त असलेली, त्यांची आर्थिक व राजकीय व्यवस्था आणि आपले स्वतःचे भवितव्य ठरवण्याचा अधिकार आहे. जगातील साम्राज्यवाद्यांना स्वतःची आर्थिक व राजकीय व्यवस्था अफगाणी लोकांवर लादण्याचा कोणताही अधिकार नाही.

40 वर्षांहून अधिक चाललेल्या युद्धाच्या भयंकर परिणामांवर मात करणे, अमेरिकन साम्राज्यवाद्यांनी जाणूनबुजून वाढवत नेलेल्या त्यांच्या समाजातील विभाजनांवर मात करणे आणि देशाची पुनर्बांधणी करणे, अशा प्रचंड आव्हानांना अफगाणी लोकांना तोंड द्यावे लागते.

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी न्यायप्रिय हिंदुस्थानी लोकांना असे आवाहन करते की, त्यांनी अफगाणिस्तानच्या लोकांना त्यांच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याच्या या लढ्यात मनापासून पाठिंबा द्यावा आणि अफगाणी लोक स्वतः स्वतःचे शासन करण्यास अक्षम आहेत,  हा खोटा साम्राज्यवादी प्रचार मोडून काढावा.

Share and Enjoy !

Shares

Leave a Reply

Your email address will not be published.